Type Here to Get Search Results !

५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक मुली गटात सांगलीचे सलग दुसरे विजेतेपद कुमार गटात सोलापूर तृतीय तर मुली गटात चतुर्थ कुमार गटात धाराशिवचा दबदबा कायम; मुलींमध्ये सांगलीची विजयी परंपरा अबाधित राज जाधव व धनश्री तामखेडे यांना सर्वोत्कृष्ट ‘विवेकानंद’ व ‘सावित्री’ पुरस्कार

 


५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक

मुली गटात सांगलीचे सलग दुसरे विजेतेपद

कुमार गटात सोलापूर तृतीय तर मुली गटात चतुर्थ

कुमार गटात धाराशिवचा दबदबा कायम; मुलींमध्ये सांगलीची विजयी परंपरा अबाधित

राज जाधव व धनश्री तामखेडे यांना सर्वोत्कृष्ट ‘विवेकानंद’ व ‘सावित्री’ पुरस्कार

 

सोलापूर, दि. ६ जून (स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीतून) : महाराष्ट्राच्या खो-खो विश्वात पुन्हा एकदा धाराशिवच्या कुमार संघाने वर्चस्व सिद्ध करत सलग तिसरे विजेतेपद पटकावून हॅटट्रिक पूर्ण केली. तर मुलींच्या गटात सांगलीने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद कायम राखत आपली ताकद अधोरेखित केली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन व किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर ही स्पर्धा पार पडली.

 

कुमार अंतिम फेरीत धाराशिवचा दमदार विजय, हॅटट्रिक साकार

कुमार गटाच्या अंतिम सामन्यात धाराशिवने मुंबई उपनगरवर ३२-२६ अशी ६ गुणांची मात करत २.५० मिनिटे राखून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मध्यंतरालाच दोन ड्रीम रनच्या जोरावर १८-१२ अशी निर्णायक आघाडी घेत धाराशिवने सामन्यावर पकड मजबूत केली. वीरसिंग पाडवी (१.१०, १.१० मि. संरक्षण), जितेंद्र वसावे (३.२० मि. संरक्षण व ८ गुण), महेश पाडवी (१.४० मि. संरक्षण व २ गुण), भिमसिंग वसावे (१.१० मि. संरक्षण), राज जाधव (१.२०, २.१० मि. संरक्षण व २ गुण), हरद्या वसावे (१.५० मि. संरक्षण व ८ गुण), सोत्या वळवी (नाबाद १.२० मि. संरक्षण व ६ गुण) व पिंटू वळवी (२ गुण) यांनी शानदार कामगिरी करत धाराशिवची हॅटट्रिक साकारली. उपविजेत्या मुंबई उपनगरकडून आर्यन चव्हाण (१.४० मि. संरक्षण), साहिल वासनिक (१.४०, १.०० मि. संरक्षण व २ गुण), सचिन सहानी (१.१० मि. संरक्षण व ४ गुण), अमेय मुर्चावडे (२ गुण), समर्थ सावंत (१.५० मि. संरक्षण व १० गुण) व आदेश राठोड (१.५० मि. संरक्षण व ८ गुण) यांनी झुंजार लढत दिली; मात्र धाराशिवचा विजयी रथ रोखण्यात त्यांना अपयश आले.

 


सांगलीची विजयी परंपरा कायम; ठाण्याला अंतिम फेरीत रोखले



मुलींच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या सांगलीने ठाण्याचा २७-१९ असा ८ गुणांनी पराभव करत सलग दुसरे विजेतेपद पटकावले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी ३-३ ड्रीम रन मिळवत ११-११ अशी बरोबरी साधली होती. मात्र उत्तरार्धात सांगलीने आक्रमणाची गती वाढवत सामना आपल्या बाजूने झुकवला. विजेत्या सांगलीकडून वैष्णवी चाफे (२.४० मि. संरक्षण व २ गुण), श्रावणी तामखेडे (२.१६ मि. संरक्षण व २ गुण), वेदिका तामखेडे (२.१० मि. संरक्षण), विद्या तामखेडे (१.१० मि. संरक्षण), अनुष्का तामखेडे (८ गुण), धनश्री तामखेडे (२.१० मि. संरक्षण व ४ गुण), कृतिका आहेर (२.३० मि. संरक्षण), भौरम्मा उडगी (१.४० मि. संरक्षण व २ गुण) व पायल तामखेडे (१.५४ मि. संरक्षण व २ गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. उपविजेत्या ठाण्याकडून प्राची वानगडे (१ मि. संरक्षण), स्वरा साळुंखे (१.२० मि. संरक्षण), धनश्री कंक (१.५० मि. संरक्षण व ८ गुण), श्रुती चोरमुले (२ गुण), प्रणिती जगदाळे (२.२०, १ मि. संरक्षण व २ गुण), गुड्डी राठोड (२.३० मि. संरक्षण) व निधी जाधव (१.५० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र दुसऱ्या डावातील ढासळलेल्या कामगिरीमुळे त्यांना सांगलीला धक्का देता आला नाही.

