Type Here to Get Search Results !

खो-खोला पाठबळ हीच अजितदादांना खरी आदरांजली! उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन - सांगलीत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या आयोजनाची ग्वाही राज्यातील सर्व जिल्हा खो-खो संघटनांना आर्थिक बळ देण्यासाठी १५ दिवसांत विशेष बैठक पंच शिबिरात ६०० हून अधिक पंच-पदाधिकाऱ्यांचा सहभाग


 

खो-खोला पाठबळ हीच अजितदादांना खरी आदरांजली!

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन - सांगलीत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या आयोजनाची ग्वाही

राज्यातील सर्व जिल्हा खो-खो संघटनांना आर्थिक बळ देण्यासाठी १५ दिवसांत विशेष बैठक

पंच शिबिरात ६०० हून अधिक पंच-पदाधिकाऱ्यांचा सहभाग

कराड, दि. २२ : खो-खोच्या मैदानावर महाराष्ट्राचा दबदबा कायम ठेवायचा असेल, तर केवळ खेळाडूंना संधी देऊन भागणार नाही; संघटना, पंच, तांत्रिक यंत्रणा आणि जिल्हास्तरीय व्यवस्थेला आर्थिक व संस्थात्मक बळ देणे गरजेचे आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खो-खोला सातत्याने दिलेल्या पाठबळाची आठवण ठेवत या खेळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असा स्पष्ट निर्धार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. एवढ्यावर न थांबता राज्यातील सर्व जिल्हा खो-खो संघटनांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी १५ दिवसांत विशेष बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे कराडच्या पंच शिबिरातून खो-खोच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

 

सांगलीत राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचा धडाका!

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने द ॲम्युचर खो-खो असोसिएशन, सांगली आणि सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय खो-खो पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उदय सामंत बोलत होते. रिमोटद्वारे दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामंत यांनी थेट घोषणा करत, वाळवा-सांगली येथे तुम्ही जेव्हा सांगाल, तेव्हा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे भव्य-दिव्य आयोजन करू. त्यासाठी गौरव नायकवडी आणि सांगली जिल्हा खो-खो असोसिएशनला शासनस्तरावर जे काही सहकार्य लागेल, ते तत्परतेने करू,” अशी ग्वाही दिली.

 

जिल्हा संघटनांना आर्थिक ताकद देणार

खो-खोचा खरा विकास हा जिल्हास्तरावर होतो. त्यामुळे जिल्हा संघटना सक्षम झाल्याशिवाय राज्याचा खेळ मजबूत होणार नाही, हे लक्षात घेऊन उद्योग विभागाने पुढाकार घेण्याची घोषणा सामंत यांनी केली. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा खो-खो संघटनांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी येत्या १५ दिवसांत विशेष बैठक घेऊ. त्यात ठोस धोरणात्मक निर्णय घेऊन संघटनांना भक्कम आर्थिक पाठबळ दिले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे राज्यातील खो-खो संघटनांच्या अपेक्षांना मोठी चालना मिळाली आहे.

 

पंच शिबिरात ६०० हून अधिक पंच-पदाधिकारी

राज्यस्तरीय पंच व तांत्रिक अधिकारी प्रशिक्षण शिबिराला यंदा राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ६०० हून अधिक पंच आणि पदाधिकारी या दोन दिवसीय शिबिरात सहभागी झाले आहेत. बदलते नियम, तांत्रिक निर्णय, सामन्यातील अचूकता आणि आधुनिक पंचगिरी यांचा सखोल अभ्यास या शिबिरातून होत असल्याने महाराष्ट्रातील पंचगिरी अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

 

डॉ. चंद्रजीत जाधव यांचा विशेष सन्मान

कार्यक्रमात महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांना संघटनेच्या वतीने मानपत्र देऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. जाधव यांच्या खो-खोतील योगदानाचे कौतुक करताना सामंत यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. मानपत्रातील मजकूर मी अतिशय लक्षपूर्वक ऐकला. त्यातून खो-खो या पारंपरिक खेळासाठी डॉ. जाधव यांचे योगदान किती मोठे आणि मोलाचे आहे, याची जाणीव झाली,” असे सामंत म्हणाले. क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी अशा समर्पित आणि अभ्यासू कार्यकर्त्यांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

खो-खो आता ‘हायटेक’; कारभार होणार पेपरलेस

दरम्यान, महाराष्ट्र खो-खो असोसिएशननेही आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. खो-खोला हायटेक करण्याच्या दिशेने संघटनेचा प्रवास सुरू झाला आहे,” अशी माहिती डॉ. चंद्रजीत जाधव यांनी दिली. राज्यातील सर्व जिल्हा सचिवांना लॅपटॉप देऊन संघटनेचा कारभार टप्प्याटप्प्याने पेपरलेस करण्यात येत आहे. तांत्रिक समिती, पंच मंडळ आणि प्रसिद्धी समितीच्या सचिवांनाही लॅपटॉप देण्यात आले असून, संघटनेचा बहुतांश प्रशासकीय कारभार आता ऑनलाइन पद्धतीने करण्यावर भर दिला जात आहे.

 

गुणपत्रिकाही ऑनलाइन; निर्णयप्रक्रियेला वेग

संघटनेच्या डिजिटल परिवर्तनाचा पुढील टप्पा म्हणून सर्व गुणपत्रिका ऑनलाइन पद्धतीने करण्याचे नियोजन असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. यामुळे सामन्यांची माहिती, निकाल, गुणनोंदणी आणि स्पर्धेचे दस्तऐवजीकरण अधिक वेगवान, पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे. पारंपरिक पद्धतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत महाराष्ट्राच्या खो-खो प्रशासनाला नवा चेहरा देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

 

दिग्गजांची उपस्थिती; कराडमध्ये खो-खोचा महासंगम

या कार्यक्रमाला द ॲम्युचर खो-खो असोसिएशन, सांगलीचे अध्यक्ष गौरवभाऊ नायकवडी, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, सातारा जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, खानापूर-आटपाडीचे आमदार सुहास बाबर, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे खजिनदार ॲड. गोविंद शर्मा आणि कार्याध्यक्ष सचिन गोडबोले उपस्थित होते.

 

तसेच रयत शिक्षण संस्थेचे सदस्य ॲड. सदानंद चिंगळे, ॲड. सत्यजित पवार, सांगली असोसिएशनचे उपाध्यक्ष अर्जुन माने, कार्याध्यक्ष डॉ. समीर शेख, पैलवान चंद्रहार दादा पाटील, पैलवान संतोष वेताळ, माजी आमदार दीपक चव्हाण यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर, खो-खोप्रेमी आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आता फक्त मैदानावर नव्हे, व्यवस्थेतही महाराष्ट्र आघाडीवर!

खो-खोला जागतिक पातळीवर नवे स्थान मिळत असताना महाराष्ट्राची जबाबदारी आणखी वाढली आहे. राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन, जिल्हा संघटनांना आर्थिक बळ, पंचांचे आधुनिक प्रशिक्षण आणि संपूर्ण कारभाराचे डिजिटलायझेशन या चार आघाड्यांवर एकाच वेळी काम सुरू झाले तर महाराष्ट्राचा खो-खो आणखी वेगाने पुढे जात आहे. कराडच्या या शिबिरातून मिळालेली आश्वासने आणि सुरू झालेला डिजिटल बदल प्रत्यक्षात उतरला, तर खो-खोच्या मैदानाबरोबरच त्याच्या व्यवस्थापनातही महाराष्ट्र देशाला दिशा देऊ शकतो.


Post a Comment

0 Comments