Type Here to Get Search Results !

कै. विनायक निम्हण राज्य कॅरममध्ये मैत्रेयी गोगटेची आगेकूच अंबिका हरिथवर तीन सेटमध्ये थरारक विजय पुरुष गटात प्रशांत, झैद, नीलांश व सागरची दणदणीत आगेकूच मैत्रेयीची झुंज; निर्णायक सेटमध्ये बाजी

 



कै. विनायक निम्हण राज्य कॅरममध्ये मैत्रेयी गोगटेची आगेकूच

अंबिका हरिथवर तीन सेटमध्ये थरारक विजय

पुरुष गटात प्रशांत, झैद, नीलांश व सागरची दणदणीत आगेकूच

मैत्रेयीची झुंज; निर्णायक सेटमध्ये बाजी


पुणे : सनिज वर्ल्ड, सनी स्पोर्ट्स किंग्डम, पुणे येथे रंगलेल्या कै. विनायक निम्हण तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत मुंबईच्या मैत्रेयी गोगटेने अटीतटीच्या लढतीत मुंबईच्याच अंबिका हरिथचा तीन सेटमध्ये २-२५, २०-१५, १८-१७ असा पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेटमध्ये २-२५ असा सपशेल पराभव पत्करल्यानंतर मैत्रेयीने खेळाचा नूरच बदलला. दुसऱ्या सेटमध्ये २०-१५ अशी बाजी मारत तिने सामना बरोबरीत आणला आणि निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये एका गुणाच्या फरकाने १८-१७ असा विजय मिळवत सामना आपल्या नावावर केला.

 

प्रशांतचा सरळ दोन सेटमध्ये दणदणीत विजय

पुरुष एकेरीच्या ५ व्या फेरीत मुंबईच्या माजी विश्वविजेत्या प्रशांत मोरेने मुंबईच्या विवेक पोद्दारचा २५-१६, २५-८ असा पराभव करून दणदणीत आगेकूच केली. प्रशांतने दोन्ही सेटमध्ये सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्याला सामन्यात स्थिरावण्याची संधीच दिली नाही.

 

झैदचा धुव्वा; रवींद्र हांगे निष्प्रभ

ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या रवींद्र हांगेचा २५-१, २५-२ असा अक्षरशः धुव्वा उडवत आगेकूच केली. झैदच्या अचूक स्ट्रोक्ससमोर हांगेचा खेळ पूर्णपणे निष्प्रभ ठरला. दोनही सेटमध्ये प्रतिस्पर्ध्याला नाममात्र गुण मिळू देत झैदने आपले वर्चस्व स्पष्ट केले.

 

नीलांशकडून अभिषेकचा दणदणीत पराभव

मुंबईच्या नीलांश चिपळूणकरने रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाणचा २५-७, २५-० असा एकतर्फी पराभव करत शानदार आगेकूच केली. दुसऱ्या सेटमध्ये नीलांशने प्रतिस्पर्ध्याला एकही गुण मिळवू न देता २५-० असा निर्विवाद विजय मिळवला. या कामगिरीमुळे नीलांशच्या आक्रमक खेळाची चांगलीच चर्चा रंगली.

 

सागर वाघमारेचा रियाझवर जोरदार विजय

पुण्याच्या सागर वाघमारेने रत्नागिरीच्या रियाझ अकबर अलीचा २१-२, २५-४ असा दणदणीत पराभव केला. दोन्ही सेटमध्ये सागरने सुरुवातीपासून वर्चस्व राखत रियाझला सामन्यात पुनरागमनाची संधीच दिली नाही.

 

महिला गटात समृद्धीचीही सरशी

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने पुण्याच्या पुष्कर्णी भट्टडचा २३-९, १३-७ असा पराभव करत पुढील फेरी गाठली. समृद्धीने दोन्ही सेटमध्ये संयमी आणि अचूक खेळ करत सामन्यावर नियंत्रण ठेवले.

 

प्राजक्ताचा निधीवर पलटवार

मुंबईच्या प्राजक्ता नारायणकरने रत्नागिरीच्या निधी सप्रेवर तीन सेटमध्ये १६-२०, २५-४, २५-४ असा विजय मिळवला. पहिला सेट १६-२० असा गमावल्यानंतर प्राजक्ताने जबरदस्त पलटवार केला. पुढील दोन्ही सेटमध्ये तिने निधीचा २५-४, २५-४ असा धुव्वा उडवत सामना खिशात घातला.

 

तनया पाटीलची मितालीवर मात

पुण्याच्या तनया पाटीलने मुंबईच्या मिताली पाठकवर तीन सेटमध्ये २४-२३, १०-१९, १५-६ असा विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये अवघ्या एका गुणाने बाजी मारल्यानंतर मितालीने दुसऱ्या सेटमध्ये १९-१० असा प्रतिकार केला; मात्र निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये तनयाने १५-६ अशी सरशी साधत सामना जिंकला.

 

ऐशाचा चैतालीवर निसटता विजय

मुंबईच्या ऐशा साजिद खानने ठाण्याच्या चैताली सुवारेवर रंगतदार लढतीत २३-१०, १५-२३, १५-१३ असा विजय मिळवला. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर ऐशाला दुसऱ्या सेटमध्ये १५-२३ असा धक्का बसला; मात्र निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये तिने संयम राखत १५-१३ असा निसटता विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला.


Post a Comment

0 Comments