आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धेत
नानावटी हॉस्पिटलला विजेतेपद
तर ब्रीच कॅन्डीचा पराभव
मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी-२० क्रिकेट स्पर्धेत नानावटी हॉस्पिटलने ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा ५९ धावांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले. या विजयी कामगिरीत कप्तान ओमकार जाधव, अष्टपैलू विशाल चतुर्वेदी, प्रणव करियन आणि फिरकीपटू रविकांत गुरव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि एलआयसी यांच्या सहकार्याने झालेल्या या अंतिम सामन्यात नानावटी हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर ओमकार जाधवने ६१ चेंडूंत ९६ धावांची खेळी साकारत संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्याला विशाल चतुर्वेदीने (३६ चेंडूत ५२ धावा) आणि प्रणव करियनने (१९ चेंडूत नाबाद ४८ धावा) चांगली साथ दिली. या फटकेबाज खेळीमुळे नानावटी हॉस्पिटलने २० षटकांत २ बाद २१५ धावांचा भक्कम स्कोअर उभारला.
ब्रीच कॅन्डीचा संघर्ष अपुरा
विजयासाठी २१६ धावांचे आव्हान स्वीकारून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. कप्तान प्रदीप क्षीरसागर (२० चेंडूत २१ धावा) आणि रोहन महाडिक (१६ चेंडूत २४ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर नानावटीच्या फिरकीपटू रविकांत गुरव (४१ धावांत ३ बळी) आणि फरहान काझी (२४ धावांत २ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी करत ब्रीच कॅन्डीच्या फलंदाजांना मोठी खेळी साकारण्याची संधी दिली नाही. अरुण पारचा (१६ चेंडूत ३४ धावा) याने संघर्ष केला, पण संघाला विजय मिळवून देता आला नाही. ब्रीच कॅन्डीचा डाव २० षटकांत ९ बाद १५६ धावांवर आटोपला आणि नानावटी हॉस्पिटलने ५९ धावांनी विजय मिळवला.
सन्मान आणि पुरस्कार वितरण
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी विजेते व उपविजेत्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी क्रिकेटपटू डॉ. एस.एच. जाफरी, उद्योजक परविंदरसिंग राठोर, डॉ. विस्पी आन्टीया, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे, क्रिकेटप्रेमी शौनक संख्ये आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण उपस्थित होते.
स्पर्धेत ओमकार जाधवला "सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू", शंतनू मोरेला "उत्कृष्ट फलंदाज", तर रोहित सोळंकीला "उत्कृष्ट गोलंदाज" म्हणून सन्मानित करण्यात आले. खेळाडूंचे कौतुक करताना भारतीय कामगार सेनेचे चिटणीस राजा ठाणगे, सहसचिव मिलिंद तावडे आणि विजय शिर्के यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments