आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धेत नानावटी हॉस्पिटल अंतिम फेरीत
मुंबई, आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नानावटी हॉस्पिटलने बलाढ्य केडीए हॉस्पिटलला ३ विकेटने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू फरहान काझी, प्रणव हरियान, किशोर कुयेस्कर आणि दिनेश पवार यांचा आक्रमक खेळ नानावटी हॉस्पिटलच्या विजयासाठी निर्णायक ठरला.
केडीए हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आघाडीवीर अल्केत तांडेल (५५ चेंडूत ७७ धावा) आणि प्रथमेश महाडिक (३२ चेंडूत ३१ धावा) यांच्या धडाकेबाज खेळामुळे केडीए हॉस्पिटलने २० षटकांत ८ बाद १३५ धावा केल्या. नानावटी हॉस्पिटलच्या गोलंदाजांनी उत्तम प्रदर्शन करत केडीएला जास्त धावा मिळवू दिल्या नाहीत. फरहान काझीने २६ धावांत २ विकेट घेतल्या.
विजयी धावांचा पाठलाग करतांना नानावटी हॉस्पिटलला कडक चाचणी घेतली. मध्य फेरीपर्यंत नानावटी हॉस्पिटलची अवस्था ५ बाद ६० धावा अशी बिकट होती. परंतु प्रणव हरियान (२७ चेंडूत ३३ धावा), किशोर कुयेस्कर (१५ चेंडूत २५ धावा), दिनेश पवार (१४ चेंडूत नाबाद २० धावा) आणि फरहान काझी (१२ चेंडूत नाबाद १३ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीने अंतिम फेरीसाठी आवश्यक धावांचा पाठलाग यशस्वी केला. १९ व्या षटकात नानावटी हॉस्पिटलने ७ बाद १३६ धावा फटकावून विजय मिळवला.
स्पर्धेची अंतिम लढत १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता नानावटी हॉस्पिटल आणि ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल यांच्यात खेळवली जाईल. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने होणाऱ्या या लढतीला भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संजय कदम, उद्योजक वरुण अगरवाल, आणि आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात होईल. या स्पर्धेतील अंतिम लढतीदरम्यान टाटा हॉस्पिटलचे माजी कर्णधार डॉ. एस.एच. जाफरी यांचा विशेष गौरव देखील करण्यात येणार आहे.

Post a Comment
0 Comments