Type Here to Get Search Results !

श्री मावळी मंडळ कबड्डीत दुसऱ्या दिवशीही थरार कायम! होतकरू, मिडलाईन, जय भवानी, बालगोपाळ यांची आगेकूच महिलांत स्नेहविकास, ओम् वर्तकनगर, नवशक्ती यांचा दमदार खेळ; जीत सिंग व आस्था सिंग ठरले दिवसातील उत्कृष्ट खेळाडू दुसऱ्या दिवशीही रंगली कबड्डीची जंग

 


श्री मावळी मंडळ कबड्डीत दुसऱ्या दिवशीही थरार कायम! होतकरू, मिडलाईन, जय भवानी, बालगोपाळ यांची आगेकूच

महिलांत स्नेहविकास, ओम् वर्तकनगर, नवशक्ती यांचा दमदार खेळ; जीत सिंग आस्था सिंग ठरले दिवसातील उत्कृष्ट खेळाडू

दुसऱ्या दिवशीही रंगली कबड्डीची जंग

 

ठाणे : ठाणे चरई येथील भव्य पटांगणावर सुरू असलेल्या श्री मावळी मंडळ आयोजित ७३व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा-२०२६ मध्ये दुसऱ्या दिवशीही थरार, वेग आणि कौशल्याचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला. प्रेक्षकांच्या गगनभेदी जल्लोषात खेळाडूंनी आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करत मैदान अक्षरशः दणाणून सोडले.

 

उत्कृष्ट खेळाडू : जीत सिंग व आस्था सिंग यांची चमक

दिवसभरातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरुष गटात जीत सिंग (डॉन बास्को), तर महिला गटात आस्था सिंग (एस. आय. ई. एस.) यांची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

 

पुरुष गट : होतकरूची दमदार कमबॅक विजयगाथा

पुरुष गटात होतकरू मंडळ (ठाणे) संघाने केदारनाथ मंडळ (मुंबई उपनगर) वर २८-१९ असा शानदार विजय मिळवला. पूर्वार्धात ०९-१० पिछाडीवर असलेल्या होतकरूने उत्तरार्धात लोण देत सामना आपल्या बाजूने झुकविला. मितेश चव्हाण यांच्या चढाया तर तुषार यादव देवेन पाटील यांच्या भक्कम बचावाने विजय निश्चित केला, तर पराभूत संघाकडून ओमकार कदम ओम् कदम यांचा खेळ उत्तरार्धात कमी पडला.

 

मिडलाईनची सरशी : चतुरस्त्र खेळाने विजय

मिडलाईन स्पोर्टस् संघाने अष्टविनायक संघावर ३१-२३ अशी मात केली. अभिषेक भोईर, धीरज बैलमारे अजित चव्हाण यांच्या चतुरस्त्र खेळामुळे मिडलाईनने सामन्यावर पकड ठेवली. अष्टविनायककडून स्वयंम गोंधळे सागर भोईर यांनी चांगला खेळ केला.

 

जय भवानीचा दमदार विजय : आघाडी कायम ठेवत बाजी मारली

जय भवानी तरुण मंडळाने चिंतामणी स्पोर्टस् संघावर ३४-२५ असा विजय मिळवला. विश्रांतीला १५-१० अशी आघाडी घेतलेल्या जय भवानीकडून तुळशीदास शिर्के, कुणाल शिंदे ऋषिकेश पवार यांनी चढाई व पकडीमध्ये उत्कृष्ट समन्वय दाखवला, तर चिंतामणीकडून हर्षल शहा विशाल सणस चमकले.

 


बालगोपाळचा निसटता विजय : चुरशीच्या लढतीत बाजी

बालगोपाळ मित्र मंडळाने ओवळी मंडळावर ३४-३१ असा निसटता विजय मिळवला. मध्यंतराला सामना १४-१४ असा बरोबरीत होता. उत्तरार्धात फाजल नाडर, राज चौधरी अतिश जीत यांनी खेळ उंचावत विजय मिळवून दिला. ओवळी संघाकडून महेश कदम, प्रिन्स यादव चिराग सिंग यांनी चांगली झुंज दिली.

 

महिला गट : स्नेहविकासचा थरारक विजय

महिला गटात स्नेहविकास मंडळ (मुंबई उपनगर) संघाने अश्वमेघ स्पोर्टस् (ठाणे) वर २६-२५ असा रोमांचक विजय मिळवला. विश्रांतीला १४-०९ अशी आघाडी घेतलेल्या स्नेहविकासकडून प्राची तावडे, रिया तावडे प्रांजल जाधव यांनी उत्कृष्ट खेळ केला, तर अश्वमेघकडून वैष्णवी चव्हाण चमकली.

 

ओम् वर्तकनगरची एकतर्फी सरशी

ओम् वर्तकनगर संघाने सत्यम सेवा संघावर ३८-०८ अशी एकतर्फी मात केली. वैष्णवी साळुंखे, पूजा जाधव पूर्वा इंगवले यांच्या तुफानी खेळामुळे हा विजय सहज शक्य झाला.

 

अमरहिंदचा मोठा विजय

अमरहिंद (मुंबई शहर) संघाने छत्रपती शिवाजी मंडळ (ठाणे) वर ६०-३८ असा दणदणीत विजय मिळवला. पराभूत संघाकडून तारा देसाई रेखा गुप्ता यांनी चांगली कामगिरी केली.

 

इतर संक्षिप्त निकाल :

पुरुष : सत्यम सेवा वि. वि. स्व. रतन पाटील मंडळ ४१-१७, श्री समर्थ-कलवार वि. वि. श्री स्वामी समर्थ ३६-१७, विवेक स्मृती वि. वि. विजय क्रीडा ३३-१६,  गावादेवी-जाभूळ वि. वि. सन्मित्र उपनगर ४६-१०


महिला : नवशक्ती स्पोर्टस् वि. वि. किल्ले माऊली ३४-१७, विवेक स्पोर्टस् वि. वि. डॉ. शिरोडकर (मुंबई) ५२-१८




Post a Comment

0 Comments