Type Here to Get Search Results !

स्वराज्य स्पोर्टस् आणि श्रीराम क्रीडा विश्वस्तने कोरले मावळी चषकावर नाव! महिलांत स्वराज्यचा रोमांचक विजय, पुरुषांत श्रीरामची दणदणीत सरशी याशिका पुजारी आणि तुषार शिंदे सर्वोत्तम खेळाडू थरार, टक्कर आणि विजेतेपदाचा जल्लोष

 


स्वराज्य स्पोर्टस् आणि श्रीराम क्रीडा विश्वस्तने कोरले मावळी चषकावर नाव!

महिलांत स्वराज्यचा रोमांचक विजय, पुरुषांत श्रीरामची दणदणीत सरशी

याशिका पुजारी आणि तुषार शिंदे सर्वोत्तम खेळाडू

थरार, टक्कर आणि विजेतेपदाचा जल्लोष

 

ठाणे : चरईच्या मैदानावर कबड्डीचा उत्कर्षबिंदू गाठणाऱ्या श्री मावळी मंडळ आयोजित ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शेवट अक्षरशः थरारक ठरला! महिला गटात स्वराज्य स्पोर्टस् तर पुरुष गटात श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी विजेतेपद पटकावत “मावळी चषक” आपल्या नावावर कोरला. संपूर्ण स्पर्धेत झळकलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल याशिका पुजारी आणि तुषार शिंदे यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून प्रत्येकी ५०००/- रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

महिला अंतिम सामना : स्वराज्यचा जबरदस्त कमबॅक

महिला गटातील चुरशीच्या अंतिम सामन्यात स्वराज्य स्पोर्टस् ने विवेक स्पोर्टस् (पालघर-विरार) वर ३७-३३ असा थरारक विजय मिळवत ५१०००/- व चषक पटकावला, तर विवेकला ३१०००/- वर समाधान मानावे लागले. पूर्वार्धात १३-१७ पिछाडीवर असलेल्या स्वराज्यने उत्तरार्धात जोरदार पुनरागमन केले.
हरजीत, स्वीटी, सौंदर्या यांच्या चतुरस्त्र खेळामुळे विवेकने सुरुवातीला लोण देत आघाडी घेतली होती; मात्र उत्तरार्धात याशिका पुजारी (सलग चढायांत गुणांची कमाई), समृद्धी मोहिते (आक्रमक चढाया), प्रतिक्षा तांडेल (भक्कम पकडी) यांच्या कामगिरीमुळे स्वराज्यने लोणची परतफेड करत सामना आपल्या बाजूने वळवला आणि शेवटच्या क्षणी विजय निश्चित केला.

 

पुरुष अंतिम सामना : श्रीरामची दणदणीत बाजी



पुरुष गटातील अंतिम सामन्यात श्रीराम क्रीडा विश्वस्त (मुंबई) संघाने ग्रीफिन्स जिम. (ठाणे) वर ३६-३० असा विजय मिळवत ५१०००/- व चषक पटकावला. उपविजेत्या ग्रीफिन्सला ३१०००/- वर समाधान मानावे लागले. सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत श्रीरामने पहिल्या डावात लोण देत २०-१२ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी एक लोण देत विजयावर शिक्कामोर्तब केले. तुषार शिंदे (संयमी व धूर्त चढाया), अंकुश पारले (महत्त्वपूर्ण चढाया), अमित सिंग व आदित्य पारले (भक्कम बचाव) यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे हा विजय शक्य झाला. ग्रीफिन्सकडून सुरज धुंदले, मनीष धनावडे, वेदान्त धामले, आदित्य पिलाणे (उत्तरार्धातील जोरदार प्रतिकार) यांनी चांगली झुंज दिली.

 

उपांत्य फेरीचा थरार : अंतिम फेरीत पोहोचण्याची लढत

महिलांच्या उपांत्य सामन्यात स्वराज्य स्पोर्टस् ने मिडलाईन अकॅडमी-नांदेड ला ३८-२५ असे नमविले, तर विवेक स्पोर्टस् ने ओम् वर्तकनगर वर ४४-१६ अशी एकतर्फी मात करत अंतिम फेरी गाठली. पुरुष गटात श्रीराम क्रीडा विश्वस्त ने डॉन बॉस्को ला ३५-१९ असे पराभूत केले, तर ग्रीफिन्स जिम. ने मिडलाईन वर ५-५ चढायांत ३२-२९ (७-४) असा थरारक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

 

वैयक्तिक पुरस्कार : उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव

महिला गटात स्वीटी (विवेक) हिला उत्कृष्ट चढाईपटू, तर समृद्धी मोहिते (स्वराज्य) हिला उत्कृष्ट पकडीचा खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.
पुरुष गटात मनीष धनावडे (ग्रीफिन्स) उत्कृष्ट चढाईपटू, तर अमित सिंग (श्रीराम) उत्कृष्ट पकडपटू ठरले. या सर्व खेळाडूंना प्रत्येकी ३०००/- रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

समारोप सोहळा : मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी निरंजन डावखरे, संजय वाघुळे, संदीप लेले यांनी सदिच्छा भेट दिली. पारितोषिक वितरण सोहळा कृष्णा पाटील (उपमहापौर, ठाणे) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सुधाकर मोरे, मनीष मुंदडा, रमण गोरे, संतोष सुर्वे, चिंतामणी पाटील, प्रभाकर सुर्वे, कृष्णा डोंगरे, पॅट्रिक फर्नांडीस, केशव मुकणे उपस्थित होते.

 

थरारक सामने, दमदार कामगिरी आणि अविस्मरणीय क्षणांनी गाजलेली ही स्पर्धा ठाण्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली!

 


Post a Comment

0 Comments