मराठी कलावंतांचा मल्लखांबाशी अनोखा संगम
बोरीवलीतील आगळ्यावेगळ्या कार्यशाळेला
उत्स्फूर्त प्रतिसाद!
आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनानिमित्त रंगला अनोखा
उपक्रम
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची
उपस्थिती, मल्लखांब विकासासाठी मदतीचे आश्वासन
कलावंतांनी अनुभवला मल्लखांबाचा रोमांचकारी
प्रवास
मुंबई : मराठी मनोरंजन विश्व आणि भारताच्या पारंपरिक
क्रीडा संस्कृतीचा अनोखा मिलाफ बोरीवलीत अनुभवायला मिळाला. आंतरराष्ट्रीय मल्लखांब
दिनाचे औचित्य साधत ‘आगळ्यावेगळ्या मराठी कलावंत मल्लखांब कार्यशाळे’चे आयोजन
करण्यात आले आणि या उपक्रमाला मराठी कलावंतांसह क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त
प्रतिसाद लाभला. मल्लखांबाच्या माध्यमातून भारतीय परंपरा, शारीरिक क्षमता आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम
अनुभवत कलाकारांनी या उपक्रमात मनापासून सहभाग नोंदवला.
आशिष आणि संचिता देवल यांच्या संकल्पनेतून
साकारला उपक्रम
बोरीवली पश्चिम येथे आशिष देवल आणि संचिता देवल यांच्या संकल्पनेतून मल्लखांब लव संघ आणि बीमानगर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त
विद्यमाने तसेच संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले. मल्लखांब खेळाचा प्रचार, प्रसार आणि लोकप्रियता वाढवण्याच्या उद्देशाने
हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
मराठी कलाकारांनी घेतला मल्लखांबाचा थरारक अनुभव
या कार्यशाळेत मराठी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील
लोकप्रिय कलाकार प्रथमेश परब, ओंकार भोजने, भाग्यश्री मिलिंद, वैष्णवी घोडके, मानसी घाटे, भक्ती देसाई, सानीका काशीकर, भाग्यश्री दळवी आणि सुमित भोकसे यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कलाकारांनी
प्रत्यक्ष मल्लखांबाचा अनुभव घेत या पारंपरिक भारतीय खेळाचा आनंद लुटला.
रामदास आठवले यांचे मल्लखांबासाठी मदतीचे
आश्वासन
या विशेष कार्यशाळेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख
उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या खास शैलीत या अभिनव उपक्रमाचे आणि प्रमुख
प्रशिक्षक आशिष देवल व संचिता देवल यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले. तसेच
मल्लखांब खेळाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावरून शक्य ती सर्व मदत करण्याचे
आश्वासन त्यांनी दिले.
राष्ट्रीय खेळाडूंच्या प्रात्यक्षिकांनी वेधले
लक्ष
कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्तरावरील मल्लखांब खेळाडूंनी
सादर केलेल्या नेत्रदीपक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. संतुलन, लवचिकता, ताकद आणि कौशल्याचा अप्रतिम आविष्कार पाहून
उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचे कौतुक केले.
मल्लखांब प्रचारासाठी कलाकारांची बांधिलकी
या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व कलाकारांनी भविष्यातही
मल्लखांबाच्या प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग
नोंदवण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मल्लखांबाला लोकप्रिय संस्कृतीच्या माध्यमातून
नवे व्यासपीठ मिळण्याचा मार्ग अधिक मजबूत झाला आहे.
पारंपरिक खेळाला आधुनिक व्यासपीठ
बोरीवलीतील हा उपक्रम केवळ कार्यशाळा न राहता, पारंपरिक भारतीय खेळाला आधुनिक आणि व्यापक
व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरला. आशिष देवल, संचिता देवल, संजय दळवी आणि सहभागी मराठी कलावंतांच्या पुढाकारामुळे
मल्लखांबाच्या जागतिक वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली आहे.

Post a Comment
0 Comments