 


सोलापूरचा कुमार गटात तिसरा, मुलींत चौथा क्रमांक

लघुत्तम आक्रमणाच्या आधारे झालेल्या स्थान निश्चिती सामन्यांमध्ये कुमार गटात सोलापूरने तृतीय, तर पुण्याने चतुर्थ स्थान पटकावले. मुलींच्या गटात धाराशिवने तृतीय, तर यजमान सोलापूरला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

 

राज जाधव व धनश्री तामखेडे यांना सर्वोच्च सन्मान

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी दिले जाणारे प्रतिष्ठेचे विवेकानंद’ आणि ‘सावित्री’ पुरस्कार अनुक्रमे धाराशिवच्या राज चंद्रजीत जाधव आणि सांगलीच्या धनश्री विठ्ठल तामखेडे यांनी पटकावले.

वैयक्तिक पारितोषिक विजेते

कुमार गट                            मुली गट

  • संरक्षक : जितेंद्र धर्मसिंग वसावे (धाराशिव);         धनश्री प्रकाश कंक (ठाणे)
  • आक्रमक : समर्थ संजय सावंत (मुंबई उपनगर);    अनुष्का आबासो खाडे (सांगली)
  • अष्टपैलू : राज चंद्रजीत जाधव (धाराशिव);             धनश्री विठ्ठल तामखेडे (सांगली)

 

दिमाखदार बक्षीस वितरण समारंभ

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोलापूर अम्युचर खो खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. महेश गादेकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस - डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष - सचिन गोडबोले, खजिनदार - अ‍ॅड. गोविंद शर्मा,  उपाध्यक्षा - अश्विनी पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी असोसिएशनचे संयुक्त चिटणीस डॉ. राजेश सोनावणे, डॉ. पवन पाटील, बाळासाहेब तोरसकर, वर्षा कच्छवा, शाहू शिक्षण संस्था पंढरपूरचे अध्यक्ष अब्राहम बापू आवळे जी, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ वाडीकुरोलीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, एकनाथ शिंदे स्वाभिमानी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ, महेश नाना साठे लोकसभा संपर्कप्रमुख शिवसेना, सचिन चव्हाण सोलापूर शहर प्रमुख शिवसेना, रेवन राठोड दुग्ध विकास अधिकारी, मागास समाजसेवा दक्षिण सोलापूर मंडळाचे सचिव नागेश बिराजदार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते  मा. श्रीकांत ढेपे, जिल्हा क्रीडा संघटक अजित संगवे, लक्ष्मी पतसंस्थेचे अंबादास जाधव, मागास समाजसेवा मंडळाचे सचिव किरण चव्हाण, क्रिस्टल डेव्हलपर्स चे लक्ष्मीकांत कोळी. सेवा फाउंडेशन चे संस्थापक प्रकाश राठोड, सोलापूर असोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड, दत्तात्रय पाटील महाराष्ट्र राज्य वस्तीग्रह अनुदानित संघटना, अजित शिंदे, या स्पर्धेच्या अध्यक्षा सौ अलका राठोड महापौर सोलापूर महानगरपालिका, सचिव मोहन रजपूत, सहसचिव यशोदीप आठवले, उपाध्यक्ष प्राचार्य अंबादास पांढरे, प्रा. डॉ. लालसिंग राजपूत, अर्जुन पवार, गणेश पवार, ललिता केंगार, प्राची जेऊर, यल्लालिंग लिंग तुपे, प्रवीण  जाधव, लालसिंग राठोड, अविनाश राठोड, मदन पोलके, अनिकेत जाधव विकास राठोड, रोशन रजपूत, विक्रम राठोड,  सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन व किरण स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.


Post a Comment

0 Comments