महाराष्ट्राच्या संघाच्या यशामागे जिद्द आणि मार्गदर्शनाचा
हातभार – प्रशांत इनामदार
४३वी कुमार-मुली राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धा २५ ते २९ नोव्हेंबर २०२४
या कालावधीत महाराणी अहिल्याबाई होळकर, उत्तर प्रदेश येथे संपन्न झाली. स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या आणि
कुमार संघांनी अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळवले. महाराष्ट्र खो-खो
असोसिएशनचे कार्यालयीन सचिव प्रशांत इनामदार यांनी या स्पर्धेतील अनुभव आणि
संघाच्या कामगिरीबाबत सविस्तर माहिती दिली.
ग्रास कोर्टमुळे प्रारंभिक आव्हाने
“या स्पर्धेतील क्रीडांगण ग्रास कोर्टचे होते, त्यामुळे सुरुवातीला खेळाडूंना या क्रीडांगणाशी जुळवून घेणे
अवघड गेले. गवतावरून पाय घसरत असल्यामुळे खेळाडूंची दमछाक होत होती. तरीही त्यांनी
आपल्या सर्वोत्तम कामगिरीने या अडचणींवर मात केली,” असे
प्रशांत इनामदार म्हणाले.
नियोजनाचा अभाव आणि खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक
राष्ट्रीय स्पर्धेतील नियोजनाचा अभाव स्पष्ट होत होता. “निवास व्यवस्था सुमार
दर्जाची होती, परंतु भोजन
व्यवस्था मात्र सर्वोत्तम होती. खेळाडूंसाठी सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित
करण्यात आले, ज्यामुळे त्यांना विश्रांती मिळाली,” असे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन
संघाच्या यशामागे प्रशिक्षक, सहाय्यक
प्रशिक्षक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. “डॉ. चंद्रजीत
जाधव, सचिन गोडबोले आणि प्रशांत पाटणकर यांनी संरक्षण व
आक्रमणासाठी योग्य धोरणांची आखणी करून खेळाडूंना बोनस गुण कसे मिळवावेत याबाबत
मार्गदर्शन केले,” असे इनामदार यांनी नमूद केले.
मॅटवर अंतिम सामना आणि सरावातील फरक
“मॅटचे क्रीडांगण एकच असल्यामुळे संघांना अंतिम सामना थेट मॅटवर खेळावा लागला.
मॅटचा पूर्ण अंदाज नसल्यामुळे महाराष्ट्राने जास्त फरकाने विजय मिळवला नाही, पण तरीही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
आपल्या खेळाडूंचा सराव सकाळी व सायंकाळी होतो, परंतु तिथे
दिवसभर सामने खेळवले जात होते, त्यामुळे काहीशी आव्हाने
निर्माण झाली,” असे त्यांनी सांगितले.
खेळाडूंचा जिद्दीने विजय
“महाराष्ट्राच्या कुमार संघाने उपउपांत्यपूर्व फेरीतील कोल्हापूर विरुद्धच्या
सामन्यात चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यांतही दोन्ही संघांनी जिद्दीने खेळत
सुवर्णपदक मिळवले,” असे
इनामदार यांनी सांगितले.
प्रशांत इनामदार यांनी संघाच्या कठोर परिश्रम, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि खेळाडूंच्या जिद्दीचे विशेष
कौतुक केले. राज्य निवड समिती आणि राज्य संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ चंद्रजीत जाधव
व कार्याध्यक्ष श्री सचिन गोडबोले यांनी सर्वोत्तम संघ निवडला. त्यांचेही विशेष
कौतुक. या विजयाने महाराष्ट्राच्या खो-खो परंपरेचा गौरव वाढवला आहे.
Post a Comment
0 Comments