चेंबूर जिमखाना राज्य मानांकन कॅरम
स्पर्धेत प्रशांत मोरे आणि मधुरा देवळे यांची दणदणीत सरशी!
विश्वविजेत्या प्रशांतने संजय
मांडेचा धुव्वा उडवला
मधुराने आकांक्षा कदमवर वर्चस्व
गाजवत पटकावले विजेतेपद
अंतिम फेरीत विश्वविजेत्या प्रशांतचा
दबदबा
मुंबई : चेंबूर जिमखानातर्फे तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटना यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात
आलेल्या ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत
मुंबईच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरेने आपल्या दर्जेदार आणि आक्रमक
खेळाचा प्रत्यय देत अनुभवी माजी राष्ट्रीय विजेता संजय मांडे याचा २५-७, २५-१० असा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड ठेवणाऱ्या प्रशांतने संजयला पुनरागमनाची कोणतीही
संधी दिली नाही आणि एकतर्फी विजयासह चषक आपल्या नावावर केला.
पंकज पवारची कांस्यपदकावर मोहोर; उपांत्य फेरीत प्रशांत-संजयची दमदार
कामगिरी
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या
सामन्यात ठाण्याच्या पंकज पवारने मुंबईच्या राहुल सोलंकीचा २५-१५, २५-२२ असा पराभव करत तिसरे स्थान पटकावले.
यापूर्वी उपांत्य फेरीत संजय मांडेने पंकज पवारवर २३-१७, २४-१५ अशी मात केली होती, तर प्रशांत मोरेने राहुल सोलंकीला २५-१९, २५-१० अशा सरळ सेटमध्ये पराभूत करून अंतिम
फेरी गाठली होती.
महिला गटात मधुरा देवळेची विजयी
घोडदौड
महिला एकेरीच्या अंतिम फेरीत
ठाण्याच्या मधुरा देवळेने शानदार खेळ करत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमवर २४-१८, २५-६ असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत
विजेतेपद पटकावले. पहिल्या सेटमध्ये आकांक्षाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या सेटमध्ये मधुराने
अक्षरशः वर्चस्व गाजवत एकतर्फी विजय नोंदवला.
प्राजक्ता नारायणकरचा जिद्दीने
कांस्यपदकावर कब्जा
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत
मुंबईच्या प्राजक्ता नारायणकरने सहकारी मैत्रेयी गोगटेवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात १६-१७, २०-१५, २२-१५ असा जिद्दी विजय मिळवत तिसरे स्थान
पटकावले. पहिला सेट गमावल्यानंतर प्राजक्ताने केलेले पुनरागमन उल्लेखनीय ठरले.
उपांत्य फेरीत रंगल्या चुरशीच्या
लढती
महिला उपांत्य फेरीत आकांक्षा कदमने प्राजक्ता नारायणकरवर ०-२५, २२-२०, २३-११ असा नाट्यमय विजय मिळवत अंतिम फेरी
गाठली. पहिला सेट पूर्णपणे गमावल्यानंतर सलग दोन सेट जिंकत तिने दमदार पुनरागमन
केले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मधुरा देवळेने मैत्रेयी गोगटेवर ८-२३,
२३-४,
२५-० असा विजय मिळवला. पहिला सेट गमावल्यानंतर मधुराने पुढील दोन सेटमध्ये
प्रतिस्पर्धीचा अक्षरशः धुव्वा उडवत, विशेषतः निर्णायक सेट २५-० असा जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा
गौरव
स्पर्धेतील विजेत्यांना चेंबूर जिमखान्याचे अध्यक्ष सुरिंदर
शर्मा, उपाध्यक्ष श्याम अगरवाल, स्पोर्ट्स सचिव रणजित धामी, सह सचिव पी. एम. बाला, कॅरम व बुद्धिबळ विभागाचे सचिव
बाळकृष्ण परब, स्पर्धेचे प्रायोजक एन. एल. गुप्ता, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे
उपाध्यक्ष यतिन ठाकूर,
मानद
सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे
कार्याध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या हस्ते रोख पारितोषिके, चषक आणि प्रावीण्य प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेत पुरुष गटात प्रशांत मोरेने आपल्या विश्वविजेत्या दर्जाला
साजेसा खेळ करत अंतिम फेरीत संजय मांडेला कोणतीही संधी न देता एकतर्फी विजय मिळवला. २५-७ आणि २५-१० अशा गुणफलकाने त्याच्या वर्चस्वाची
स्पष्ट साक्ष दिली. महिला गटात मधुरा देवळेनेही तितक्याच प्रभावी पद्धतीने विजेतेपद
पटकावले. विशेष म्हणजे उपांत्य फेरीतील निर्णायक सेट २५-० असा जिंकत तिने प्रतिस्पर्धीचा
पूर्णपणे धुव्वा उडवला, तर अंतिम फेरीतही दुसऱ्या सेटमध्ये २५-६ अशी दणदणीत कामगिरी करत आपल्या
उत्कृष्ट फॉर्मची पुन्हा एकदा प्रचिती दिली. अनुभवी आणि उदयोन्मुख खेळाडूंच्या
दर्जेदार लढतींमुळे ही स्पर्धा राज्य कॅरममधील आणखी एक संस्मरणीय पर्व ठरली.


Post a Comment
0 Comments