Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र केसरीत सूरज मानेची झंझावाती झेप; ठाण्याच्या मल्लाने पटकावले रौप्य पदक! वाघोलीत सलग विजयांची मालिक; अंतिम लढतीत सोलापूरच्या विकास करे विरुद्ध झुंजार लढत ठाण्याच्या मातीचा सूरज महाराष्ट्र केसरीत चमकला!

 


महाराष्ट्र केसरीत सूरज मानेची झंझावाती झेप 

ठाण्याच्या मल्लाने पटकावले रौप्य पदक!

वाघोलीत सलग विजयांची मालिक 

अंतिम लढतीत सोलापूरच्या विकास करे विरुद्ध झुंजार लढत

ठाण्याच्या मातीचा सूरज महाराष्ट्र केसरीत चमकला!

 

पुणे : पुण्याच्या वाघोलीत रंगलेल्या अडुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ठाण्याच्या मातीतील झुंजार मल्ल पै. सूरज माने याने दमदार डावपेच आणि आक्रमक खेळाच्या जोरावर रौप्य पदकावर नाव कोरले! प्रतिस्पर्ध्यांना एकामागोमाग एक नमवत अंतिम फेरीपर्यंत झेप घेत सूरजने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.

 

स्पर्धेचा थरार : वाघोलीत कुस्तीचा जल्लोष

दिनांक १८ ते २२ मार्च दरम्यान महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आयोजित ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६ वाघोली, जि. पुणे येथे रंगली. या स्पर्धेत मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मिरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याचा प्रतिनिधी म्हणून पै. सूरज माने याने ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.

 

७९ किलो गटात सूरजची सलग दणदणीत कामगिरी पै. सूरज मानेची कामगिरी :

बुलढाण्याच्या शुभम आवरेवर १०-० गुणांनी विजय, छत्रपती संभाजीनगरच्या चरण मेघवालवर १२-०१ गुणांनी मात, कोल्हापूरच्या पृथ्वीराज बोडकेवर ५-२ गुणांनी सरशी, सोलापूरच्या गोपीनाथ सुतार विरुद्ध पिछाडीवरून जबरदस्त पुनरागमन करत ८-४ गुणांनी विजय आणि अंतिम फेरीत प्रवेश अशी सलग विजयी घोडदौड सूरजने नोंदवली.

 


अंतिम लढतीतील झुंजार झुंज; रौप्य पदकाची कमाई

अंतिम फेरीत सोलापूर जिल्ह्याच्या विकास करे याच्याशी सूरजची लढत झाली. जोरदार प्रयत्न करूनही अंतिम सामन्यात त्याला पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तरीही त्याची संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी उल्लेखनीय ठरली.

 

मान्यवरांच्या हस्ते सन्मान; स्प्लेंडर मोटार सायकलचा मान

या भव्य यशाबद्दल महाराष्ट्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सूरजचा सत्कार करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेचे संचालक मा. श्री. रामकृष्ण सातव पाटील यांच्या तर्फे स्प्लेंडर मोटार सायकल देऊन सूरजचा विशेष गौरव करण्यात आला.

 

दुसरे राज्यस्तरीय पदक; उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल

राज्यस्तरावरील हे सूरजचे दुसरे पदक असून, तो सध्या अभिनव कॉलेजमध्ये कला शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. त्याला श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा श्री. वसंतराव पाटील आणि कुस्ती प्रशिक्षक पै. वैभव माने यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

 


सूरजची ही झुंजार कामगिरी ठाणे जिल्ह्याच्या कुस्ती परंपरेला नवा उजाळा देणारी ठरली असून, आगामी काळात त्याच्याकडून आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त होत आहे!


Post a Comment

0 Comments