Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय स्तरावर उपनगरच्या पंचांचा दबदबा निर्माण होईल तेव्हाच खरे समाधान! मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या निवासी पंच मार्गदर्शन शिबिरात अध्यक्ष अमोल कीर्तिकर यांची महत्त्वाकांक्षी भूमिका दिल्लीचे आंतरराष्ट्रीय पंच अजितकुमार यांचे सखोल मार्गदर्शन

 


आंतरराष्ट्रीय स्तरावर उपनगरच्या पंचांचा दबदबा निर्माण होईल तेव्हाच खरे समाधान!

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या निवासी पंच मार्गदर्शन शिबिरात अध्यक्ष अमोल कीर्तिकर यांची महत्त्वाकांक्षी भूमिका

 दिल्लीचे आंतरराष्ट्रीय पंच अजितकुमार यांचे सखोल मार्गदर्शन

 

मुंबई : राज्यस्तरावर आपली छाप उमटविणे ही केवळ सुरुवात आहे; परंतु मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे पंच आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अंतिम सामन्यांचे संचालन करताना दिसतील, तेव्हाच या प्रयत्नांचे खरे समाधान मिळेल, असे स्पष्ट आणि प्रेरणादायी प्रतिपादन असोसिएशनचे अध्यक्ष अमोल कीर्तिकर यांनी केले. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित तीन दिवसीय निवासी पंच मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी पंचांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेऊन जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचे आवाहन केले.

 

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पंचनिर्मितीचा संकल्प

अमोल कीर्तिकर म्हणाले, "राज्यात आपल्या पंचांचा दबदबा आहेच; मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर अंतिम सामने आपल्या पंचांनी नियंत्रित केले, तरच या शिबिराचे खरे सार्थक होईल." पंचांना अद्ययावत नियम, तांत्रिक बारकावे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी दिल्लीचे आंतरराष्ट्रीय पंच अजितकुमार यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा मनमोकळेपणाने लाभ उपस्थित पंचांना दिला. या प्रशिक्षणाला उपनगरचे राष्ट्रीय पंच आत्माराम चव्हाण यांनी प्रभावी साथ दिली. पंचांना संवादातून विचार करायला लावणारी त्यांची शैली विशेष लक्षवेधी ठरली.

 

८० पंचांचा उत्स्फूर्त सहभाग

दि. ३ ते ५ जुलै २०२६ या कालावधीत खंडाळा येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या 'श्रम साफल्य' येथे आयोजित या निवासी शिबिरात सुमारे ८० पंच सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. याशिवाय, स्वतःचे तांत्रिक ज्ञान अधिक समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या तांत्रिक समितीतील सदस्यांनीही या शिबिरात सक्रिय सहभाग घेतला.

 


मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप

शिबिराचा समारोप संघटनेचे माजी सचिव व विद्यमान सल्लागार गणपत लाड यांच्या हस्ते झाला. यावेळी उपाध्यक्ष प्रताप शिंदे, कार्याध्यक्ष सुधाकर घाग, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे तांत्रिक समिती प्रमुख मिनानाथ धानजी, तसेच संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यशस्वी आयोजनासाठी सर्वांची मेहनत

शिबिराच्या नियोजनापासून समारोपापर्यंत कार्याध्यक्ष सुधाकर घाग यांनी स्वतः उपस्थित राहून संपूर्ण व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पंच समितीचे अध्यक्ष राजन अनभवणे, सचिव प्रशांत भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण सावंत यांनी केले, तर प्रमुख कार्यवाह राजेश पडेलकर यांनी आयोजनाची धुरा समर्थपणे सांभाळली.


Post a Comment

0 Comments