Type Here to Get Search Results !

७ वी खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार २०२५ महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव – सिद्धेश घोरपडेची पदक हॅट्ट्रिक, टेबल टेनिसमध्ये सुवर्ण चमक


 

७ वी खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार २०२५
महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव – सिद्धेश घोरपडेची पदक हॅट्ट्रिक, टेबल टेनिसमध्ये सुवर्ण चमक

 

राजगीर (बिहार) : बिहारच्या भूमीवर सुरु असलेल्या ७व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने गुरुवारी सुवर्ण महोत्सव साजरा केला! ५१ पदकांची कमाई करत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपली दबदबा कायम राखला आहे.

 

विशेष म्हणजे टेबलटेनिसच्या दुहेरीत सुवर्ण जिंकत महाराष्ट्राच्या काव्या भट आणि दिव्याश्री भौमिक या मुलींनी राज्यासाठी ५०वे पदक पटकावले. त्याआधी पुण्याच्या सिद्धेश घोरपडे याने सलग तिसऱ्या दिवशी सायकलिंगमध्ये पदक जिंकून पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली.

 

देशातील एकमेव राज्य म्हणून खेलो इंडिया स्पर्धेत पदकांचं अर्धशतक गाठणारा महाराष्ट्र हा एकमेव प्रदेश ठरला आहे. ५व्या दिवशी २० सुवर्ण, १६ रौप्य आणि १५ कांस्य अशी जबरदस्त कामगिरी करून महाराष्ट्राने अव्वल स्थानी आपलं नाव कोरलं.

 

सिद्धेश घोरपडेचं सुवर्ण सायकलिंगमध्ये वर्चस्व

दिल्लीतील यमुना वेलोड्रममध्ये पार पडलेल्या ट्रॅक सायकलिंग स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सिद्धेशने केरिन रेस प्रकारात दमदार खेळी करत सुवर्ण पटकावलं. त्याने याआधी स्क्रॅच रेसमध्ये सुवर्ण आणि इंडिव्हिज्युअल परशूट प्रकारात रौप्य जिंकत तीन दिवसांत तीन पदकं मिळवली – खरीच 'हॅट्ट्रिक हिरो'! 

मुलींचा टेबल टेनिसमध्ये झंझावात

राजगीर क्रीडा संकुलात महाराष्ट्राच्या काव्या भट आणि दिव्याश्री भौमिक या जोडीने टेबलटेनिस दुहेरीत धमाकेदार खेळ करत पश्चिम बंगालच्या जोडीला सरळ गेम्समध्ये (११-६, ११-९, ११-७) पराभूत करत सुवर्णावर नाव कोरलं. बंगालसारख्या बलाढ्य संघाला हरवणे ही मोठी कामगिरी आहे. चेन्नई व बेंगळुरु येथे सराव करणाऱ्या या दोघींच्या मेहनतीचं हे फळ आहे.

 


एकूण पदकांची आकडेवारी

महाराष्ट्राने आतापर्यंत जलतरणात सर्वाधिक १९, तर आर्चरीत ६ सुवर्णांसह ९ पदकं जिंकली आहेत. मल्लखांबमध्येही राज्याने २ सुवर्णांसह ९ पदकं घेत उपविजेतेपद पटकावलं. सायकलिंगमध्येही ६ पदकांसह उपविजेतेपद मिळालं आहे.

 

महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या या भव्यदिव्य यशाने पुन्हा एकदा सिद्ध केलं – "खेळ ही केवळ स्पर्धा नव्हे, ती महाराष्ट्रासाठी गौरवाची परंपरा आहे!"

 

महाराष्ट्राची आघाडी कायम

एकूण पदके: ५१, (२० सुवर्ण, १६ रौप्य, १५ कांस्य)

 

प्रमुख क्रीडा क्षेत्रातील झळाळी

जलतरण: १९ पदके, आर्चरी: ६ सुवर्णांसह ९ पदके, सायकलिंग: ३ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य, मल्लखांब: २ सुवर्ण, ५ रौप्य, २ कांस्य (९ पदके)

 

महाराष्ट्राने देशातील इतर राज्यांपेक्षा पदकांची अर्धशतक हॅट्ट्रिक सर्वप्रथम पूर्ण करत, खेलो इंडिया युवा स्पर्धांमध्ये आपली अव्वलता सिद्ध केली आहे.

Post a Comment

0 Comments