Type Here to Get Search Results !

श्री मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धा विहंग, सरस्वती, महात्मा गांधी व ग्रिफिन उपांत्य फेरीत



                

श्री मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धा

विहंग, सरस्वती, महात्मा गांधी व ग्रिफिन उपांत्य फेरीत

 

ठाणे, दि. १ (क्री.प्र.)महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व द अमॅच्युअर खो-खो असोसिएशन ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मावळी मंडळाने शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच विभागीय (राज्यस्तरीय) पुरुष आणि महिलांचे भव्य खो-खो स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा श्री मावळी मंडळाच्या क्रीडांगणात चरई, ठाणे (प.) येथे सुरु आहे. पुरुषांच्या उपांत्य फेरीत विहंग क्रीडा केंद्र (ठाणे), शिर्सेकर्ल महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी (मुंबई उपनगर), सरस्वती स्पो. क्लब (मुंबई) व  ग्रिफिन जिमखाना (ठाणे) तर, महिलांच्या  उपांत्य फेरीत  रा. फ. नाईक संघ (ठाणे), ज्ञानविकास फॉउंडेशन संघ (ठाणे), शिवभक्त स्पोर्ट्स क्लब (ठाणे) व शिर्सेकर्ल महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमी (मुंबई उपनगर) ह्या संघानी प्रवेश केला.

 

महिला गटातील पहिल्या उप-उपांत्य सामन्यात ठाण्याच्या रा. फ. नाईक संघाने ठाण्याच्या राजर्षी शाहू महाराज संघाचा ८-४ असा ४ गुणांनी पराभव करीत एकतर्फी विजय मिळविला. मध्यंतराला  रा. फ. नाईक संघाने २ गुणांची  आघाडी घेतली ती गीतांजली नरसाळे हिने केलेल्या उत्तम संरक्षणामुळे. तिला दीक्षा काटेकरची  उत्तम साथ लाभली.   ह्या सामन्यात  गीतांजली नरसाळे (४:४०, ६:१० मि. संरक्षण), दीक्षा काटेकर (३:३० २:४० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी संघाला विजय मिळवून देण्यास मोलाचा वाटा उचलला पराभूत संघाकडून काजल शेख हिने (३:१०, १:१० मि. संरक्षण व १ गुण) पराभव टाळण्याचा प्रयत्न केला.

 


महिला गटातील दुसऱ्या उप-उपांत्य सामन्यात ठाण्याच्या शिवभक्त स्पोर्ट्स क्लब संघाने  मुंबई शहरच्या ओम साईश्वर सेवा मंडळाचा ७-६ असा ६ मिनिटे राखून १ गुणाने विजय मिळविला.  शिवभक्त स्पोर्ट्स क्लब संघाच्या किशोरी मोकाशीने (६:६०, ६:३० मि. संरक्षण) संघाचा विजय सुकर केला. पराभूत ओम साईश्वरच्या वैष्णवी परब (३.३० मि.), अथश्री तेरवनकर (१.३०, १.५० मि. संरक्षण व २ गुण) व इशाली आंब्रे (१ मि. संरक्षण व ३ गुण) यांनी दिलेली लढत दमदार होती.   

 

पुरुष गटातील पहिल्या उप-उपांत्य सामन्यात ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाने मुंबईच्या विद्यार्थी क्रीडा मंडळाचा  १०-०९ असा १ डाव १ गुणाने पराभव केला.  विहंग क्रीडा मंडळाच्या आकाश साळवे (३, २:२० मि संरक्षण )  व आशिष  गौतम (२:१० मि. संरक्षण व २ गुण ) यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर  पराभूत संघाकडून सम्यक जाधव  (१:४० मि. व २ गुण )  व ओंकार मिरगळ (१:१०, १:३० मि. व १ गुण ) यांनी चांगला खेळ केला.

 

पुरुष गटातील दुसऱ्या उप-उपांत्य सामन्यात  ठाण्याच्या ग्रिफिन जिमखान्याने मुंबई उपनगरच्या श्री सह्याद्री संघावर  १४-११ असा ३ गुणांनी विजय मिळविला. ग्रिफिनच्या  रुपेश कोंबकर (२:२०, १:२० मि.  नाबाद), सिद्धेश चिकणे (१:३०, २:१० मि. व ४ गुण) व आकाश तोरणे (१:४०, १:४० मि. व १ गुण  ) यांनी संघास विजय मिळवून दिला. तर, पराभूत संघाकडून अक्षय भांगरे (२, १:५० मि. व १ गुण ) व सदाशिव पालव (१:२०, १:४० मि. व १ गुण ) यांनी चांगला खेळ केला.      

 

उप-उपांत्य फेरीचे इतर निकाल

पुरुष गट:

मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्ल महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमीने ठाण्याच्या शिवभक्त क्रीडा मंडळाचा २५ -१४ असा ११ गुणांनी पराभव केला तर मुंबईच्या सरस्वती स्पो. क्लबने मुंबईच्याच युवक किडा मंडळाचा १६-११ असा ४ गुणांनी पराभव केला.

 

 महिला  गट :  

 महिला गटात ठाण्याच्या ज्ञानविकास फॉउंडेशनने मुंबई उपनगरच्या श्री सह्याद्री संघावर  १४-०५ असा ९ गुणांनी विजय मिळवला तर मुंबई उपनगरच्या शिर्सेकर्ल महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडेमीने मुंबई शहरच्याच श्री समर्थ व्यायाम मंदिरवर ११-४ असा ७ गुणांनी विजय मिळवला.


Post a Comment

0 Comments