युनियन बँक ऑफ इंडियाचा थरारक विजय;
क्रिश सिंगचे नाबाद
शतक ठरले निर्णायक
इन्शुरन्स शील्ड क्रिकेट स्पर्धेत जीआयसीवर ७ धावांनी मात;
बँक ऑफ इंडियाचाही
दणदणीत विजय
मुंबई: क्रॉस
मैदानावरील युनायटेड क्रिकेटर्स ग्राउंडवर रंगलेल्या इन्शुरन्स शील्ड क्रिकेट
स्पर्धेत फलंदाजांच्या झंझावाती खेळीने आणि गोलंदाजांच्या अचूक माऱ्याने
क्रिकेटप्रेमींना रोमांचक अनुभव दिला. युनियन बँक ऑफ इंडिया संघाने उत्कृष्ट
संघभावना आणि धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर जीआयसी रिक्रिएशन क्लबवर ७ धावांनी
थरारक विजय मिळवला, तर
दुसऱ्या सामन्यात बँक ऑफ इंडिया संघाने बॉम्बे मर्केंटाईल को-ऑप बँकेवर सहज मात
करत आपली ताकद दाखवून दिली.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आयोजित या प्रतिष्ठेच्या
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात युनियन बँक ऑफ इंडियाचा स्टार फलंदाज क्रिश सिंग याने
शानदार नाबाद १०६ धावांची खेळी साकारत मैदान गाजवले. त्याने केवळ २० षटकांच्या
डावात ९ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी करत संघाला ४ बाद १६१ धावांचा भक्कम टप्पा
गाठून दिला. क्रिशच्या या धडाकेबाज शतकामुळे प्रतिस्पर्धी संघावर मोठा दबाव
निर्माण झाला.
प्रत्युत्तरात जीआयसी रिक्रिएशन क्लबकडून सुमीत सेलोकर
यानेही अप्रतिम फलंदाजी करत नाबाद १०४ धावा केल्या. त्याच्या खेळीत ८ चौकार आणि ५
षटकारांचा समावेश होता. मात्र, इतर
फलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने जीआयसी संघ ४ बाद १५४ धावांपर्यंतच मजल
मारू शकला आणि युनियन बँक ऑफ इंडियाने ७ धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसऱ्या सामन्यात बँक ऑफ इंडियाच्या गोलंदाजांनी वर्चस्व
गाजवत बॉम्बे मर्केंटाईल को-ऑप बँकेचा डाव अवघ्या ७२ धावांत गुंडाळला. नितीन कडाळे
याने घातक गोलंदाजी करत १८ धावांत ६ बळी घेत प्रतिस्पर्धी फलंदाजीची कणा मोडली, तर आर्य गायकवाडने ३ बळी घेत त्याला मोलाची
साथ दिली.
७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बँक ऑफ इंडियाने
चिराग मोडक (२५) आणि नितीन कडक (२१) यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर केवळ ८
षटकांत ३ बाद ७५ धावा करत ७ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.
या सामन्यांतील उत्कृष्ट फलंदाजी, प्रभावी गोलंदाजी आणि उत्कट
स्पर्धात्मकतेमुळे इन्शुरन्स शील्ड स्पर्धा अधिक रंगतदार बनली असून पुढील
सामन्यांसाठी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Post a Comment
0 Comments