Type Here to Get Search Results !

आमदार चषक कबड्डीत दणदणीत सलामी आयएसपीएल, एमपीटी, सीजीएसटीचा जलवा! महिलांमध्ये श्रीराम, धर्मवीर, स्वस्तिक संघांची विजयी आगेकूच; विक्रोळीत कबड्डीचा जल्लोष विक्रोळीत कबड्डीचा महासंग्राम सुरू!

 


आमदार चषक कबड्डीत दणदणीत सलामी

आयएसपीएल, एमपीटी, सीजीएसटीचा जलवा!

महिलांमध्ये श्रीराम, धर्मवीर, स्वस्तिक संघांची विजयी आगेकूच; विक्रोळीत कबड्डीचा जल्लोष

विक्रोळीत कबड्डीचा महासंग्राम सुरू!


मुंबई : मुंबईतील विक्रोळी पूर्व येथील टागोर नगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारलेल्या भव्य क्रीडानगरीत सुरू झालेल्या आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेने पहिल्याच दिवशी थराराचा स्फोट घडवला! आमदार सुनील राऊत यांच्या संयोजनाखाली आयोजित या स्पर्धेत पुरुषांच्या व्यावसायिक गटात आयएसपीएल, सीजीएसटी आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी खणखणीत विजय नोंदवला, तर महिलांच्या गटात श्रीराम (पालघर), धर्मवीर (नंदुरबार) आणि स्वस्तिक कबड्डी संघ यांनी दमदार सलामी दिली.

 


भव्य उद्घाटन – मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोष

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार सुनील राऊत, रमेश कोरगावकर, बाबा कदम, दीपक सावंत, विश्वास शिंदे, रश्मी पहुडकर आणि सुधाकर घाग यांची प्रमुख उपस्थिती होती.

 


पुरुष गटात आयएसपीएलचा धडाका – ६०-२१ ने रूपाली ज्वेलर्सचा पराभव

पुरुष गटात इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा.लि. (आयएसपीएल) संघाने रूपाली ज्वेलर्स वर ६०-२१ असा दणदणीत विजय मिळवत आपली ताकद दाखवली. शिवम गोरडे, आदेश वरखडे आणि गिरीराज सिंह यांच्या तुफानी चढाया आणि अचूक पकडींमुळे मध्यंतरालाच ३२-१० अशी भक्कम आघाडी घेत सामना एकतर्फी केला.

 


सीजीएसटीचा एकतर्फी विजय – ५६-१७ ने हिंदुजा रुग्णालयावर मात

दुसऱ्या सामन्यात सीजीएसटी संघाने हिंदुजा रुग्णालय वर ५६-१७ असा एकतर्फी विजय मिळवत स्पर्धेत आपली आक्रमक छाप पाडली. त्यांच्या भक्कम बचाव आणि वेगवान चढायांनी प्रतिस्पर्ध्यांना पूर्णपणे निष्प्रभ केले.

 

मुंबई पोर्ट ट्रस्टची सहज मात – ३८-२१ विजय

मुंबई पोर्ट ट्रस्ट संघाने मुंबई महानगरपालिका वर ३८-२१ असा सहज विजय मिळवत स्पर्धेत दमदार सुरुवात केली. संघाच्या सुसंघटित खेळामुळे हा विजय निर्विवाद ठरला.

 

महिलांमध्ये होतकरू संघाचा थरार – २७-२५ पुनरागमन विजय

महिलांच्या गटात होतकरू मित्र मंडळ आणि कर्नाळा स्पोर्ट्स क्लब यांच्यातील सामना अत्यंत रंगतदार ठरला. सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या होतकरू संघाने मध्यंतरानंतर जबरदस्त पुनरागमन करत २७-२५ असा थरारक विजय मिळवला.

 


श्रीराम, धर्मवीर, स्वस्तिकचा दमदार डंका

महिलांच्या इतर सामन्यांत श्रीराम (पालघर) संघाने स्नेहविकास संघ वर ४४-१३ असा दणदणीत विजय मिळवला. धर्मवीर (नंदुरबार) संघाने जय भारत वर ४४-१६ अशी सहज मात केली, तर स्वस्तिक महिला संघाने पतंगराव कदम (पुणे) संघावर २०-११ असा विजय मिळवत आपला ठसा उमटवला.

 

स्पर्धेची रंगत वाढली!

पहिल्याच दिवशी एकतर्फी विजय आणि काही थरारक लढतींनी स्पर्धेची रंगत शिगेला पोहोचली आहे. आगामी दिवसांत आणखी चुरशीच्या सामन्यांची अपेक्षा असून, कबड्डीप्रेमींसाठी ही स्पर्धा खरी मेजवानी ठरत आहे!


Post a Comment

0 Comments