Type Here to Get Search Results !

सब ज्युनियर राज्य कॅरममध्ये ओंकार, वेदिका, शिवांश व निधीचा जलवा! ५९ व्या अजिंक्यपद स्पर्धेत युवा कॅरमपटूंचा दमदार उदय थरारक लढतींनी रंगली अंतिम फेरी दमदार खेळ, तुफानी लढती आणि नव्या ताऱ्यांचा उदय!

 


सब ज्युनियर राज्य कॅरममध्ये ओंकार, वेदिका, शिवांश व निधीचा जलवा!
५९ व्या अजिंक्यपद स्पर्धेत युवा कॅरमपटूंचा दमदार उदय

थरारक लढतींनी रंगली अंतिम फेरी

दमदार खेळ, तुफानी लढती आणि नव्या ताऱ्यांचा उदय!

 

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहकार्याने एमसीए ट्रेनिंग सेंटर, दादर येथे संपन्न झालेल्या ५९ व्या सब ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत युवा खेळाडूंनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत कॅरम विश्वाला नवे तारे दिले, ज्यात ओंकार वडार, वेदिका पोमेंडकर, शिवांश मोरे आणि निधी सप्रे यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 

१४ वर्षाखालील मुलांमध्ये ओंकारचा एकतर्फी दबदबा

१४ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या राष्ट्रीय कॅरमपटू ओंकार वडार याने मुंबई उपनगरच्या प्रसन्ना गोळेवार वर १९-१३, १६-६ असा एकतर्फी विजय मिळवत विजेतेपद पटकावले, तर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबई उपनगरच्या उमेर पठाण ने ठाण्याच्या नील म्हात्रे ला ११-२१, २१-०, २१-९ असे नमवत तिसरा क्रमांक मिळवला.

 

१४ वर्षाखालील मुलींमध्ये वेदिकाची सरशी

१४ वर्षाखालील मुलींच्या गटात मुंबई उपनगरच्या वेदिका पोमेंडकर हिने मुंबईच्या गौरी सावंत वर ११-४, १६-४ अशी सहज मात करत विजेतेपद पटकावले, तर तिसऱ्या क्रमांकासाठी ठाण्याच्या सारा देवन हिने धुळेच्या कल्याणी मराठे वर २१-०, २१-१ असा दणदणीत विजय मिळवला.

 

१२ वर्षाखालील मुलांमध्ये शिवांशचा थरारक विजय

१२ वर्षाखालील (कॅडेट) मुलांच्या गटात ठाण्याच्या शिवांश मोरे याने आपल्या सहकारी समर्थ खंडेलवाल विरुद्ध २१-५, १-१६, ९-८ असा अत्यंत थरारक आणि चुरशीचा सामना जिंकत विजेतेपद पटकावले, तर पालघरच्या देवराज कथाडे याने पुण्याच्या रुद्र इंगळे वर २१-०, १९-२ असा विजय मिळवत तिसरा क्रमांक पटकावला.

 

१२ वर्षाखालील मुलींमध्ये निधीचा दणदणीत विजय

१२ वर्षाखालील (कॅडेट) मुलींच्या गटात रत्नागिरीच्या राष्ट्रीय कॅरमपटू निधी सप्रे हिने ठाण्याच्या देविका जोशी वर २१-१, १९-४ असा एकतर्फी विजय मिळवत विजेतेपद पटकावले, तर सिंधुदुर्गच्या दिव्या राणे हिने पुण्याच्या आरवी शेलार वर ६-१८, १३-७, १३-११ असा निसटता विजय मिळवत तिसरा क्रमांक मिळवला.

 

विजेत्यांचा सन्मान उत्साहात

स्पर्धेतील सर्व विजेत्यांना यतिन ठाकूर, अरुण केदार, अजित सावंत आणि केतन चिखले यांच्या हस्ते आकर्षक चषक व प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, आणि या भव्य स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील कॅरमच्या भविष्यातील चमकदार खेळाडूंची झलक पुन्हा एकदा सर्वांसमोर आली.


Post a Comment

0 Comments