तायक्वांदो ग्रॅंडमास्टर संतोष गुलदेकर यांचा आंतरराष्ट्रीय धडाका!
कोरिया, थायलंड स्पर्धेत ३
रौप्यांसह १ कांस्यपदकाची कमाई; ५३ व्या वर्षीही
प्रतिस्पर्ध्यांना दिली कडवी झुंज
वय ५३, पण जिद्द तरुणाईची;
आंतरराष्ट्रीय तायक्वांदोच्या रिंगमध्ये गुलदेकरांचा दमदार ठसा
मुंबई : वयाच्या ५३ व्या वर्षीही जिद्द, फिटनेस आणि तायक्वांदोवरील निष्ठेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर
पदकांची लयलूट करण्याची किमया तायक्वांदो ग्रॅंडमास्टर संतोष गुलदेकर यांनी
करून दाखवली आहे. दक्षिण कोरिया आणि थायलंड येथे नुकत्याच झालेल्या
आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धांमध्ये गुलदेकर यांनी प्रतिस्पर्ध्यांना कडवी
झुंज देत तब्बल ३ रौप्य आणि १ कांस्यपदक पटकावले. तब्बल ३० देशांतील ३
हजारांहून अधिक खेळाडूंच्या सहभागामुळे या स्पर्धांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे
मोठे आव्हान होते; मात्र गुलदेकर यांनी या आव्हानावर मात करत
आपल्या अनुभवाची आणि कौशल्याची छाप उमटवली.
दक्षिण कोरियात दुहेरी रौप्यपदकाचा दणका
दक्षिण
कोरिया येथे झालेल्या स्पर्धेत संतोष गुलदेकर यांनी पुमसे आणि क्युरोगी
या दोन्ही प्रकारांत दमदार कामगिरी करत रौप्यपदकांची कमाई केली. तांत्रिक
कौशल्य, अचूक हालचाली आणि जबरदस्त आत्मविश्वासाच्या जोरावर
त्यांनी दोन्ही प्रकारांत पदकावर आपले नाव कोरले.
थायलंडमध्येही पदकांची मालिका कायम
दक्षिण
कोरियातील यशानंतर थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही गुलदेकर यांचा
विजयी झंझावात कायम राहिला. क्युरोगी प्रकारात रौप्यपदक, तर पुमसे प्रकारात कांस्यपदक पटकावत त्यांनी आणखी दोन पदकांची भर
घातली. दोन देशांतील सलग स्पर्धांमध्ये ३ रौप्य आणि १ कांस्यपदक मिळवणे ही
त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीची ठळक पावती ठरली.
३० देश, ३ हजारांहून अधिक
खेळाडू; तरीही भारतीय खेळाडूचा ठसा
दक्षिण
कोरिया आणि थायलंड येथे झालेल्या या दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अंदाजे ३०
देशांतील ३ हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अशा मोठ्या
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करत संतोष गुलदेकर यांनी
मिळवलेली पदकांची चौकडी निश्चितच विशेष कौतुकास्पद ठरली आहे.
मोहन स्पोर्ट्स अकादमीतून घडविताहेत तायक्वांदोची नवी पिढी
मोहन स्पोर्ट्स अकादमीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून
संतोष गुलदेकर सातत्याने तायक्वांदोच्या प्रसारासाठी आणि खेळाडू घडविण्यासाठी
कार्यरत आहेत. ते ब्लॅक बेल्ट ५ डॅन असून, स्वतःच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीसोबतच नवोदित खेळाडूंना दर्जेदार
प्रशिक्षण देण्याचे कामही ते सातत्याने करीत आहेत.
यशामागे गुरु आणि कुटुंबीयांचा मोलाचा वाटा
आपल्या
या आंतरराष्ट्रीय यशाचे श्रेय गुरु स्व. मोहन सर, अदिती, आर्या आणि श्रेया यांना देताना संतोष गुलदेकर यांनी त्यांचा मोलाचा वाटा
अधोरेखित केला. गुरुंचे मार्गदर्शन आणि कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा यामुळेच
आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे
त्यांनी नमूद केले.
तायक्वांदो क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
कोरिया
आणि थायलंडमधील या शानदार कामगिरीबद्दल संतोष गुलदेकर यांचे तायक्वांदो
क्षेत्रासह विविध स्तरांतून विशेष अभिनंदन होत आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही
आंतरराष्ट्रीय रिंगमध्ये झुंज देत पदकांची कमाई करणाऱ्या गुलदेकर यांची कामगिरी
युवा खेळाडूंसाठीही प्रेरणादायी ठरली आहे.

Post a Comment
0 Comments