अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धेला उस्फूर्त
प्रतिसाद
७०० हून अधिक खेळाडू सज्ज!
मुंबई विभागीय स्तरावर ४० संघांची दमदार
उपस्थिती
पॅरा मल्लखांब स्पर्धा ठरणार विशेष आकर्षण
मुंबई : मल्लखांबप्रेमींसाठी उत्साहाची पर्वणी ठरणाऱ्या
अजिंक्यतारा चषक मल्लखांब स्पर्धेला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून तब्बल ७०० हून अधिक
खेळाडूंनी सहभाग नोंदवत स्पर्धेची रंगत आणखी वाढवली आहे. १७ ते १९ एप्रिल दरम्यान
होणाऱ्या या मुंबई विभागीय स्पर्धेत ४० संघ मैदानात उतरून कौशल्य, संतुलन आणि धाडसाचा अद्भुत संगम सादर करणार
आहेत.
संयुक्त विद्यमाने भव्य आयोजन
बोरीवली (पश्चिम) येथील सुविद्या प्रसारक संघ, स्कूल ऑफ एनवायरन्मेंट अँड आर्किटेक्चर आणि मल्लखांब लव संघ यांच्या संयुक्त
विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यंदा स्पर्धेचे ५ वे वर्ष साजरे होत आहे. याचबरोबर कर्ममूर्ती महादेव गोविंद
रानडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत स्पर्धेला विशेष
महत्त्व प्राप्त झाले आहे.
उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
स्पर्धेचे उद्घाटन १७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.०० वाजता महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते
होणार आहे. यावेळी आमदार अतुल भातखळकर, नगरसेविका सीमा शिंदे, श्वेता कोरगावकर तसेच नगरसेवक तेजिंदर तिवाना यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
पारितोषिक वितरणाचा सोहळा रंगणार
स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण सोहळा रविवारी रात्री ८.०० वाजता पार पडणार
आहे. या सोहळ्यास माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार संजय उपाध्याय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, उपमहापौर संजय घाडी, नगरसेविका संध्या दोशी आणि नगरसेवक शिवा शेट्टी उपस्थित राहणार आहेत.
विविध वयोगटांमध्ये रंगणार चुरस
६, ८, १०, १२, १४, १६ आणि १८ वर्षांखालील वयोगटांमध्ये ही स्पर्धा पार पडणार
असून, प्रत्येक सहभागी
खेळाडूला अजिंक्यतारा पदक व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच
प्रत्येक गटात सांघिक व वैयक्तिक विजेत्यांना भरघोस पारितोषिकांनी गौरविण्यात
येणार आहे.
पॅरा मल्लखांब स्पर्धा ठरणार आकर्षणाचा
केंद्रबिंदू
या स्पर्धेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७.०० वाजता होणारी
भारतातील एकमेव पॅरा मल्लखांब स्पर्धा. यात मुकबधीर, अंध आणि ऑटिस्टिक खेळाडू आपले अद्वितीय कौशल्य
सादर करणार असून, त्यांनाही विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत.
आयोजनाची जबाबदारी सक्षम हातात
या भव्य स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून आशिष देवल तर स्पर्धा सचिव
म्हणून संचिता देवल कार्यभार सांभाळत आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी आशिष देवल
(९६६४००२०५१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मल्लखांबप्रेमींसाठी अविस्मरणीय पर्व
मुंबईत रंगणारी ही अजिंक्यतारा चषक स्पर्धा मल्लखांब कलेचा
उत्सव ठरणार असून, खेळाडूंच्या थरारक सादरीकरणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध
करण्यासाठी सर्व काही सज्ज झाले आहे.

Post a Comment
0 Comments