Type Here to Get Search Results !

‘कबड्डी कबड्डी’च्या जयघोषात श्रमिकची लाल माती पुन्हा दणाणली सहा दशकांचा इतिहास झाला जिवंत! उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कबड्डी दिग्गजांचा गौरव सोहळा आठवणी, सन्मान आणि अभिमानाचा अविस्मरणीय महोत्सव आठवणींचा गजर, इतिहासाचा जल्लोष!

 


कबड्डी कबड्डी’च्या जयघोषात श्रमिकची लाल माती पुन्हा दणाणली

सहा दशकांचा इतिहास झाला जिवंत!

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कबड्डी दिग्गजांचा गौरव सोहळा

आठवणी, सन्मान आणि अभिमानाचा अविस्मरणीय महोत्सव

आठवणींचा गजर, इतिहासाचा जल्लोष!


मुंबई : कबड्डी कबड्डी’च्या घुमणाऱ्या जयघोषाने श्रमिक जिमखान्याची लाल माती अक्षरशः दणाणून गेली आणि जणू काळानेच मागे वळून पाहिलं! सहा दशकांच्या संघर्ष, परिश्रम आणि यशाचा सुवर्ण इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाला. कबड्डी विश्वातील दिग्गज, खेळाडू, प्रशिक्षक आणि कार्यकर्त्यांनी एकाच मंचावर एकत्र येत या पवित्र भूमीत आपल्या कर्तृत्वाचा अभिमानाने उत्सव साजरा केला. हा केवळ महोत्सव नव्हता, तर कबड्डीच्या आत्म्याचा थरारक पुनर्जन्म होता!

 

६० वर्षांचा प्रवास : ‘कबड्डी कबड्डी’तून उभा राहिला इतिहास

आमदार सुनील शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि वरळीच्या अमरप्रेम क्रीडा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त तबेला मैदान ते श्रमिक जिमखाना असा ६० वर्षांचा प्रवास पुन्हा उजळला. साध्या कार्यकर्त्यांपासून ते अर्जुन पुरस्कार विजेत्यांपर्यंत सर्वांना एकाच मंचावर पाहण्याचा दुर्मिळ योग लाभला. प्रत्येक क्षणात इतिहासाची चाहूल आणि प्रत्येक श्वासात त्या मातीतल्या संघर्षाची ऊब जाणवत होती.

 


लाल मातीचा कलश : समर्पणाला मानाचा मुजरा

श्रमिकच्या लाल मातीतून उचललेला कलश जेव्हा दिग्गजांच्या हाती देण्यात आला, तेव्हा तो क्षण भावनांनी ओथंबून गेला. हा सन्मान केवळ औपचारिक नव्हता, तर त्यांच्या घाम, त्याग आणि आयुष्यभराच्या संघर्षाला दिलेला खरा मुजरा होता. अध्यक्ष राणाप्रताप तिवारी यांच्या हृदयस्पर्शी शब्दांनी वातावरण भारावून गेले आणि अनेकांच्या डोळ्यांत आठवणींचे अश्रू दाटून आले.

 

दिग्गजांचा गौरव : सुवर्ण क्षणांना उजाळा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत गत सहा दशकांतील महिला व पुरुष कर्णधारांचा सन्मान सोहळा पार पडला. सदानंद शेट्ये, शांताराम जाधव, शंकुतला खटावकर, राजू भावसार, अशोक शिंदे आणि ‘कबड्डीचा वाघ’ म्हणून ओळखले जाणारे वसंत सूद यांचा झालेला सत्कार हा त्यांच्या कर्तृत्वाला दिलेला अभिमानाचा सलाम ठरला. हे क्षण केवळ छायाचित्रांपुरते मर्यादित नव्हते, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासाच्या आठवणींना दिलेला जिवंत मान होता.

 

कबड्डी कुटुंब’ : प्रत्येक हाताचा सन्मान

अर्जुन पुरस्कार सन्मानित, शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित कार्यकर्ते, प्रशिक्षकहाडवैद्यपत्रकार आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. ज्यांनी खेळाडूंना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या त्या सर्वांना सुध्दा मनाचा मुजरा केला गेला. त्यात बाळ वाडवलीकर (आरसीएफ) हे स्वत: उपस्थित होते, तर कै. अरुण सावंत (एअर इंडिया)कै. रविकांत राणे (बट्ट्या) (सेन्ट्रल बँक)कै. गणपत लाड (बँक ऑफ इंडिया)कै. पांडुरंग शेलार व वसंत पाडगांवकर (बँक ऑफ महाराष्ट्र)कै. लक्षण कदम व श्री. वसंतराव उपलंगार  (भारत पेट्रोलियम),  गणपत लाड (बँक ऑफ इंडया),  मुरलीधर पांडे (सेन्ट्रल रेल्वे), श्री . दाराम पारकर (मुंबई पोष्ट), गणेश रवेणे (युनयन बँक ऑफ इंडया) या सर्वांचा प्रत्यक्ष किंवा त्यांच्या कुटुंबीयां मार्फत सत्कार करण्यात आला. मैदान उभं करणाऱ्या हातांपासून ते खेळाला शिखरावर नेणाऱ्या खेळाडूंपर्यंत प्रत्येकाचा गौरव होताना ‘कबड्डी कुटुंब’ ही भावना अधिक दृढ झाली. हा सन्मान म्हणजे कबड्डीच्या अखंड प्रवासाचा साक्षीदार ठरला.

 

नऊवारीतील रणरागिणी : आधुनिकतेचा देखणा संगम

मुंबईच्या महिला कबड्डीपटूंनी नऊवारी साडीत सादर केलेली रॅम्प चढाई हा महोत्सवाचा खास आकर्षण ठरला. नृत्यदिग्दर्शक गुरु कोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ललिता सुर्वे, लता कंटक, प्रतिमा मांजरेकर, जयश्री सुवर्णा, मनीषा गावंड, तृप्ती सुवर्णा, हिमाली नार्वेकर, हर्षदा नलावडे, दीपा पेडणेकर आणि सोनम पोळे यांनी ‘ए राजे जी रं जी’ या गीतावर सादर केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली.

 

आठवणींचा स्पर्श : शिक्के आणि लिंबाच्या गोळ्यांतून बालपण जिवंत

श्रमिकमध्ये प्रवेश करताच मनगटावर शिक्का आणि हातात लिंबाच्या गोळ्या देत केलेल्या स्वागताने सर्वांना बालपणात नेलं. ‘स्टॅम्प इथे मारा’ म्हणत दिग्गजही त्या निरागस क्षणांत हरवले. हा सोहळा केवळ कार्यक्रम नव्हता, तर नात्यांचा, आठवणींचा आणि अभिमानाचा जिवंत उत्सव ठरला.

 


समारोप : श्रमिकची नाळ कायम जिवंत!

श्रमिकच्या लाल मातीत रुजलेली कबड्डीची नाळ आजही तितकीच मजबूत आणि जिवंत आहे. सहा दशकांचा इतिहास, असंख्य आठवणी आणि असामान्य कर्तृत्व यांचा संगम असलेला हा महोत्सव प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरला गेला. ‘कबड्डी कबड्डी’चा जयघोष पुढील पिढ्यांनाही प्रेरणा देत राहील, याची खात्री या सोहळ्याने पुन्हा एकदा दिली!

 


Post a Comment

0 Comments