Type Here to Get Search Results !

‘हिरक’ जल्लोष तबेला मैदान-श्रमिक जिमखाना मैदानावर कबड्डीतील दिग्गजांचा भव्य सन्मान सोहळा ११ एप्रिलला! अमरप्रेम क्रीडा मंडळाच्या पुढाकारातून कबड्डीतील दिग्गज, संघनायक, संघटनांचा गौरव क्रीडाप्रेमींना उपस्थितीचे आवाहन!


‘हिरक’ जल्लोष तबेला मैदान-श्रमिक जिमखाना मैदानावर

कबड्डीतील दिग्गजांचा भव्य सन्मान सोहळा ११ एप्रिलला!

अमरप्रेम क्रीडा मंडळाच्या पुढाकारातून कबड्डीतील दिग्गज, संघनायक, संघटनांचा गौरव

क्रीडाप्रेमींना उपस्थितीचे आवाहन!

 

मुंबई : कबड्डीच्या परंपरेला, कर्तृत्वाला आणि समर्पणाला सलाम करणारा ‘हिरक महोत्सवी सोहळा-२०२६’ तबेला मैदानावर रंगणार आहे! वरळीकोळीवाडा येथील अमरप्रेम क्रीडा मंडळ व सर्व कबड्डीप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने, लोकप्रिय आमदार सुनील शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली शनिवार दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सायं. ०५-०० ते १०-०० या वेळेत तबेला मैदान-श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्ग येथे हा भव्य सोहळा पार पडणार आहे.

 

दिग्गज संघनायक- संघनायिकांचा भव्य सत्कार

या सोहळ्यात पूर्वीच्या मुंबई तसेच सध्याच्या मुंबई शहरातील सर्व वरिष्ठ पुरुष व महिला गटातील संघनायक व संघनायिकांचा गौरव करण्यात येणार आहे. यासोबतच मुंबई उपनगरातील वरिष्ठ गटातील प्रथम संघनायकांनाही सन्मानित करण्यात येणार असून, कबड्डी क्षेत्रातील नेतृत्वाला अभिवादन केले जाणार आहे.

 

कबड्डी उभारणाऱ्या संघटनांना मानाचा मुजरा

मुंबईतील कबड्डीला बळकटी देणाऱ्या आणि सातत्याने स्पर्धा आयोजित करणाऱ्या आर्य सेवा मंडळ (६१ वर्षे), शिवनेरी सेवा मंडळ (५३ वर्षे), अमर क्रीडा मंडळ, दादर (४३ वर्षे) या संस्थांचा विशेष सन्मान होणार आहे. याचबरोबर मातीची क्रीडांगणे तयार करणारे आणि ती अचूक रेषेत आखणारे अशोक गुरव यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

 

अर्जुन पुरस्कार विजेते व मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्रातील सर्व अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू तसेच गेली तीन दशके महाराष्ट्रात वास्तव्यास असलेली मोनिका बाकरे (नाथ) यांना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.

 

कबड्डीतील अनोख्या योगदानांचा सन्मान

चार दशकांहून अधिक काळ कबड्डी खेळणारे विलास जाधव, बंगालमध्ये ‘टायगर’ ही उपाधी मिळवणारे वसंत सूद, ट्रॉफी तयार करणारे हरीश परब, बनियान निर्मिती करणारे भुईम्बर यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान होणार आहे. तसेच कबड्डीच्या कठीण काळात खेळाडूंना वैद्यकीय सेवा देणारे हाड वैद्य, जेष्ठ पत्रकार, कबड्डी समीक्षक, समर्पित चाहते आणि शालेय स्तरावर मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक यांनाही गौरविण्यात येणार आहे.

 

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संघटनांचाही गौरव

आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करणारी हिंदमाता सेवा मंडळ, तसेच मुंबईत पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा आयोजित करणारी साऊथ कॅनरा स्पोर्टस् क्लब यांचाही या सोहळ्यात सन्मान होणार आहे. कबड्डीत मोठ्या पारितोषिकांची परंपरा सुरू करणाऱ्या विविध संघटनांचाही गौरव केला जाणार आहे.

 

क्रीडाप्रेमींना उपस्थितीचे आवाहन

या भव्य सोहळ्याला कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दिग्गजांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करावेत, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राणा प्रताप तिवारी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे केले आहे.

 

कबड्डीच्या इतिहासाला उजाळा देणारा, दिग्गजांचा सन्मान करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा ‘हिरक महोत्सवी सोहळा’ कबड्डीप्रेमींसाठी एक अविस्मरणीय पर्व ठरणार आहे!


Post a Comment

0 Comments