Type Here to Get Search Results !

रोटरी क्लब कॅरम स्पर्धेत प्रशांत – सोनाली विजयी दणदणीत खेळाने किताबावर शिक्कामोर्तब! प्रशांत मोरेचा एकतर्फी धडाका सोनाली कुमारीची तीन सेटमध्ये समृद्धीवर मात – प्रत्येकी ₹२५ हजारांची कमाई

 


रोटरी क्लब कॅरम स्पर्धेत प्रशांत - सोनाली विजयी

दणदणीत खेळाने किताबावर शिक्कामोर्तब!

प्रशांत मोरेचा एकतर्फी धडाका

सोनाली कुमारीची तीन सेटमध्ये समृद्धीवर मात - प्रत्येकी २५ हजारांची कमाई

 

मुंबई : कॅरमपटूंच्या अचूकतेचा, अनुभवाचा आणि थराराचा परमोच्च बिंदू गाठणाऱ्या ६ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत अखेर विजेते ठरले प्रशांत मोरे आणि सोनाली कुमारी! प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात रंगलेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत दमदार कामगिरी करत दोन्ही विजेत्यांनी प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत दणदणीत विजय मिळवला आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला.

 

पुरुष गटात प्रशांत मोरेचा एकतर्फी जलवा

पुरुष एकेरी अंतिम सामन्यात माजी विश्वविजेता प्रशांत मोरे (मुंबई) याने ठाण्याच्या अनुभवी संजय मांडे याच्यावर २५-१०, २५-५ असा एकतर्फी विजय मिळवत विजेतेपद पटकावले. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ आणि अचूक फटक्यांमुळे प्रशांतने प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी दिली नाही. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत पुण्याच्या रहिम खान याने मुंबईच्या उदयोन्मुख निलांश चिपळूणकर याच्यावर २१-२३, १५-१४, २४-१४ असा संघर्षपूर्ण विजय मिळवून तिसरे स्थान पटकावले.

 

महिला गटात सोनाली कुमारीची थरारक बाजी

महिला एकेरी अंतिम फेरीत मुंबईच्या सोनाली कुमारी हिने ठाण्याच्या प्रथम मानांकित समृद्धी घाडिगावकर हिला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १२-२५, २५-१०, २५-५ अशी मात देत विजेतेपद मिळवले. पहिला सेट गमावल्यानंतर सोनालीने शानदार पुनरागमन करत पुढील दोन सेट जिंकले. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत ऐशा साजिद खान हिने २०-२२, २४-५, २०-७ अशा लढतीत विजय मिळवत आपली छाप सोडली.

 

उपांत्य फेरीतून रंगलेला संघर्ष

पुरुष एकेरी उपांत्य फेरीत संजय मांडे (मुंबई) याने रहिम खान (पुणे) विरुद्ध १४-१८, २१-१४, २२-१७ असा शानदार कमबॅक विजय मिळवला, तर प्रशांत मोरे (मुंबई) याने निलांश चिपळूणकर (मुंबई) वर २४-५, २४-६ अशी सहज मात केली. महिला गटात सोनाली कुमारी (मुंबई) हिने मिताली पाठक (मुंबई) वर १६-७, २२-१६ अशी सरशी साधली, तर समृद्धी घाडिगावकर (ठाणे) हिने ऐशा साजिद खान (मुंबई) विरुद्ध १-२५, १८-१७, २५-३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.

 

पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात


या स्पर्धेत सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट कॅरम व सोंगट्यांवर प्रथमच सामने खेळविण्यात आले. विजेते प्रशांत मोरे आणि सोनाली कुमारी यांनी प्रत्येकी २५,००० रोख पारितोषिक पटकावले. विजेत्यांचा गौरव रोटेरियन दीपक जियांदानी, डॉ. दीपक मोंडकर, भालचंद्र बर्वे, मकरंद येडुलकर, अरुण केदार आणि संतोष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील देशपांडे यांनी केले.

 

कॅरमप्रेमींसाठी अविस्मरणीय पर्वणी

उत्कृष्ट आयोजन, थरारक सामने आणि दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीमुळे ही स्पर्धा कॅरमप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरली. अनुभवी आणि युवा खेळाडूंच्या संगमातून कॅरमचा दर्जा उंचावल्याचे चित्र या स्पर्धेत पाहायला मिळाले.


Post a Comment

0 Comments