Type Here to Get Search Results !

मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा नवशक्ती स्पोर्टस् यांची महिलांमध्ये तर बालमित्र मंडळ यांची पुरुषांमध्ये दुसऱ्या फेरीत ५-५ चढायांच्या डावात धडक

 


मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

नवशक्ती स्पोर्टस् यांची महिलांमध्ये तर बालमित्र मंडळ यांची पुरुषांमध्ये दुसऱ्या फेरीत ५-५ चढायांच्या डावात धडक

 

मुंबई: मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत महिलांच्या गटात नवशक्ती स्पोर्टस् आणि पुरुषांच्या गटात बालमित्र मंडळ यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा कांदिवली, सेक्टर - २ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर होत असून, याचे संयोजन अँडव्हटायजिंग आणि मार्केटिंग प्राईव्हेट ली.च्या संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे.

महिलांचा सामना:

महिलांच्या पहिल्या फेरीत नवशक्ती स्पोर्ट्सने ५-५ चढायांच्या डावात विशाल स्पोर्टस् संघाचा २५-२० असा पराभव केला. पहिल्या डावात ७-८ अशा पिछाडीवर असलेल्या नवशक्तीने दुसऱ्या डावात जोरदार पुनरागमन करत १७-१७ अशी बरोबरी साधली. जादा डावात नवशक्तीने ५ गुणांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयाचे श्रेय रविना थोरात आणि गायत्री देवळेकर यांच्या संयमी खेळाला जाते. विशाल स्पोर्टस् कडून अंकशिता लाड व दिपाली कलमकर यांनी कडवी लढत दिली.

पुरुषांचा सामना:

पुरुषांच्या प्रथम श्रेणी (अ) गटात बालमित्र मंडळाने ५-५ चढायांच्या डावात एस.के. कबड्डी संघावर २३-२० अशी मात केली. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात पहिल्या डावात एस.के. संघ ७-५ अशा आघाडीत होता. मात्र, उत्तरार्धात बालमित्र मंडळाच्या किरण मोरे व ओमकार पाटील यांच्या खेळामुळे संघाने १५-१५ अशी बरोबरी साधून जादा डावात ३ गुणांनी विजय मिळवला. एस.के. संघाच्या कुलदीप व अभिषेक आंग्रे बंधूंनी चांगली लढत दिली, परंतु जादा डावात कमी पडले.

ओवळी (ब) मंडळाने देऊळवाडी ओवळी संघावर २०-११ असा सहज विजय मिळवला. ऋतिक सोनावणे व विराज कदम यांच्या अष्टपैलू खेळामुळे संघाने वर्चस्व राखले, तर देऊळवाडीचा विघ्नेश कासार चांगला खेळला.

केदारनाथ मंडळाने निर्विघ्न स्पोर्टस् संघाचा ३२-४ असा धुव्वा उडविला. किरण व निखिल कदम बंधूंच्या आक्रमक खेळामुळे हा विजय शक्य झाला.

महिलांचे इतर सामने:

महात्मा गांधी स्पोर्टस् संघाने संघर्ष मंडळाचा ४१-२५ असा पराभव केला. विश्रांतीला १३-७ अशी आघाडी घेतलेल्या महात्मा गांधी संघाने उत्तरार्धात गतिमान खेळ करून विजय साकारला. प्रतीक्षा सर्वसाने व हर्षा लोंढे महात्मा गांधी संघाकडून उत्कृष्ट खेळल्या, तर प्राची खेडेकर व सृष्टी कोबकर यांनी संघर्ष मंडळाकडून चांगला खेळ केला.

प्रबोधन मंडळाने जगदंब मंडळाचा ४६-१९ असा पराभव केला. पूर्वार्धात २३-१४ अशी आघाडी घेतलेल्या प्रबोधन संघाने उत्तरार्धातही जोश कायम राखत २७ गुणांच्या मोठ्या फरकाने विजय साकारला. या विजयाचे श्रेय आचल पाल व शुभांगी कदम यांच्या सर्वांगसुंदर खेळाला जाते. जगदंबच्या आसावरी पताने एकाकी झुंज दिली.


Post a Comment

0 Comments