Type Here to Get Search Results !

भारत पेट्रोलियमचा विजयघोष ओम् ज्ञानदीप चषकावर कब्जा! अनिल जस्ता ‘मोटार बाईक’चा मानकरी १५-२१ पिछाडीतून ४३-३९ थरारक विजय धमाकेदार अंतिम सामना – पिछाडीतून विजयी झेप!

 


भारत पेट्रोलियमचा विजयघोष

ओम् ज्ञानदीप चषकावर कब्जा!

अनिल जस्ता ‘मोटार बाईक’चा मानकरी

१५-२१ पिछाडीतून ४३-३९ थरारक विजय

धमाकेदार अंतिम सामना – पिछाडीतून विजयी झेप!


मुंबई : मुंबईतील वरळी येथे रंगलेल्या ओम् ज्ञानदीप क्रीडा मंडळ राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा-२०२६ च्या अंतिम सामन्यात भारत पेट्रोलियम ने जबरदस्त पुनरागमन करत युवा पलटन वर ४३-३९ असा थरारक विजय मिळवत विजेतेपद पटकावले. पूर्वार्धात १५-२१ अशा पिछाडीवर असतानाही उत्तरार्धात खेळ उंचावत भारत पेट्रोलियमने सामना आपल्या बाजूने फिरवला आणि १५००००/- रोख रक्कम व ओम् ज्ञानदीप चषक पटकावला. उपविजेत्या युवा पलटन ला १०००००/- व चषकावर समाधान मानावे लागले.

 

पूर्वार्धात युवा पलटनचा दबदबा – किशन जाटचा सुपर रेड

सामन्याच्या सुरुवातीला युवा पलटन ने आक्रमक खेळ करत पहिल्याच चढाईत गुण मिळवला. किशन जाट याने एकाच चढाईत ३ गडी टिपत ७व्या मिनिटाला पहिला लोण देत १०-०३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर किशोर जाट, नीरज मिसळ आणि अलंकार पाटील यांनी जोशपूर्ण खेळ करत मध्यंतराला २१-१५ अशी आघाडी कायम ठेवली.

 

उत्तरार्धात पेट्रोलियमचा पलटवार – अनिल जस्ता ठरला हिरो

उत्तरार्धात मात्र भारत पेट्रोलियम संघाने टॉप गिअर टाकत सामना पालटला. अनिल जस्ता आणि मिलन दहिया यांनी आक्रमक चढाया करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. बचावात प्रदीप दिघोळ यांनी उत्कृष्ट पकडी घेत संघाला भक्कम आधार दिला. युवा पलटनकडून उत्तरार्धात अपेक्षित कामगिरी न झाल्याने सामना त्यांच्या हातातून निसटला. असलम इनामदार यांची उणीव संघाला प्रकर्षाने जाणवली.

 

अनिल जस्ता सर्वोत्तम; ‘मोटार बाईक’चा मानकरी

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अनिल जस्ता यांना फॅशन प्रो मोटार बाईक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या अष्टपैलू खेळाने स्पर्धेत वेगळाच ठसा उमटवला.

 


विशेष पुरस्कार – अनिल जाट व अलंकार पाटील चमकले

युवा पलटन च्या अनिल जाट यांना उत्कृष्ट चढाईपटू, तर अलंकार पाटील यांना उत्कृष्ट पकडपटू म्हणून गौरविण्यात आले. दोघांनाही प्रत्येकी वॉशिंग मशिन देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दररोज उत्कृष्ट खेळाडूंना एल. ई. डी. टी. व्ही. देण्यात आले.

 

उपांत्य फेरी – अंतिम फेरीसाठी दिग्गजांची झुंज

उपांत्य फेरीत भारत पेट्रोलियम ने मुंबई पोस्टल वर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली, तर युवा पलटन ने ठाणे महानगर पालिका वर मात करत अंतिम लढतीत प्रवेश केला होता.

 

भव्य पारितोषिक वितरण – मान्यवरांची उपस्थिती

स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार सुनील शिंदे, आमदार महेश सावंत, कृष्णा पाटील (उपमहापौर, ठाणे), संजय भाई, टी. व्ही. कलाकार शरद संकल, ज्ञानेश्वर अव्हाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) आणि विश्वास मोरे (मुंबई शहर कबड्डी असोसिएशन सचिव) यांच्या हस्ते पार पडले.

 

ओम् ज्ञानदीपची परंपरा कायम!

गेल्या ३२ वर्षांची दैदिप्यमान परंपरा असलेल्या ओम् ज्ञानदीप मंडळाने यंदाही उत्कृष्ट नियोजन आणि दर्जेदार स्पर्धेद्वारे आपली ओळख कायम ठेवली. भारत पेट्रोलियम च्या विजयानं स्पर्धेचा शेवट जल्लोषात झाला आणि कबड्डीप्रेमींना अविस्मरणीय अनुभव देऊन गेला!

 


Post a Comment

0 Comments