Type Here to Get Search Results !

मुरगूडच्या मंडलिक कुस्ती संकुलाचा जागतिक स्तरावर डंका! डबल महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारीची २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक; महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा


मुरगूडच्या मंडलिक कुस्ती संकुलाचा जागतिक स्तरावर डंका!

डबल महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारीची २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक;

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

लास वेगास : महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण! मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुलाची पैलवान आणि डबल महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी हिने अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर आपल्या कुस्तीचा ठसा उमटवत अमृताने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, तिच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे राज्यातील कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्धीला चितपट करणारी गुणांची बाजी!

अमृताने स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बाय मिळाल्याने थेट पुढील फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत तिने कझाकिस्तानच्या सबायराझाणवा हिच्याविरुद्ध आक्रमक कुस्तीचे प्रदर्शन करत १२-१ अशा गुणांनी विजय मिळवला. या विजयामुळे अमृताने उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार वाटचाल केली.

 

चीनच्या विनझिनविरुद्ध अटीतटीची लढत; १०-८ ने विजय!

उपांत्य फेरीत अमृतासमोर चीनच्या विनझिन हिचे आव्हान होते. दोन्ही कुस्तीपटूंमध्ये रंगलेल्या चुरशीच्या लढतीत अमृताने संयम, जिद्द आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर १०-८ अशा फरकाने विजय मिळवला. या महत्त्वपूर्ण विजयासह तिने अंतिम फेरीत धडक मारली आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले.

 

जागतिक कुस्तीच्या इतिहासात महाराष्ट्राच्या लेकीची भरारी!

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी अमृता ही महाराष्ट्रातील पहिली महिला कुस्तीगीर असल्याचा दावा या कामगिरीच्या निमित्ताने करण्यात येत आहे. तिच्या या यशामुळे महाराष्ट्रातील महिला कुस्तीला नवी प्रेरणा मिळाली असून, ग्रामीण भागातील कुस्ती संकुलातून घडलेली ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील भरारी विशेष उल्लेखनीय ठरली आहे.

 

युक्रेनच्या झाबोलतसकाविरुद्ध सुवर्णपदकासाठी लढत!

अमृताची अंतिम फेरीतील लढत युक्रेनच्या झाबोलतसका हिच्याशी होणार आहे. या लढतीत विजय मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरण्याची संधी अमृताला मिळाली आहे. तिच्या अंतिम सामन्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले असून, अमृताने सुवर्णविजय मिळवून भारताचा तिरंगा जागतिक व्यासपीठावर अभिमानाने फडकवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

नवरात्रोत्सवात सुवर्णविजयाची अपेक्षा!

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेच्या शुभदिनी अमृताने मिळवलेले हे यश महाराष्ट्रासाठी आनंददायी ठरले आहे. तिच्या गळ्यात सुवर्णपदक पडावे आणि यंदाचा नवरात्रोत्सव तिच्या सुवर्णविजयाने अधिक संस्मरणीय व्हावा, अशा शुभेच्छा माजी खासदार संजयदादा मंडलिक आणि कार्याध्यक्ष अॅड. वीरेंद्र भैय्या मंडलिक यांनी दिल्या.

 

रुबिक्स फाउंडेशनचा मोलाचा हातभार

अमृता ही रुबिक्स फाउंडेशनची दत्तक कुस्तीगीर आहे. तिच्या क्रीडा प्रवासात आणि यशात फाउंडेशनचा मोलाचा वाटा असल्याचे सांगण्यात आले. योग्य पाठबळ, सातत्यपूर्ण मेहनत आणि कठोर सराव यांच्या जोरावर अमृताने जागतिक स्तरावर मजल मारली आहे. मुरगूडच्या मंडलिक कुस्ती संकुलातून घडलेल्या या प्रतिभावान महिला कुस्तीपटूच्या कामगिरीने महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राचा गौरव वाढवला आहे.

 

आता प्रतीक्षा आहे ती सुवर्णक्षणाची! अमृताने अंतिम फेरीतही विजयाची पताका फडकवून जागतिक अजिंक्यपदावर आपले नाव कोरावे आणि महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला नवा मान मिळवून द्यावा, अशीच तमाम कुस्तीप्रेमींची इच्छा आहे.


Post a Comment

0 Comments