क्रिकेटच्या पंढरीत धडाकेबाज सुरुवात!
सीसीआय, डी. वाय. पाटील, कर्नाटक आणि इस्लाम जिमखान्यांची विजयी सलामी
यजमान एसपीजी व गतविजेता पार्कोफिन बाहेर
मुंबई : शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस, धावांचा डोंगर आणि थरारक पाठलाग… अशा रोमांचकारी
वातावरणात ‘कै. विजय मांजरेकर – कै. रमाकांत देसाई एसपीजी
टी-२० क्रिकेट स्पर्धे’ला जबरदस्त सुरुवात झाली! पहिल्याच फेरीत क्रिकेट क्लब ऑफ
इंडिया, डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी, कर्नाटक स्पोर्ट्स क्लब आणि इस्लाम जिमखाना यांनी दणदणीत
विजय नोंदवत आपली दावेदारी मजबूत केली; तर यजमान शिवाजी पार्क जिमखाना (एसपीजी) आणि गतविजेता
पार्कोफिन क्रिकेटर्स यांचे आव्हान सुरुवातीलाच संपुष्टात आले.
उद्घाटनाचा जल्लोष; राज ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते
स्पर्धेचे भव्य उद्घाटन झाले. “लवकर सामने सुरू करा आणि चांगला खेळ करा,” अशा थोडक्यात पण प्रेरणादायी शब्दांत त्यांनी
खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. याचवेळी त्यांच्या हस्ते शिवाजी पार्क जिमखान्याच्या मान्यवरांच्या
आठवणींवर आधारित ‘खाण रत्नांची’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या स्पर्धेला आयडीबीआय बँक व एलआयसी यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
एसपीजीचा संघर्ष, कर्नाटकचा थरारक विजय; अनिष चौधरी – गौरीश जाधव चमकले
यजमान एसपीजीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १८९ धावा उभारल्या. रझा मिर्झा (४२), आशय दुबे (५३) आणि दशरथ चव्हाण (३०) यांनी दमदार
फलंदाजी केली. कर्नाटककडून प्रथमेश डाके (२/३९) आणि वैभव माळी (२/३३) यांनी प्रभावी गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात
कर्नाटक संघाने आक्रमक फलंदाजी करत १८.३ षटकांत ४ बाद १९३ धावा करून सामना
जिंकला. अनिष चौधरी (७१) आणि गौरीश जाधव (नाबाद ४६) यांच्या शानदार खेळीने एसपीजीचा पराभव निश्चित
केला.
जय बिस्तचे शतक व्यर्थ! डी. वाय. पाटीलचा दमदार
पाठलाग
बंगाल क्रिकेट क्लब मैदानावर झालेल्या सामन्यात व्हिक्टरी
क्रिकेट क्लबने प्रथम
फलंदाजी करत २ बाद २२७ धावा केल्या. जय बिस्त (नाबाद ११५) याने स्पर्धेतील पहिले शतक झळकावत शानदार
कामगिरी केली, तर शाश्वत जगताप (६१) याने साथ दिली. मात्र, डी. वाय. पाटील संघाने जबरदस्त प्रत्युत्तर देत ४ बाद २३० धावा करत ६ विकेट्सने
विजय मिळवला. प्रणव केला (६६), अभिग्यान कुंडू (७२) आणि हर्ष जाधव (३८) यांच्या सलग
फटकेबाजीने विजय निश्चित केला. गोलंदाजीत रॉयटन डायस (२/४६) याने प्रयत्न केले, पण ते अपुरे पडले.
इस्लाम जिमखान्याचा शानदार विजय; प्रणय कपाडिया – अमोघ भटकळ यांची निर्णायक
खेळी
दुसऱ्या सामन्यात पार्कोफिन क्रिकेटर्सने ७ बाद १९२ धावा केल्या. सागर मिश्रा (४८), आर्यन पटणी (३४) आणि आयुष जेठवा (नाबाद ३६) यांनी धावसंख्या
उभारली. यंग महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात १२१ धावा करण्यात आल्या, ज्यात तन्मय कदम (३३) तर गोलंदाजीत ध्रुमील मटकर (३/२७) चमकला. प्रत्युत्तरात इस्लाम जिमखानाने ६ बाद १९३ धावा करत विजय मिळवला. प्रणय कपाडिया (४९) आणि अमोघ भटकळ (४६) यांच्या निर्णायक खेळीने संघाला विजय मिळवून
दिला.
स्पर्धेची रंगत वाढली! उदयोन्मुख खेळाडूंचा
झंझावात
पहिल्याच फेरीत झालेल्या या धडाकेबाज कामगिरीमुळे स्पर्धेची
रंगत कमालीची वाढली आहे. जय बिस्तचे शतक, अनिष चौधरीचा आक्रमक डाव आणि अभिग्यान कुंडूचा
मॅच-विनिंग खेळ यामुळे प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन मिळाले.
क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी! शिवाजी पार्कवर
चौकार-षटकारांचा वर्षाव कायम
या स्पर्धेत दररोज होत असलेल्या रोमांचकारी सामन्यांमुळे
क्रिकेटप्रेमींना खरी मेजवानी मिळत आहे. शिवाजी पार्कच्या मैदानावर पुढील
सामन्यांत आणखी धडाकेबाज खेळी आणि थरारक निकाल पाहायला मिळणार, हे नक्की!

Post a Comment
0 Comments