सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६
प्रतीक ठक्कर व शुभम वाणी दुसऱ्या फेरीत
संतोष आबनावे, यश त्रिवेदी व सतीश सिंग यांचेही दमदार विजय
विल्सन जोन्स हॉलमध्ये रंगला स्नूकरचा थरार
मुंबई : मुंबईतील प्रतिष्ठित क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) च्या विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये
सुरू असलेल्या सीसीआय स्नूकर क्लासिक २०२६ स्पर्धेत शनिवारी रोमांचकारी
सामने पाहायला मिळाले. अचूक शॉट्स, शांत संयम आणि उत्कृष्ट
ब्रेक्सच्या जोरावर प्रतीक ठक्कर आणि शुभम वाणी यांनी दमदार कामगिरी
करत पात्रता फेरीतील दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यांच्या खेळामुळे
स्पर्धेतील उत्सुकता आणखी वाढली आहे.
प्रतीक ठक्करचा एकतर्फी विजय
पहिल्या फेरीतील सामन्यात प्रतीक ठक्करने प्रभावी
खेळ करत सिद्धार्थ गुप्तावर ३-० (७७-६, ७२-१९, ५९-१३) असा सहज विजय नोंदवला. सामन्याच्या
सुरुवातीपासूनच ठक्करने आक्रमक आणि अचूक खेळ दाखवत प्रतिस्पर्ध्याला संधी दिली
नाही. प्रत्येक फ्रेममध्ये वर्चस्व राखत त्याने सामना एकतर्फी बनवला आणि
आत्मविश्वासाने पुढील फेरीत प्रवेश केला.
शुभम वाणीची प्रभावी कामगिरी
दुसऱ्या सामन्यात शुभम वाणीनेही शानदार खेळ सादर करत
नचिकेत नायगावकरवर ३-० (७१-१, ६४-५६, ७२-३१) असा विजय मिळवला. पहिल्या फ्रेमपासूनच वाणीने
नियंत्रण ठेवले आणि निर्णायक क्षणी अचूक शॉट्स खेळत सामना आपल्या बाजूने झुकवला.
या विजयामुळे त्यानेही पात्रता फेरीतील पुढील टप्प्यात स्थान निश्चित केले.
संतोष आबनावेची सातत्यपूर्ण कामगिरी
दरम्यान, सीसीआयचा बिलियर्ड्स मार्कर संतोष आबनावेने
उत्कृष्ट कामगिरी करत अगस्त्य मित्तलवर ३-१ (७१-३४, ५७-७१, ६१-४९, ७३-४३) असा विजय मिळवला. पहिली फ्रेम जिंकल्यानंतर दुसरी फ्रेम गमावली असली तरी
आबनावेने पुढील दोन फ्रेम्समध्ये संयमी आणि अचूक खेळ दाखवत सामना आपल्या नावावर
केला.
इतर सामन्यांचे निकाल
स्पर्धेतील इतर लढतींमध्येही चुरस पाहायला मिळाली. यश
त्रिवेदीने गाजी अन्वरवर ३-१ (४७-६, ४९-५२, ५५-४३,
५६-४) असा विजय मिळवला. तसेच सतीश सिंगने प्रभावी खेळ करत अरविंद लखवानावर
३-० (७३-१८, ६६-३२, ५३-३६) असा एकतर्फी विजय नोंदवला.
फोटो ओळ : सीसीआयचा बिलियर्ड्स मार्कर संतोष आबनावेने अगस्त्य
मित्तलविरुद्ध ३-१ असा विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.

Post a Comment
0 Comments