मुंबई महापौर चषक योगासन स्पर्धेत श्री
नारायणराव आचार्य विद्या निकेतनचा झेंडा फडकला
२५० हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग
श्रवण-दृष्टीबाधित विद्यार्थ्यांच्या सहभागाने
स्पर्धेला सर्वसमावेशकतेची नवी ओळख
चेंबूरमध्ये योगासन कौशल्याचा भव्य सोहळा
मुंबई : चेंबूर येथील एन. जी. आचार्य व डी. के. मराठे
महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रंगलेल्या मुंबई महापौर चषक योगासन स्पर्धा – २०२६ मध्ये श्री नारायणराव
आचार्य विद्या निकेतन संघाने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत
विजेतेपदावर मोहोर उमटवली. बृहन्मुंबई महानगरपालिका पुरस्कृत व बृहन्मुंबई योग
संघाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी
आपल्या लवचिकता, संतुलन आणि कौशल्याची दमदार झलक दाखवली. अंतिम गुणतालिकेत श्री पवनपुत्र
प्रतिष्ठान संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
विजेत्या संघाची पदकांवर दमदार छाप
विजेतेपद पटकावणाऱ्या श्री नारायणराव आचार्य विद्या निकेतन संघाने पदकांची
अक्षरशः लयलूट केली. संघातील शलेक मोरे आणि वेदीत भंडारी यांनी प्रत्येकी सुवर्णपदक जिंकत संघाच्या यशाचा पाया भक्कम केला. त्यानंतर श्लोक पडवळ याने रौप्यपदक मिळवत चमकदार
कामगिरी नोंदवली, तर श्लोक ठोबरे आणि काव्या कुंडे यांनी प्रत्येकी कांस्यपदक पटकावत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
या खेळाडूंच्या सातत्यपूर्ण आणि दर्जेदार कामगिरीमुळे प्रतिस्पर्धी संघांचा प्रभाव
कमी पडला.
उपविजेत्या पवनपुत्र प्रतिष्ठानची झुंज
उपविजेतेपद मिळवणाऱ्या श्री पवनपुत्र प्रतिष्ठान संघानेही
स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. संघातील रूत्वीक पाटील, नक्श सावंत, शोवी जैन, फ्रेया परमार, रीदया डांगे आणि भाविका कदम यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत संघाला
उपविजेतेपदापर्यंत मजल मारून दिली. विजेतेपद हुकले असले तरी या खेळाडूंनी
दाखविलेली जिद्द आणि तांत्रिक कौशल्य उपस्थितांची दाद मिळवून गेले.
श्रवण-दृष्टीबाधित विद्यार्थ्यांच्या सहभागाने
स्पर्धेची उंची वाढली
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे श्रवण-दृष्टीबाधित (Deaf-Blind)
विद्यार्थ्यांचा
प्रथमच झालेला सहभाग. बृहन्मुंबई योग संघाने या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध
करून देत योग हा सर्वांसाठी खुला आणि सर्वसमावेशक खेळ असल्याचा प्रभावी संदेश
समाजापर्यंत पोहोचवला. या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर आणि पालकांनी विशेष कौतुक
केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वी आयोजन
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला सौ. मिनाक्षी
पाटणकर (स्थानिक नगरसेविका), अनिल चौहान (अध्यक्ष, बृहन्मुंबई योग संघ), सुबोध आचार्य (विश्वस्त, लोकमान्य शिक्षण संस्था), सौ. मानसी दाळी (उपाध्यक्ष, स्पेशल ऑलिम्पिक्स भारत), डॉ. जितेंद्र लिंबकर, डॉ. महेंद्र चेंबूरकर, राहुल ससाणे तसेच शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त योगेश पवार यांची प्रमुख
उपस्थिती लाभली. मान्यवरांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करत योगाच्या माध्यमातून
निरोगी आणि सशक्त समाज घडविण्याचा संदेश दिला.
योगासन चळवळीला नवी ऊर्जा
१०, १२, १४, २० वर्षांखालील तसेच २० वर्षांवरील मुले, मुली, पुरुष आणि महिला अशा विविध गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेला २५० हून अधिक
खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दर्जेदार आयोजन, उच्चस्तरीय स्पर्धा आणि सर्वसमावेशक सहभागामुळे
मुंबई महापौर चषक योगासन स्पर्धा यंदाही योगप्रेमींसाठी संस्मरणीय ठरली.

Post a Comment
0 Comments