Type Here to Get Search Results !

जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय भारत, जय दत्तगुरु, वारसलेन, दुर्गामाता संघांची दुसऱ्या फेरीत मजल


जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय भारत, जय दत्तगुरु, वारसलेन, दुर्गामाता संघांची दुसऱ्या फेरीत मजल

 

स्व. अनंतशेठ नागवेकर चषक – २०२५’ कुमार गट स्पर्धा रंगतदार लढतींनी सजली

 

मुंबई: जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र.१९३ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, स्व. अनंतशेठ नागवेकर चषक कुमार गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जोरदार रंगतदार लढतींसह सुरू आहे. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि स्व. शीला खाटपे मॅटच्या मैदानावर ही स्पर्धा भरत असून, आजच्या सामन्यांमध्ये जय भारत, जय दत्तगुरु, वारसलेन आणि दुर्गामाता संघांनी दुसऱ्या फेरीत धडक मारत आपली ताकद दाखवून दिली.

 

जय भारतचा जोश, न्यू परशुरामचा प्रतिकार फिका

पहिल्या सामन्यात जय भारत संघाने न्यू परशुराम संघाचा ५५-२८ असा धुव्वा उडवला. सुरुवातीला न्यू परशुरामने झंझावाती सुरुवात करत लोण देत १०-०२ अशी आघाडी घेतली होती. मात्र, जय भारतने धीर न सोडता एकामागून एक चढाया करत सामन्याचे चित्र पालटले. आर्यन बावडेकर आणि अक्षय मटकर यांच्या दमदार खेळाच्या जोरावर त्यांनी सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवले. न्यू परशुरामकडून समर्थ कासुर्डे व अथर्व गोराडे यांचा पहिल्या सत्रातील खेळ उल्लेखनीय होता.

 

जय दत्तगुरुची सहज विजयी आगेकूच

दुसऱ्या सामन्यात जय दत्तगुरु संघाने वीर नेताजी संघावर ३४-२३ अशी मात करत दुसरी फेरी गाठली. सामन्याच्या पहिल्याच पाचव्या मिनिटाला लोण देत १०-० अशी भक्कम सुरुवात त्यांनी केली. आदित्य घोडेराव आणि साहिल केवट यांच्या खेळाने विजय सुलभ केला. वीर नेताजीकडून पुष्कर चव्हाण व सर्वेश ठाकरे यांनी चांगला प्रयत्न केला.

 

वारसलेनचा सहज विजय, अमरहिंदला धक्का

तिसऱ्या सामन्यात वारसलेन संघाने अमरहिंदवर ४४-२४ अशी सहज मात करत आपला दबदबा दाखवून दिला. पूर्वार्धात २२-०९ अशी आघाडी घेत वारसलेनने दोन्ही सत्रांत १-१ लोण देत सामन्यावर शिक्कामोर्तब केले. निलेश परब व अर्जुन सुर्वे यांच्या अष्टपैलू खेळाने विजय निश्चित केला. अमरहिंदकडून ऋषिकेश साळवी काही काळ झगडला.

 

दुर्गामाताचा चक्‍कादार विजय

शेवटच्या सामन्यात दुर्गामाता स्पोर्ट्सने सिद्धीप्रभा संघाचा ३६-१४ असा फडशा पाडत जबरदस्त विजयी घोडदौड सुरू ठेवली. सुजल पंदेरे व विघ्नेश गुरव यांच्या चढाई-पकडीच्या झंझावातासमोर सिद्धीप्रभा टिकू शकला नाही. पहिल्याच सत्रात दोन लोण देत त्यांनी २८-०४ अशी निर्णायक आघाडी घेतली होती. सिद्धीप्रभाकडून शांतनू नाईकने काही क्षण झुंज दिली.


Post a Comment

0 Comments