Type Here to Get Search Results !

अडसूळ ट्रस्ट शालेय कॅरम स्पर्धा सिबिईयु, मोरे प्रतिष्ठान, अविनाश स्पोर्ट्स, एमडीसी ज्वेलर्सची विजयी झंझावात!


 

अडसूळ ट्रस्ट शालेय कॅरम स्पर्धा

सिबिईयु, मोरे प्रतिष्ठान, अविनाश स्पोर्ट्स, एमडीसी ज्वेलर्सची विजयी झंझावात!

 

मुंबईमहाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या उत्सवात भर घालत, एलआयसी प्रायोजित आणि आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, सीबिईयु आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनाशुल्क शालेय सुपर लीग कॅरम स्पर्धेत चुरशीचे सामने रंगले! सिबिईयु वॉरियर्स, आत्माराम मोरे प्रतिष्ठान, अविनाश नलावडे स्पोर्ट्स आणि एमडीसी ज्वेलर्स संघांनी आपली विजयी घौडदौड सुरू ठेवत उपस्थितांना खेळाची मेजवानी दिली.

 

सिबिईयु वॉरियर्स विरुद्ध गोविंदराव मोहिते फायटर्स यांच्यातील सामना विशेष लक्षवेधी ठरला. नील म्हात्रेने उमैर पठाणविरुद्ध १२-८ अशी आघाडी मिळवत मोहिते फायटर्ससाठी दमदार सुरुवात केली. पण मग रंगात आले प्रसाद माने आणि सारा देवन! त्यांनी आपापले सामने जिंकत सिबिईयु वॉरियर्सला २-१ असा निर्णायक विजय मिळवून दिला.

 

दुसऱ्या सामन्यात आत्माराम मोरे प्रतिष्ठानने सुरेश आचरेकर फिनिशर्स संघावर २-१ अशी मात केली. लहान वयात मोठा पराक्रम करत श्रीशान पालवणकरने तनया दळवीसारख्या राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूला १६-१५ असे हरवले, तर मयुरेश पवारने सोहा पठाणला २५-० असा धक्का दिला. आर्यन राऊतने आपल्या संघासाठी एकमात्र विजय मिळवला.

 

अविनाश नलावडे स्पोर्ट्स संघानेही आनंदराव प्लॅटिनम संघाविरुद्ध २-१ अशी बाजी मारली. वेदांत पाटणकरने देविका जोशीला १९-४ आणि तीर्थ ठक्करने अनय म्हेत्रेला २५-१० असे नमवत विजयाची दिशा स्पष्ट केली.

 

एक रोमांचक लढत होती ती एमडीसी ज्वेलर्स विरुद्ध अभिजित घोष फ्लेअर प्ले. अमेय जंगम आणि वेदिका पोमेंडकर यांच्या अचूक खेळीमुळे एमडीसी ज्वेलर्सने बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचा २-१ असा पराभव केला.

 

या स्पर्धेत पंच म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण प्रमोद पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत करंगुटकर, सचिन शिंदे, संतोष जाधव, अविनाश महाडिक, प्रॉमिस सैतवडेकर आदींच्या कुशल देखरेखीखाली सामने पार पडत आहेत.

 

शालेय पातळीवरील खेळाडूंना व्यासपीठ देणारी ही स्पर्धा नवे खेळाडू घडवण्याची आणि स्पर्धात्मकता निर्माण करण्याची चळवळ ठरत आहे. पुढील फेऱ्यांत कोण चमकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!


Post a Comment

0 Comments