पदार्पणातच जागतिक यश!
निरव कोळीने केटलबेल स्पर्धेत पटकावले रौप्यपदक
मुंबई : मुंबईच्या मातीत घडलेल्या आणि तडफदार कामगिरीने
सर्वांना अचंबित करणाऱ्या निरव कोळीने स्पेनच्या पाल्मा डे मॉलओरका शहरात झालेल्या
विश्व केटलबेल स्पर्धेत
थेट रौप्य पदक पटकावले. विशेष म्हणजे ही त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील
पहिलीच झलक होती आणि त्यातच त्याने आपल्या अप्रतिम खेळीने भारतासाठी एकमेव पदकाची
कमाई केली!
या थरारक स्पर्धेत तब्बल २२ देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून आठ खेळाडूंनी सहभाग घेतला,
परंतु त्यांच्यातून एकट्या महाराष्ट्राच्या निरवने आपल्या
खेळीने देशाची शान उंचावली. ७५ ते ८५ किलो खुल्या वजनी गटात खेळताना, ‘गेम जर्क’ प्रकारात निरवने १४२ गुणांची घवघवीत कमाई केली आणि थेट रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
माझगाव, ताडवाडी येथे राहणारा हा तरुण गेली पाच वर्षे केटलबेल या क्रीडाप्रकारात सातत्याने घाम गाळत
आहे. त्याचे प्रशिक्षक अर्णव सरकार यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळेच निरवने आंतरराष्ट्रीय
पातळीवरही आपली छाप उमटवली. जागतिक स्पर्धेपूर्वी दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेत
दमदार कामगिरी करत निरवने सीएमएस रँक प्राप्त केली आणि जागतिक पटलावर झेप घेण्याचा हक्क मिळवला.
आजच्या घडीला फिटनेस प्रोफेशनल म्हणून कार्यरत असलेल्या निरवची ही कामगिरी तरुण पिढीसाठी
निश्चितच प्रेरणादायी आहे. या यशामुळे केवळ मुंबईच नव्हे,
तर संपूर्ण महाराष्ट्र व देशभरात आनंदाचं वातावरण निर्माण
झालं आहे.


Post a Comment
0 Comments