Type Here to Get Search Results !

मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा महात्मा गांधी स्पोर्टस्, निवारा हिड इंडिया यांची पश्र्चिम विभाग कुमारी गटात अंतिम फेरीत धडक

 


मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

महात्मा गांधी स्पोर्टस्, निवारा हिड इंडिया यांची पश्र्चिम विभाग कुमारी गटात अंतिम फेरीत धडक

 

मुंबई, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने नेहरू नगर, कुर्ला (पूर्व) येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी स्पोर्ट्स आणि निवारा हिड इंडिया संघांनी पश्‍चिम विभाग कुमारी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

 

कुमारी गटात महात्मा गांधी स्पोर्ट्सचा आकाश स्पोर्ट्सवर विजय

महात्मा गांधी स्पोर्ट्स संघाने उपांत्य फेरीत आकाश स्पोर्ट्सचा ३४-१५ असा सहज पराभव केला. या सामन्यात महात्मा गांधीने पहिल्या सत्रात १६-०९ अशी आघाडी घेतली आणि दुसऱ्या सत्रातही तितक्याच ताकदीने खेळ करत विजय मिळवला. पूजा दशरथ आणि जागृती नांदवीकर यांच्या प्रभावी चढाई-पकडीच्या खेळाने संघाला यश मिळवून दिले. आकाश स्पोर्ट्सच्या धनश्री कोकरे आणि पियुष्का शिंदे यांनी पहिल्या सत्रात चांगली लढत दिली, परंतु दुसऱ्या सत्रात त्या अपयशी ठरल्या.

 

निवारा हिड इंडिया संघाची चुरशीची लढत

दुसऱ्या उपांत्य फेरीत निवारा हिड इंडिया संघाने वंदे मातरम् संघाचा ४६-४४ असा पराभव केला. हिड इंडियाने पहिल्या सत्रात दोन लोण देत २४-१३ अशी आघाडी घेतली होती. मात्र, वंदे मातरम् संघाने दुसऱ्या सत्रात दोन लोणची भरपाई करत सामना रोमहर्षक बनवला. अखेर हिड इंडियाने आणखी एक लोण आणि तीन अव्वल पकडींसह सामना दोन गुणांनी जिंकला. प्रतिज्ञा जळगावकर आणि तनुजा बळीराम यांच्या प्रभावी कामगिरीमुळे हा विजय शक्य झाला. वंदे मातरम् संघाच्या मोनिका शिगवण आणि हर्षदा बाले यांनी शेवटपर्यंत निकराची लढत दिली.

 

कुमार आणि महिला गटातील सामने

कुमार गटात संघर्ष मंडळाने ओम् साई संघाला २२-१४ असे हरवले, तर एच.एस.एफ संघाने ओवळी देऊलवाडीवर २८-११ असा विजय मिळवला.


महिला गटात स्वराज्य स्पोर्ट्सने सत्यम सेवादलाचा ३९-०९ असा सहज पराभव केला. स्वराज्यच्या याशिका पुजारी आणि शर्वरी गोडसे यांच्या आक्रमक खेळासमोर सत्यम संघ पूर्णतः निष्प्रभ ठरला. अन्य सामन्यांमध्ये महात्मा गांधी स्पोर्ट्सने प्रबोधन स्पोर्ट्सचा ३४-१३ असा पराभव केला; आकाश स्पोर्ट्सने बालयोगी सदानंद संघाला ३१-१३ असे हरवले, तर निवारा हिड इंडियाने माऊली प्रतिष्ठान संघावर १९-११ असा विजय मिळवला.

 


प्रथमश्रेणी पुरुष गटात पराभव आणि विजयाची मालिका

पुरुष गटात पार्ले स्पोर्ट्सने क्रांती संघाचा २७-१८ असा पराभव केला, तर सागर मंडळाने नव महाराष्ट्र संघाला ३०-१६ असे हरवून पुढील फेरीत प्रवेश मिळवला.

ही स्पर्धा मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने संयोजन संस्था, चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवली, सेक्टर - २ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे.


Post a Comment

0 Comments