5वी अर्जुन मढवी स्मृती महिला चषक स्पर्धा
शार्वी सावेची अष्टपैलू खेळी व्यर्थ
ठाणे: तीन बळी आणि अर्धशतकी खेळी करणाऱ्या शार्वी सावेच्या अष्टपैलू खेळामुळे संघाला लढतीत चांगले स्थान मिळवून दिले असले, तरी तिच्या या कामगिरीने पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचा पराभव टाळता आला नाही. डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित ४० षटकांच्या एकदिवसीय अर्जुन मढवी महिला क्रिकेट स्पर्धेतील या सामन्यात दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने ४३ धावांनी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.
प्रथम फलंदाजी करताना दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने ४० षटकांत ९ बाद २२८ धावांचे आव्हान उभे केले. अनुभवी पूनम राऊतने संघासाठी मोलाची खेळी करत ७५ चेंडूत ९ चौकारांसह ७८ धावा केल्या. अनिशा शेट्टी (३०) आणि सारा सामंत (२८) यांनीही चांगला हातभार लावला. गोलंदाजीत ययाती गावडने ४ बळी घेतले, तर शार्वी सावेने ८ षटकांत ३४ धावा देत ३ बळी मिळवले.
२२८ धावांचा पाठलाग करताना पालघर डहाणू संघाची सुरुवात संघर्षपूर्ण राहिली. शार्वी सावेने आक्रमक फलंदाजी करत ६७ चेंडूत एक षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ८१ धावांची खेळी केली. तिच्या या खेळामुळे संघाला विजयाची आशा निर्माण झाली होती. मात्र, तिच्या बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. स्नेहलता धनगड आणि लिली दिपने प्रत्येकी २६ धावांची खेळी केली, पण संघ ९ बाद १८५ धावांपर्यंतच पोहोचू शकला.
दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या गोलंदाजांमध्ये अदिती सुर्वे, सिद्धी पवार, आणि क्रितिका कृष्णकुमार यांनी प्रत्येकी २ बळी घेत सामन्यावर पकड कायम राखली.
संक्षिप्त धावफलक:
दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन: ४० षटकांत ९ बाद २२८ (पूनम राऊत ७८, अनिशा शेट्टी ३०, सारा सामंत २८; ययाती गावड ४/५०, शार्वी सावे ३/३४)
पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन: ४० षटकांत ९ बाद १८५ (शार्वी सावे ८१, स्नेहलता धनगड २६, लिली दिप २६; अदिती सुर्वे २/२२, सिद्धी पवार २/३१, क्रितिका कृष्णकुमार २/४३)
सामन्याची उत्कृष्ट खेळाडू: पूनम राऊत
Post a Comment
0 Comments