Type Here to Get Search Results !

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा खो-खोमध्ये महाराष्ट्राचा झंझावात! दोन्ही संघांची विजयी आगेकूच


खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा

खो-खोमध्ये महाराष्ट्राचा झंझावात! दोन्ही संघांची विजयी आगेकूच

 

गया (बिहार) : गतविजेते महाराष्ट्राचे मुली व मुले खो-खो संघ यांनी आपल्या भक्कम परंपरेला साजेसा खेळ करत ७व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवित दोन्ही संघांनी सलग दुसऱा विजय नोंदवत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

 

मुलींच्या सामन्यात यजमान बिहारवर धडाकेबाज वर्चस्व!

महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने बिहारवर ६१-१५ अशा तब्बल ४६ गुणांनी विजय मिळवत आपली ताकद पुन्हा सिद्ध केली. या सामन्यात अमृती पाटील हिचा खेळ विशेष उठून दिसला. तिने तब्बल १० गडी बाद करत २० गुणांची कमाई केली. प्रिती ढाकर्गे हिने संरक्षणात नाबाद १.२० मिनिटे व दुसऱ्या डावात ३.४० मिनिटे पळत दमदार बचाव केला. शिवाय आक्रमणात ८ गुण मिळवत अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवले. मैथेली पोवार हिनेही २.४० मिनिटांची पळती आणि ४ गुणांची कमाई करत चमकदार अष्टपैलू कामगिरी केली, तर श्रद्धा नागदिवे हिने आक्रमणातून ८ गुण जोडले. बिहारकडून श्रुती सिंग (नाबाद १.२० मिनिटे पळती, २ गुण) व अनमोल कुमारी (४ गुण) यांनी काहीसा प्रतिकार केला, मात्र तो अपुरा ठरला.

 

मुलांच्या लढतीत आंध्र प्रदेशवर महाराष्ट्राचा धडाका!

मुलांच्या विभागात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशला ५४-१० अशा ४४ गुणांनी पराभूत करत एकतर्फी वर्चस्व गाजवले. शंकर यादव याने १० गडी टिपून सर्वाधिक २० गुणांची कमाई करत सामन्याचा हिरो ठरला. शरद घाटगे (नाबाद १.४० मिनिटे, ३ मिनिटांची पळती, ४ गुण), कृष्णा बनसोडे (नाबाद २.४० मिनिटे, २ गुण) व राज यादव (२.३० मिनिटे, २ गुण) यांनीही अष्टपैलू योगदान देत विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात आंध्र प्रदेशला महाराष्ट्राचे केवळ दोनच गडी बाद करता आले, हे महाराष्ट्राच्या एकतर्फी वर्चस्वाचे प्रतीक ठरले.

 

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी केलेल्या या पराक्रमी खेळीने पुढील फेऱ्यांतही त्यांच्याकडून भक्कम कामगिरीची अपेक्षा वाढली आहे. खेळाडूंच्या उत्साहात भर घालणाऱ्या या विजयांनी ‘खेलो इंडिया’त महाराष्ट्र पुन्हा एकदा अग्रस्थानाच्या शर्यतीत आघाडीवर येताना दिसतोय.


Post a Comment

0 Comments