Type Here to Get Search Results !

राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धा मिडलाईनचा विजयाचा ‘मिडास टच’; राजाभाऊ देसाई चषकावर मोहोर!


 
राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धा

मिडलाईनचा विजयाचा ‘मिडास टच’; राजाभाऊ देसाई चषकावर मोहोर!

 

मुंबई, दि. १२ (क्री.प्र.) – स्पर्धेच्या पहिल्याच साखळी सामन्यात पराभवाचा धक्का बसलेल्या रायगडच्या मिडलाईन अ‍ॅकॅडमीने कमालीचा पुनरागमन करत ठाणे महानगरपालिकेला धूळ चारली आणि स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषकावर आपली निर्विवाद मोहर उमटवली. मिडलाईनने ठाणे महानगरपालिकेवर ३२-२२ असा सहज विजय मिळवत प्रभादेवीत पहिल्यांदाच जेतेपदाला गवसणी घातली.

 

प्रेक्षकांना अपेक्षित थरार न मिळाला, पण विजयानं गाजवलं मैदान!

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत जयश्री सावंत क्रीडानगरीत कबड्डीचा हा थरार अनुभवण्यासाठी कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मात्र, अपेक्षित चुरस निर्माण न होता मिडलाईनच्या एकतर्फी वर्चस्वाचे प्रदर्शनच सर्वांना पाहायला मिळाले.

 

अंतिम फेरीत मिडलाईनचा विजयी जल्लोष!

मुंबई पोस्टलविरुद्धच्या उपांत्य सामन्यात मिडलाईनने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखत मध्यंतराला २१-१७ अशी आघाडी घेतली होती. मात्र, सौरभ कुलकर्णी आणि शुभम रहाटेच्या जोरदार खेळामुळे पोस्टलने सामन्यात पुनरागमन करत बरोबरी साधली. अखेरच्या दोन मिनिटांत मात्र मिडलाईनने सामन्यावर मजबूत पकड घेत ३९-३२ अशा फरकाने अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.

 

अंतिम लढतीत मिडलाईनचा ‘दमदार’ डाव!

प्रफुल्ल झावरे आणि शुभम दिडनाथने चढाई व पकडींच्या जोरदार खेळाने मध्यंतरापर्यंत मिडलाईनला २२-५ अशी अभेद्य आघाडी मिळवून दिली. ठाणे महानगरपालिकेच्या जावेद पठाण आणि सिद्धेश तटकरे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण मिडलाईनच्या रणनीतीसमोर तो फोल ठरला. अखेर ३२-२२ अशा दणदणीत फरकाने विजय संपादित करत मिडलाईनने ‘राजाभाऊ देसाई चषक’ जिंकत कबड्डीविश्वात आपले नाव कोरले!

 

उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान!

प्रफुल्ल झावरेसर्वोत्तम कबड्डीपटू

बिट्टू बनिवालसर्वोत्तम पकडवीर

साईराज कुंभार (ठाणे महानगरपालिका)सर्वोत्तम चढाईपटू

 

अमदारांच्या उपस्थितीत विजेत्यांचा सन्मान!

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंवर स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने पारितोषिकांचा अक्षरशः वर्षाव केला. सर्वोत्तम खेळाडूला ५ ग्रॅम सोन्याचे नाणे, तर उत्कृष्ट चढाईपटू व पकडवीराला ३ ग्रॅम सोन्याचे नाणे देऊन गौरविण्यात आले.


पुरस्कार वितरण सोहळ्याला आमदार सुनील शिंदे, आयोजक आमदार महेश सावंत, मंडळाचे जयराम शेलार आणि शाखाप्रमुख संजय भगत उपस्थित होते. कबड्डीचा हा अनोखा थरार अनुभवण्यास चाहते उत्सुक होते, आणि मिडलाईनच्या दमदार विजयाने हा थरार अविस्मरणीय ठरला!

Post a Comment

0 Comments