Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा खो-खो अध्यक्षपदी समीर मुळे, तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश जैस्वाल बिनविरोध नव्या नेतृत्वाकडून विकासाची ग्वाही छत्रपती संभाजीनगरमध्ये खो-खोचा नवा झेंडा उंचावला! खो-खोच्या नव्या युगाची सुरुवात!

 


छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा खो-खो अध्यक्षपदी समीर मुळे, तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश जैस्वाल बिनविरोध

नव्या नेतृत्वाकडून विकासाची ग्वाही

छत्रपती संभाजीनगरमध्ये खो-खोचा नवा झेंडा उंचावला!

खो-खोच्या नव्या युगाची सुरुवात!

 

छत्रपती संभाजीनगर  : खो-खोच्या मातीतून घडणाऱ्या संघर्ष, शिस्त आणि जिद्दीच्या परंपरेला नवी दिशा देत छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या चौवार्षिक निवडणुकीत नव्या नेतृत्वाची दमदार एन्ट्री झाली आहे! दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, कांचनवाडी येथे पार पडलेल्या निवडणुकीत श्री. समीर पद्माकर मुळे यांची अध्यक्षपदी तर श्री. ऋषिकेश जैस्वाल यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड होताच खो-खो वर्तुळात उत्साहाची लाट उसळली.

 

निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतेने संपन्न

निवडणूक प्रक्रियेत अ‍ॅड. विनायक कापकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली, तर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने निरीक्षक म्हणून डॉ. पवन पाटील यांनी काम पाहिले. निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. तसेच जिल्हा असोसिएशनचे कोषाध्यक्ष स्व. श्रीपाद लोहकरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

नवीन कार्यकारिणीची दमदार फळी जाहीर

सन २०२६ ते २०३० या कालावधीसाठी अध्यक्षपदी उद्योजक श्री. समीर पद्माकर मुळे, उपाध्यक्षपदी श्री. ऋषिकेश जैस्वाल, सारिका भंडारी, कार्याध्यक्ष अ‍ॅड. बालाजी सगर – किल्लारीकर, सचिव श्री. विकास सूर्यवंशी, सहसचिव भारती काकडे, अभयकुमार नंदन, कोषाध्यक्ष दिपक सपकाळ, सदस्य गोविंद शर्मा, विनायक राऊत, आशिष कान्हेड, तेजस्विनी बाहेती, योगेश सोळुंके, योगेश मुंगीकर, उमेश साबळे, स्वीकृत सदस्य प्रा. डॉ. युसुफ पठाण, सागर बांदार, शुभम सुरळे यांची निवड करण्यात आली.

 

जिल्हा उपसमिती पंच मंडळात श्री. गौतम निसर्गंध, श्री. विजयकुमार दारुंटे, श्री. नवनाथ राठोड, श्री. तात्याराव म्हस्के यांचा समावेश करण्यात आला, तर तांत्रिक समितीत श्री. श्रीकांत पाध्ये, श्री. काशिनाथ दांडगे, श्री. शिवम घुले, श्री. राहुल नवले, श्री. मनोज गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे सचिन मुळे, डॉ. दिपक मसलेकर, प्रा. डॉ. युसुफ पठाण यांनी अभिनंदन केले.

 

खो-खोला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देणार” – समीर मुळे

नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. समीर पद्माकर मुळे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महाराष्ट्राच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खोला प्रोत्साहन, प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.” ग्रामीण भागातील होतकरू व गुणी खेळाडूंना संधी देण्यासाठी नियमित प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातील तसेच लवकरच राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. “प्रत्येकाने एकतरी खेळ खेळला पाहिजे. खेळ तरुणांना उत्साह, ऊर्जा आणि नेतृत्व गुण देतो,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

 

ही संघटना नाही, हा खो-खो परिवार आहे” – ऋषिकेश जैस्वाल

उपाध्यक्ष श्री. ऋषिकेश जैस्वाल यांनी भावनिक शब्दांत सांगितले, “भारतीय खेळ खो-खो अधिक लोकप्रिय कसा करता येईल, यावर आपण सर्वजण एकत्रितपणे विचार करू. आपल्या पाठीशी सकारात्मक सहकार्य असेल.” त्यांनी पुढे नमूद केले की, “ही केवळ संघटना नसून हा खो-खो परिवार आहे. परिवाराचा सदस्य म्हणून ज्या सुविधा आवश्यक असतील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू.”

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खो-खो प्रेमींसाठी ही निवडणूक केवळ पदनियुक्ती नसून नव्या उमेदीचा आणि विकासाच्या दिशेने टाकलेले ठाम पाऊल आहे. नव्या कार्यकारिणीकडून जिल्ह्यातील खो-खोला नवे बळ आणि नवी ओळख मिळेल, असा विश्वास क्रीडावर्तुळात व्यक्त होत आहे.

 


Post a Comment

0 Comments