Type Here to Get Search Results !

मुलींच्या फुटबॉलला नवी दिशा ‘नोव्हा स्पोर्ट्स’ची दमदार सुरुवात! बेंगळुरूतील ‘सुपरनोव्हा फुटबॉल चॅम्पियनशिप’पासून प्रवासाला सुरुवात; पुढील दशकात १५ लाखांहून अधिक मुलींपर्यंत पोहोचण्याचा कॅप्री स्पोर्ट्सचा संकल्प फुटबॉलच्या मैदानावर मुलींची नवी ‘नोव्हा’!

 


मुलींच्या फुटबॉलला नवी दिशा

नोव्हा स्पोर्ट्स’ची दमदार सुरुवात!

बेंगळुरूतील ‘सुपरनोव्हा फुटबॉल चॅम्पियनशिप’पासून प्रवासाला सुरुवात;

पुढील दशकात १५ लाखांहून अधिक मुलींपर्यंत पोहोचण्याचा कॅप्री स्पोर्ट्सचा संकल्प

फुटबॉलच्या मैदानावर मुलींची नवी ‘नोव्हा’!

 

मुंबई : भारतातील मुलींच्या फुटबॉलला आता केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना प्रशिक्षण, स्पर्धा आणि उच्चस्तरीय कामगिरीपर्यंत पोहोचवणारा स्पष्ट मार्ग मिळणार आहे. कॅप्री स्पोर्ट्सने ‘नोव्हा स्पोर्ट्स’ या केवळ मुलींसाठीच्या फुटबॉल विकास उपक्रमाची घोषणा केली असून, ८ ते १८ वर्षांच्या मुलींना दर्जेदार प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण स्पर्धेच्या संधी देत सक्षम खेळाडू घडवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील दशकात १५ लाखांहून अधिक मुलींपर्यंत पोहोचण्याचा कॅप्री स्पोर्ट्सचा निर्धार आहे.

 

बेंगळुरूपासून पहिली शिट्टी

या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची पहिली पायरी सुपरनोव्हा फुटबॉल चॅम्पियनशिप’ असेल. ५ आणि ६ सप्टेंबर रोजी बेंगळुरूतील डेपो१८ येथे १३, १५ आणि १७ वर्षांखालील मुलींसाठी ७-अ-साइड शालेय फुटबॉल स्पर्धा होणार आहे. शहरातील जवळपास ५० संघ सहभागी होणार असून, खेळाडूंसह शाळा, पालक आणि प्रशिक्षकांसाठीही व्यावसायिक सामन्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

स्पर्धेबरोबर प्रशिक्षणाचीही संधी

या स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींना नोव्हा फुटबॉल अकादमीत प्रवेशाची संधी मिळणार आहे. सातत्यपूर्ण प्रशिक्षण, स्पर्धात्मक अनुभव आणि खेळाडूंची योग्य ओळख यावर अकादमीचा भर असेल. त्यामुळे एखाद्या स्पर्धेत सहभागी होऊन थांबण्याऐवजी मुलींना पुढील टप्प्यावर जाण्यासाठी नियमित प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

 

मुली प्रथम’ हा मूलमंत्र

मुली प्रथम. नेहमीच.’ या विचारावर नोव्हा स्पोर्ट्सची उभारणी करण्यात आली आहे. मुलांसाठीच्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलून मुलींसाठी वापरण्याऐवजी, त्यांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन हा उपक्रम स्वतंत्रपणे तयार करण्यात आला आहे. प्रशिक्षण पद्धती, मुली-केंद्रित अभ्यासक्रम, सुरक्षिततेची मानके, तंत्रज्ञान आणि स्पर्धात्मक रचना या सर्व बाबींमध्ये मुलींच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

 

मैदानापासून उच्चस्तरापर्यंत स्पष्ट मार्ग

शालेय फुटबॉल, अकादमी प्रशिक्षण आणि नियोजित स्पर्धा यांना एकत्र जोडून तळागाळापासून उच्चस्तरीय फुटबॉलपर्यंतचा मार्ग तयार करण्याचा नोव्हा स्पोर्ट्सचा प्रयत्न आहे. पहिल्यांदा फुटबॉल खेळणाऱ्या मुलीपासून देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूपर्यंत प्रत्येकासाठी प्रगतीची संधी निर्माण करण्याचे लक्ष्य आहे.

 

इंडिया ऑन ट्रॅकची साथ

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कॅप्री स्पोर्ट्सने इंडिया ऑन ट्रॅकसोबत भागीदारी केली आहे. तळागाळातील क्रीडा विकासाचा अनुभव असलेल्या या संस्थेने एनबीए, प्रीमियर लीग, ला लिगा, एमएलबी, गुजरात टायटन्स, अपोलो टायर्स, कोका-कोला आणि हेनेकेन यांसारख्या आंतरराष्ट्रीय व भारतीय संस्था आणि ब्रँड्ससोबत विविध क्रीडा उपक्रम राबवले आहेत.

 

१५ लाख मुलींचे लक्ष्य

नोव्हा स्पोर्ट्सचा विस्तार एका शहरातून सुरू करून पुढील दशकात राष्ट्रीय स्तरावर करण्याचा कॅप्री स्पोर्ट्सचा मानस आहे. १५ लाखांहून अधिक मुलींपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी दोन प्रमुख मार्गांवर भर असेल—संपूर्ण खेळाडू विकास आणि संरचित स्पर्धात्मक प्रवास. अकादमी, प्रशिक्षक शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षण पद्धतींसोबतच मुलींना सातत्यपूर्ण सामन्यांचा अनुभव देण्यात येणार आहे.

 

जिनिशा शर्मा : ‘लहान वयात संधी मिळणे गरजेचे’

कॅप्री स्पोर्ट्सच्या संचालक आणि प्रवर्तक जिनिशा शर्मा यांनी तळागाळात गुंतवणूक करण्याची गरज अधोरेखित केली. मुलींना लहान वयापासून दर्जेदार प्रशिक्षण, स्पर्धेच्या संधी आणि योग्य पाठबळ मिळाले, तर त्यांची क्षमता मोठ्या स्तरावर विकसित होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या क्रीडा क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

अपुर्व गुप्ता : फुटबॉलच्या पलीकडचा प्रभाव

कॅप्री स्पोर्ट्सचे संचालक, संपर्क क्रीडा विभागाचे अपुर्व गुप्ता यांनी मुलींच्या फुटबॉल प्रवासातील प्रत्येक टप्प्याला जोडणारी व्यवस्था उभारणे हे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. खेळण्याची, प्रगती करण्याची आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी प्रत्येक मुलीला मिळावी, यासाठी नोव्हा स्पोर्ट्स काम करणार आहे. या उपक्रमाचा परिणाम केवळ फुटबॉलच्या मैदानापुरता न राहता मुलींमध्ये आत्मविश्वास, जिद्द आणि नेतृत्वगुण निर्माण करणारा ठरावा, हीच अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments