Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राची जिम्नॅस्टिकमध्ये ऐतिहासिक झेप १४ वर्षांनी सांघिक कांस्य, ज्युनियर गटात सुवर्ण आणि रौप्याची कमाई!


 

महाराष्ट्राची जिम्नॅस्टिकमध्ये ऐतिहासिक झेप

१४ वर्षांनी सांघिक कांस्य, ज्युनियर गटात सुवर्ण आणि रौप्याची कमाई!

 

पुणे : बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने तब्बल १४ वर्षांनंतर सांघिक गटात पदक पटकावत इतिहास घडवला. पुरुषांच्या वरिष्ठ गटात कांस्यपदक, ज्युनियर मुलींच्या गटात सुवर्ण आणि मुलांच्या गटात रौप्यपदक अशी दमदार पदकसाखळी महाराष्ट्राने आपल्या नावे केली.

 

१४ वर्षांची प्रतीक्षा संपली!

२०११ नंतर प्रथमच महाराष्ट्राने पुरुष वरिष्ठ गटात सांघिक कांस्यपदकाची कमाई केली. सिद्धांत कोंडे, ओंकार शिंदे, मनीष गाढवे, हर्ष धुमाळे, आकाश धुवाळी आणि चैतन्य देशमुख या जिद्दी संघाने २०६.३० गुणांची कमाई करत तिसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारली. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (२१४.३० गुण) आणि सर्विसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (२१३.८५ गुण) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पटकावले.

 

ज्युनियर मुलींचा झंझावात – सुवर्ण हेरले!

साक्षी दळवी, कार्या अधिकारी, अलीशा चौधरी, रिद्धी जाट्टी, डियरा मेहता व मुग्धा मोरे यांनी महाराष्ट्राच्या मुलींसाठी इतिहास रचला. त्यांच्या तडाखेबाज कामगिरीमुळे संघाने १५८.७० गुणांसह सुवर्णपदकावर कब्जा केला. कर्नाटक (१५१.७०) व पश्चिम बंगाल (१५१.५५) अनुक्रमे रौप्य व कांस्यावर समाधान मानावे लागले.

 


ज्युनियर मुलांनी थोडक्यात सुवर्ण गमावले

कौस्तुभ अहिरे, अनय किर्लोस्कर, प्रसून अमळनेरकर, प्रिन्स जैन, आध्यान देसाई व कौस्तुभ बेरी यांच्या चमकदार कामगिरीने महाराष्ट्राच्या ज्युनियर मुलांनी २७१.४५ गुणांसह रौप्यपदक पटकावले. केवळ काही गुणांनी मागे पडत त्यांनी सुवर्णाची हुलकावणी दिली. पश्चिम बंगालने (२७२.२५) सुवर्ण पटकावले, तर उत्तर प्रदेशने कांस्य मिळवले.


संजय शेटे यांनी व्यक्त केला अभिमानाचा :

तब्बल २० वर्षांनंतर महाराष्ट्राला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. यंदाच्या स्पर्धेत मुलांचे २२ राज्यांमधून व मुलींचे १७ राज्यांमधून खेळाडू सहभागी झाले. एकूण ७०० खेळाडूंनी स्पर्धेला रंगत आणली,”
संजय शेटे, अध्यक्ष, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक असोसिएशन


महाराष्ट्राची पदके :

वरिष्ठ पुरुष गट (सांघिक): कांस्य, ज्युनियर मुली (सांघिक): सुवर्ण, ज्युनियर मुले (सांघिक): रौप्य

या यशामुळे महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक क्षेत्रात नवचैतन्य आले असून, पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी उत्साह व तयारीला नवे बळ मिळाले आहे!


Post a Comment

0 Comments