मुंबई महापौर चषक ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स
स्पर्धेत श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचे वर्चस्व कायम
१५ संघ, २५० हून अधिक खेळाडूंच्या सहभागात यजमान संघ अजिंक्य
देव स्पोर्ट्स अॅकॅडमी उपविजेती
विजयाची परंपरा पुन्हा कायम
मुंबई : ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्समधील आपले निर्विवाद वर्चस्व
पुन्हा एकदा सिद्ध करत श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई
महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे विजेतेपद दिमाखात
पटकावले. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत यजमान
संघाच्या खेळाडूंनी अचूकता, समन्वय आणि अप्रतिम कौशल्याचे दर्शन घडवत प्रतिस्पर्ध्यांचा अक्षरशः
धुव्वा उडवला. विशेष म्हणजे २००२ ते २०२६ या कालावधीत झालेल्या सर्व
स्पर्धांमध्ये श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने अजिंक्यपदाची
परंपरा अखंड राखत सुवर्ण इतिहास कायम ठेवला आहे.
१५ संघांचा सहभाग, स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत १५ संघांतील २५० हून अधिक
खेळाडूंनी सहभाग घेतला. विविध गटांतील चुरशीच्या लढतींनी प्रेक्षकांचे भरभरून
मनोरंजन केले. अंतिम गुणतालिकेत देव स्पोर्ट्स अॅकॅडमीने उपविजेतेपद पटकावत
उल्लेखनीय कामगिरी नोंदवली, मात्र विजेतेपदाच्या शर्यतीत विद्यानिकेतनच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच
निर्विवाद वर्चस्व राखले.
मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन
स्पर्धेचे उद्घाटन लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव माणिक
पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार सना मलिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मोहिते,
जयप्रकाश अग्रवाल, लोकमान्य शिक्षण
संस्थेचे विश्वस्त सुबोध आचार्य, हरिश्चंद्र गवस,
हिरा मोराळे, डॉ. महेंद्र चेंबूरकर,
सचिव मोहन बामणे आणि आंतरराष्ट्रीय पंच मंदार म्हात्रे
यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
विजेत्या संघातील खेळाडूंची चमकदार कामगिरी
विजेतेपद पटकावणाऱ्या श्री नारायणराव आचार्य
विद्यानिकेतन संघातील खेळाडूंनी विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी
नोंदवली. वुमेन्स पेअर प्रकारात विशाखा दोरगे आणि रूणल रणपिसे
या जोडीने प्रभावी सादरीकरण केले. मेन्स पेअरमध्ये यज्ञेश भोस्तेकर आणि
नमन महावर यांनी शानदार समन्वय साधत संघाला महत्त्वाचे गुण मिळवून दिले. मिक्स
पेअर प्रकारात भूमिका भारंबे आणि आदित्य दिघे यांनी आकर्षक
कौशल्याचे प्रदर्शन केले.
गट स्पर्धांमध्येही विद्यानिकेतनचा दबदबा
वुमेन्स ग्रुप प्रकारात श्रद्धा मोहिते, वैदही मयेकर आणि
साक्षी गावडे यांनी अचूक सादरीकरण करत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. मेन्स
ग्रुपमध्ये दिक्षांत ससाणे, समर्थ खन्नुकर,
अथर्व जानसकर आणि नमो उनियाल यांनी
अप्रतिम समन्वय, संतुलन आणि साहसी कसरतींचे दर्शन घडवत
संघाच्या अजिंक्यपदात मोलाची भर घातली.
आयोजनासाठी अथक परिश्रम
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राहुल ससाणे, सुनिल रणपिसे, योगेश पवार, रमेश सकट, सुहास यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक
परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे स्पर्धा उत्साहपूर्ण आणि
यशस्वी वातावरणात पार पडली.
अजिंक्यपदाची सुवर्ण परंपरा कायम
मुंबई महापौर चषक स्पर्धेत पुन्हा एकदा बाजी मारत श्री
नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स क्षेत्रातील
आपले अधिराज्य अधोरेखित केले. सलग अनेक वर्षांची विजयी परंपरा कायम राखत या संघाने
मुंबईतील जिम्नॅस्टिक्स क्षेत्रात आपली वेगळी ओळख अधिक भक्कम केली आहे.

Post a Comment
0 Comments