Type Here to Get Search Results !

चेन्नई पोर्ट आणि न्यू मंगळोर पोर्टची दणदणीत घोडदौड! ४४ व्या अखिल भारतीय प्रमुख बंदरे क्रिकेट स्पर्धेत रितिक ईश्वरन आणि मृणाल कुमार यांची विक्रमी कामगिरी आरसीएफ मैदानावरही अष्टपैलू खेळाडूंचा जलवा

 


चेन्नई पोर्ट आणि न्यू मंगळोर पोर्टची दणदणीत घोडदौड!

४४ व्या अखिल भारतीय प्रमुख बंदरे क्रिकेट स्पर्धेत रितिक ईश्वरन आणि मृणाल कुमार यांची विक्रमी कामगिरी आरसीएफ मैदानावरही अष्टपैलू खेळाडूंचा जलवा

 

मुंबई : मुंबईतील क्रिकेट मैदानावर धडाकेबाज फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि विजयी जल्लोषाचा अक्षरशः स्फोटच पाहायला मिळाला! ४४ व्या अखिल भारतीय प्रमुख बंदरे क्रिकेट स्पर्धा २०२५-२६ च्या दुसऱ्या दिवशी चेन्नई पोर्ट, न्यू मंगळोर पोर्ट, एसएम पोर्ट अथॉरिटी (कोलकाता) आणि व्हीओसी पोर्ट यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत शानदार विजय मिळवले. विशेषतः रितिक ईश्वरन यांचे अवघ्या २९ चेंडूत १०३ धावांचे वादळी शतक आणि मृणाल कुमार यांची १०२ धावा व ३ विकेट्सची अष्टपैलू कामगिरी हे दिवसाचे मुख्य आकर्षण ठरले.

 

रितिक ईश्वरनचा तडाखा; चेन्नई पोर्टचा ९ विकेट्सने दणदणीत विजय

कर्नाटक क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्यात जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीए) संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ बाद १५४ धावा केल्या. यात संस्कार म्हात्रे यांनी ३४ चेंडूत ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

 

प्रत्युत्तरात चेन्नई पोर्ट संघाने आक्रमक सुरुवात करत अवघ्या ९.१ षटकांत १ बाद १५६ धावा करत सामना एकतर्फी जिंकला. या विजयाचा शिल्पकार ठरलेले रितिक ईश्वरन यांनी फक्त २९ चेंडूत १०३ धावांचे विस्फोटक शतक झळकावत गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्यांच्या या अविस्मरणीय खेळीमुळे चेन्नई पोर्टने ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. रितिक ईश्वरन यांना सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

मृणाल कुमारची अष्टपैलू कमाल; न्यू मंगळोर पोर्टचा विजयी झंकार

दुसऱ्या सामन्यात विजाग पोर्ट संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ बाद १४७ धावा केल्या. मात्र, न्यू मंगळोर पोर्ट संघाने हे आव्हान सहज पार करत १४.५ षटकांत १ बाद १५० धावा करून ९ विकेट्सने शानदार विजय मिळवला.

 

या सामन्याचे खरे नायक ठरलेले मृणाल कुमार यांनी अप्रतिम अष्टपैलू कामगिरी करत ५१ चेंडूत १०२ धावांचे शतक झळकावले आणि गोलंदाजीतही प्रभावी मारा करत ४ षटकांत २३ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्यांच्या या जबरदस्त प्रदर्शनामुळे त्यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

 

आरसीएफ मैदानावर अष्टपैलू खेळाडूंची छाप; एसएम पोर्ट आणि व्हीओसी पोर्ट विजयी

आरसीएफ ग्राउंडवर झालेल्या सामन्यात एसएम पोर्ट अथॉरिटी (कोलकाता) संघाने डीपीए (कांडला) पोर्ट संघाचा ३ विकेट्सने पराभव केला. या विजयात सुधांशू श्रीवास्तव यांनी अष्टपैलू कामगिरी करत १५ धावा आणि २ विकेट्स घेत निर्णायक योगदान दिले. त्यांच्या या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी त्यांना सामनावीर घोषित करण्यात आले.

 

दुसऱ्या सामन्यात व्हीओसी पोर्ट संघाने मोरमुगाव पोर्ट संघावर ९ विकेट्सने शानदार विजय मिळवला. या सामन्यात रायन पॉल यांनी अष्टपैलू खेळ करत २७ धावा आणि ४ विकेट्स घेत प्रतिस्पर्ध्यांचा पूर्णपणे पराभव निश्चित केला. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे त्यांना सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

स्पर्धेत वाढली रंगत; पुढील सामन्यांकडे सर्वांचे लक्ष

या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये फलंदाजांनी शतके झळकावत आणि गोलंदाजांनी अचूक मारा करत क्रिकेटप्रेमींना रोमांचक अनुभव दिला. रितिक ईश्वरन, मृणाल कुमार, सुधांशू श्रीवास्तव आणि रायन पॉल यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे स्पर्धेची रंगत अधिकच वाढली असून पुढील सामने आणखी थरारक होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.


Post a Comment

0 Comments