Type Here to Get Search Results !

काळाचौकीचा ‘गणाधीश चषक’ शालेय कॅरमचा थरार २० सप्टेंबरला! १६ वर्षांखालील मुलांसाठी विनाशुल्क स्पर्धा चॅम्पियन बोर्डवर रंगणार बोटांच्या करामतींची जंगी लढत

 


काळाचौकीचा ‘गणाधीश चषक’ शालेय कॅरमचा थरार २० सप्टेंबरला!

१६ वर्षांखालील मुलांसाठी विनाशुल्क स्पर्धा

चॅम्पियन बोर्डवर रंगणार बोटांच्या करामतींची जंगी लढत

 

मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्साहाला क्रीडाशिस्तीची जोड देत काळाचौकीचा ‘गणाधीश चषक’ शालेय कॅरम स्पर्धा २० सप्टेंबर रोजी रंगणार आहे. बाल गोपाळ (अभिलाषा) गणेशोत्सव मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली १६ वर्षांखालील शालेय मुलांची विनाशुल्क एकेरी कॅरम स्पर्धा काळेवाडी-काळाचौकी येथील बाल गोपाळ गणेशोत्सव मंडपात होणार असून, चॅम्पियन कॅरम बोर्डवर उदयोन्मुख कॅरमपटूंच्या अचूक फटक्यांचा थरार पाहायला मिळणार आहे.

 

गणेशोत्सवात क्रीडा संस्कृतीचा जागर

मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या सहप्रायोजकत्वामुळे या क्रीडा उपक्रमाला विशेष पाठबळ मिळाले आहे. गतवर्षी विविध जिल्ह्यांतील शालेय कॅरमपटूंनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने बाल गोपाळ मंडळाने यंदाही या उपक्रमाचे सातत्य कायम ठेवले आहे. गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच शालेय मुलांना स्पर्धात्मक क्रीडेसाठी व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरणार आहे.

 

पहिल्या १६ विजेत्यांना आकर्षक पुरस्कार

स्पर्धेतील पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ सहभाग नव्हे, तर प्रत्येक सामना जिंकण्यासाठी शालेय कॅरमपटूंमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेदरम्यान सहभागी खेळाडूंना कॅरम खेळाचे विनामूल्य मार्गदर्शन देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 

१५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची संधी

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या १६ वर्षांखालील शालेय मुलांनी १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश नोंदवावा. प्रवेश अर्ज अथवा अधिक माहितीसाठी मंडळाचे सेक्रेटरी शुभ्रतो दिलीप वरेकर (९८६७१ ९२४४१) अथवा प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 


Post a Comment

0 Comments