Type Here to Get Search Results !

श्री उद्यानगणेश मंदिर चषक कॅरम स्पर्धेचा थरार सोमवारी रंगणार! मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणातील शालेय कॅरमपटूंमध्ये चुरस


 

श्री उद्यानगणेश मंदिर चषक कॅरम स्पर्धेचा थरार सोमवारी रंगणार!

मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणातील शालेय कॅरमपटूंमध्ये चुरस

 

मुंबई, दि. २ (क्री.प्र.)श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने भव्य "श्री उद्यानगणेश मंदिर चषक" शालेय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीसह विविध जिल्ह्यातील ३६ नामांकित कॅरमपटू मैदानात उतरतील.

 

शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील मंदिर परिसरात होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन समितीचे अध्यक्ष प्रकाश परब, व्यवस्थापक संजय आईर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेतील पहिली लढत अँटोनिओ दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा अर्णव शिंगटे विरुद्ध ठाकूर रामनारायण पब्लिक स्कूल-दहिसरच्या विराज ठाकूर यांच्यात होईल.

 

कॅरमपटूंची लढत – कोण ठरणार विजेता?

शालेय स्तरावर कॅरममध्ये आपली ओळख निर्माण करणारे अनेक प्रतिभावान खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पोद्दार अकॅडमी-मालाडच्या पुष्कर गोळे आणि प्रसन्न गोळे, अँटोनिओ दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम, एसकेकेई स्कूल-मुलुंडचा केवल कुळकर्णी, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे नील म्हात्रे, अर्णव गावडे, निधी सावंत, केतकी मुंडले व सारा देवन, श्री नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, शारदाश्रम विद्यामंदिरचा आरव अन्जर्लेकर, युनिव्हर्सल स्कूल-ठाणेचा श्रेवांश नाके हे नावाजलेले खेळाडू चषकासाठी जोरदार टक्कर देतील.

 

महिला गटातही तगडी स्पर्धा

महिला गटातही चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. शिर्के हायस्कूल-रत्नागिरीची स्वरा मोहिरे, महात्मा गांधी विद्या मंदिर-वांद्रेची तनया दळवी, व्ही.एन. सुळे हायस्कूल-दादरची ग्रीष्मा धामणकर, आदर्श विद्या मंदिरची स्वरा गावडे आणि अस्पी नूतन अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलची धर्मी शुक्ला या प्रतिभावान महिला खेळाडूंमधील चुरस विशेष लक्षवेधी ठरेल.

 

१६ विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे!

या रोमांचक स्पर्धेत पहिल्या १६ विजेत्या आणि उपविजेत्यांना आकर्षक चषक आणि विशेष स्ट्रायकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त आयोजित हा कॅरम महोत्सव विनाशुल्क असून, सर्व क्रीडाप्रेमींसाठी खुला आहे.


🔹 "चॅम्पियन कॅरमपटूंच्या शर्थीच्या लढती पाहण्यासाठी आणि उद्याच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे," असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

 

📍स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, शिवाजी पार्क

🕘 वेळ: सकाळी ९:०० वाजल्यापासून

🏆 कॅरमप्रेमींनो, तयार राहा! सोमवारी होणार आहे जबरदस्त चुरस! 🏆

Post a Comment

0 Comments