श्री गणेश आखाड्यात तयार होत आहेत उद्याचे पहेलवान
भाईंदर (पश्चिम) येथील सुभाष मैदानात असलेल्या श्री गणेश आखाड्यात
पुढील पिढीचे युवा पहेलवान तयार करण्याचे मोठे कार्य गेली २४ वर्षे वस्ताद वसंतराव
पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत. मीरा-भाईंदर परिसर आता खूपच गजबजलेला असून इतर
भाषिक समुदायांची मोठी संख्या येथे आहे. तरीही, कुस्ती हा
खेळ सशक्तपणे जिवंत ठेवण्यासाठी पाटील आणि त्यांचे सहकारी अनंत परिश्रम घेत आहेत. क्राँक्रीटच्या
जंगलात लाल मातीतल्या हिऱ्यांना या आखाड्यात पैलू पाडले जातात.
वसंतराव पाटील यांचे चुलते, गणपती पाटील हे नामवंत कुस्तीपटू होते, आणि
त्यांच्या प्रेरणेतून वसंतराव यांनी कुस्तीच्या खेळात पाय ठेवले. सुरुवातीला
त्यांनी इस्लामपुर येथील नामवंत मंत्री तालिम येथे प्रशिक्षण घेतले. सखाराम
वखारवाले आणि वस्ताद बबन सावंत यांच्याकडून कुस्तीचे धडे गिरवले. पाटील यांनी
१०-१५ वर्षे जिल्हा, राज्य, विद्यापीठ
स्पर्धांत भाग घेतला आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मुंबई शहर संघाचे
प्रतिनिधित्व केले.
वडिलांचा व्यवसाय मुंबईत असल्यामुळे पाटील मुंबईत आले आणि
दादर येथे क्रांतीसिंह नाना पाटील व्यायाम शाळेची स्थापना केली. येथे त्यांचे
कुस्तीचे सराव सुरूच होते. नंतर मुंबई शहर तालिम संघाशी त्यांचा संबंध जुळला आणि
३० वर्षे त्यांनी विविध पदांवर काम केले. १९९५-९६ मध्ये पाटील भाईंदर येथे स्थायिक
झाले आणि येथील अमरदीप शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ललित विद्या निकेतन शाळेची
स्थापना केली.
त्यांचे स्वप्नात श्री गणेश आखाड्याची स्थापना करण्याचे
होते. या उद्देशाने त्यांनी आमदार गणेश नाईक यांच्याकडे जागेसाठी मदतीचा हात मागितला
आणि सुरुवातीला छोट्या जागेत या आखाड्याची सुरूवात केली. मात्र, सुरुवातीला कुस्ती शिकवण्यासाठी खूप संघर्ष
करावा लागला. आज या आखाड्यात १०० पेक्षा जास्त पुरुष आणि १५-२० मुली नियमितपणे
प्रशिक्षण घेत आहेत. विलेपार्ले, बोरीवली, दहिसर येथून देखील कुस्तीपटू येऊन सराव करतात.
श्री गणेश आखाड्याचे आज ठाणे जिल्ह्यात प्रमुख स्थान आहे.
अनेक मोठे पहेलवान या आखाड्यातून पुढे आले आहेत. युवा जागतिक कुस्ती स्पर्धेत
कांस्य पदक मिळवणारा साईनाथ पारधी, आणि कोमल देसाई, वैभव माने, अक्षय
माने, गणेश शिंदे, ओम जाधव यांसारखे
अनेक कुस्तीपटू या आखाड्याचे शान आहेत.
आखाड्याच्या कार्यात सक्रियपणे योगदान देणारे एनआयएस
प्रशिक्षक, वैभव माने,
कोमल देसाई हे कुस्तीपटूंना खेळाचे उत्कृष्ट धडे देतात. कुस्तीची
व्याप्ती वाढविण्यासाठी ५ ते ८ या दोन वेळांच्या सत्रात कुस्तीचा अभ्यास सतत चालू
असतो. कुस्तीच्या शिबिरांचे आयोजन देखील मोठ्या प्रमाणावर केले जाते.
श्री गणेश आखाड्याला मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आणि
स्थानिक राजकीय नेत्यांचे भरपूर पाठबळ मिळाले आहे. माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी
सुरुवातीला ६ लाख रुपये देऊन मॅट दिली होती. विविध दिग्गज कुस्तीपटूंचे मार्गदर्शन
आखाड्याला नेहमीच लाभले आहे.
वस्ताद वसंतराव पाटील यांचे कुस्ती खेळासाठी केलेले समर्पण
आणि कार्य आज मीरा-भाईंदरमध्ये कुस्ती खेळाचा श्वास बनला आहे. त्यांच्या कार्याचा
गौरव करताना आज ३० पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. स्वतःच्या खिशाला
चाट देऊन कुस्तीसाठी केलेल्या वसंतराव पाटील यांच्या कार्याची दखल अनेक संस्थांनी
घेतली असून आतापर्यंत त्यांना ३० पेक्षा जास्त पुरस्कार देखील मिळाले आहेत. आगामी
काळात नव्या जागेत आखाडा स्थलांतरित होणार आहेत. नवा आखाडा दुमजली असेल. तेथे सर्व
अद्ययावत कुस्ती खेळाची साधने कुस्तीपटूंसाठी उपलब्ध असतील. २०२५ मध्ये श्री गणेश
आखाडा आपला रौप्य महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करणार आहे. श्री गणेश आखाड्याचा
आदर्श महाराष्ट्रातील इतर आखाड्यांनी घेतला तर राज्यात चांगले पहेलवान तयार होऊ
शकतील यात शंका नाही.
- सुहास जोशी, ज्येष्ठ
क्रीडा पत्रकार, suhasj215@gmail.com
Post a Comment
0 Comments