ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी
स्पर्धा – २०२६
कुमार गटात ग्रीफिन्स जिमखाना आणि श्री स्वामी समर्थ अंतिम फेरीत
पुरुषांत मोरया मंडळ चौथ्या फेरीत
खारलँड मैदानावर कुमार कबड्डीचा तुफानी जल्लोष
ठाणे : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे आणि
ऍडव्होकेट सौ. पूजा राजा ठाकूर
यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक” कबड्डी स्पर्धा –
२०२६ मध्ये कुमार गटातील लढतींनी खारलँड मैदान अक्षरशः दणाणून सोडले. कळवा,
खारेगाव, ठाणे (प.) येथील खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कूलसमोरील मैदानावर
सुरू असलेल्या स्पर्धेत ग्रीफिन्स जिमखाना आणि श्री स्वामी समर्थ या संघांनी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर पुरुष प्रथम श्रेणीत मोरया मंडळाने चौथ्या फेरीत धडक देत आपला दबदबा सिद्ध केला.
ग्रीफिन्स जिमखानाची भक्कम सरशी
कुमार गटाच्या उपांत्य सामन्यात ग्रीफिन्स जिमखाना संघाने ओम् कबड्डी संघाचा २६-१४ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. सामन्याच्या सुरुवातीलाच
आदित्य पिलाणे
आणि तन्मय पवार यांनी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना
लोण देत पूर्वार्धात १५-०४ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात सावध खेळ करत
त्यांनी विजय सुरक्षित केला. ओम् कबड्डीकडून यतेश भोपी आणि सिद्धेश साळुंखे यांनी उत्तरार्धात आक्रमक खेळ करत आघाडी कमी करण्याचा
प्रयत्न केला, मात्र
संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.
श्री स्वामी समर्थची चुरशीतील दोन गुणांनी बाजी
दुसऱ्या उपांत्य सामन्यात श्री स्वामी समर्थ मंडळाने डॉन बॉस्को स्पोर्टस्वर ४२-४० अशी थरारक मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्या डावात
२ लोण देत स्वामी समर्थने २६-२० अशी आघाडी घेतली. मात्र डॉन बॉस्को संघाने एका लोणची परतफेड करत सामना चुरशीचा ठेवला. दुसऱ्या
डावात दोन्ही संघांनी १-१ लोण नोंदवले. त्या डावात स्वामी समर्थने १६, तर डॉन बॉस्कोने २० गुण मिळवले. तरीही पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर स्वामी
समर्थने २ गुणांनी सामना जिंकला. स्वामी समर्थकडून विवेक शिंदे, विशाल सिंग आणि विवेक चोरगे चमकले, तर डॉन बॉस्कोकडून जीत सैनी, सूरज वायकर आणि ध्रुव लोखंडे यांनी उत्कृष्ट खेळ केला.
मोरया मंडळाची शानदार पुनरागमन विजयकथा
पुरुष प्रथम श्रेणीच्या तिसऱ्या फेरीत मोरया मंडळाने होतकरू मित्र मंडळावर २३-१४ अशी मात करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. विश्रांतीला
८-९ अशा पिछाडीवर असलेल्या मोरयाने उत्तरार्धात
टॉप गिअर टाकत प्रतिस्पर्ध्यांना लोण देत ९ गुणांच्या फरकाने विजय मिळवला. परेश हरड आणि धीरज तरे यांच्या झंझावाती चढायांना मोहित भरवाढ याच्या अचूक पकडीची साथ लाभली. होतकरू मित्र मंडळाकडून
देवेन पाटील
याने चमकदार खेळ करत लक्ष वेधले.
पुरुष गटातील इतर निकाल
पुरुषांच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यांत
ग्रीफिन्स जिमखाना
संघाने स्व. रतन पाटील संघावर ४५-१२ असा दणदणीत विजय मिळवला. अष्टविनायक संघाने नंदकुमार क्रीडा संघाला ३०-१०,
डॉन बॉस्को
संघाने भाऊ स्पोर्टस् ला ३२-२८, श्री गणेश मंडळाने उत्कर्ष संघाला ३५-२५,
तर चिंतामणी स्पोर्टस् संघाने वेताळ मंडळाला ३८-२१ असे पराभूत करत तिसरी फेरी गाठली. या दमदार विजयांमुळे स्पर्धेतील चुरस अधिकच वाढली असून
पुढील फेऱ्यांतील लढतींकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments