स्वामी समर्थच्या ‘दमदार’ कबड्डी स्पर्धेचा आजपासून थरार!
विजेत्याला लाखाचा पुरस्कार तर सर्वोत्तम खेळाडूंना सोनं
मुंबई | ८ फेब्रुवारी २०२५, गेल्या आठ
दशकांपासून कबड्डीचा जल्लोष साजरा करणाऱ्या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा
मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेला आजपासून थरारक सुरुवात
होत आहे व हा थरार शनिवारपासून ११ फेब्रूवारीपर्यंत रंगणार आहे. प्रो कबड्डीला साजेशा अव्वल १२
व्यावसायिक संघांच्या आक्रमक चढाओढीत इन्शुअरकोट स्पोर्टस् (युवा पलटन),
युनियन बँक, मुंबई महानगर पालिका, ठाणे महानगर पालिका, रिझर्व्ह
बँक,
मिडलाईन अॅकॅडमी, मुंबई पोर्ट ट्रस्ट अशा एकापेक्षा एक संघांचा खेळ चवन्नी
गल्लीत उभारलेल्या क्रीडानगरीतील एका मॅटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे.
नेहमीच कबड्डी संघांना, कबड्डीपटूंना आणि कबड्डीप्रेमींना आपलेसे करणार्या स्वामी
समर्थने यंदाही दिमाखदार आयोजनाची सर्व तयारी पूर्ण केली असून कबड्डीचा खेळ कसदार
आणि ग्लॅमरस कसा होईल याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. तरूणांनाही लाजवेल अशा ८१
वर्षांच्या स्फूर्तीदायक संघाने विजेत्या संघाला १,११,१८१ रुपयांचे रोख इनाम आणि झळाळता राजाभाऊ देसाई चषक प्रदान करणार असल्याची
माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह आणि आमदार महेश सावंत यांनी दिली. तसेच उपविजेताही
८००८१ रुपयांचा मानकरी ठरेल. या स्पर्धेच्या उद्घाटनाला कबड्डी क्षेक्षातील
आजी-माजी दिग्गजांसह माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचीही उपस्थिती लाभणार
आहे.
सर्वोत्तम खेळाडूंचा सोने पे सुहागा
स्पर्धेत वैयक्तिक पुरस्कारांपोटी रोख इनाम किंवा बाईक व
अन्य गोष्टी दिल्या जातात, पण यावेळी स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूला सोनेरी पुरस्कार लाभणार आहे. स्पर्धेत
धडाकेबाज खेळ करत सर्वोत्तम पुरस्काराचा मान मिळवणारा खेळाडू पाच ग्रॅम सोन्याचे
बक्षीस पटकावेल. तसेच सर्वोत्तम चढाईपटू आणि पकडबहाद्दराला तीन ग्रॅमचे सोन्याचे
नाणे दिले जाणार असल्याची माहिती मंडळाचे क्रीडाप्रमुख रवी शिंदे यांनी दिली.
एवढेच नव्हे तर दिवसातील सर्वोत्तम खेळाडूला पाच हजारांचे इनाम दिले जाणार असून
प्रत्येक सामन्याचा मानकरी बाइक चालवताना घातले जाणारे हेल्मेट प्रदान केले जाणार
आहे.
राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेतील गटवारी
अ गट - भारत
पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल), ठाणे महानगर पालिका, रुपाली ज्वेलर्स, अॅग्रीकल्चर प्रोड्युसर मार्केट कमिटी (एपीएमसी),
पुणे.
ब गट- मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम),
न्यू इंडिया अॅश्युरन्स, मिडलाईन अॅकेडमी.
क गट- आयएसपीएल (युवा पलटण), त्रिमूर्ती इंटरप्राइजेस, मुंबई पोस्टल.
ड गट- मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमपीटी),
युनियन बँक, रिझर्व्ह बँक.

Post a Comment
0 Comments