Type Here to Get Search Results !

५२व्या कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर! परभणीचे तीन, पुण्याचे दोन खेळाडू १४ सदस्यीय संघाच्या प्रशिक्षकपदी प्रो-कबड्डी स्टार विशाल माने


५२व्या कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर!

परभणीचे तीन, पुण्याचे दोन खेळाडू

१४ सदस्यीय संघाच्या प्रशिक्षकपदी प्रो-कबड्डी स्टार विशाल माने

 

मुंबई : राष्ट्रीय कबड्डीच्या मैदानावर महाराष्ट्राची ताकद दाखवण्यासाठी कुमार खेळाडू सज्ज झाले आहेत! बिहारमधील पाटलीपुत्र येथे होणाऱ्या ५२व्या कुमार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १४ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते जितेश जोशी, आशिष म्हात्रे आणि रिशांक देवाडीगा यांच्या निवड समितीने संघाची निवड केली. या संघात परभणीच्या तीन, पुण्याच्या दोन, तर अन्य जिल्हे आणि मुंबई उपनगरातून खेळाडूंना संधी मिळाली आहे. प्रो-कबड्डी स्टार विशाल माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ पालघर येथे सराव करत असून, राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी करण्यासाठी खेळाडूंची तयारी सुरू आहे.

 

परभणीचे तीन खेळाडू; पुण्याच्या दोघांना संधी

महाराष्ट्राच्या संघात परभणीचे अतुल जाधव, सारंग रोकडे आणि रमेश गायकवाड या तिघांची निवड झाली आहे. पुण्यातून ऋषिकेश जाधव आणि प्रसाद दिघोळे यांना स्थान मिळाले आहे. याशिवाय अहिल्यानगर, रत्नागिरी, सांगली, रायगड, कोल्हापूर, ठाणे, मुंबई उपनगर, जालना आणि यजमान पालघर येथील प्रत्येकी एका खेळाडूची संघात वर्णी लागली आहे.

 

पुरस्कारविजेत्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने संघाची घोषणा

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने संघाची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव आणि अभिलाषा म्हात्रे, तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन मदने यांच्या स्वाक्षरीने ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

विशाल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पालघरमध्ये सराव

संघाचे प्रशिक्षक म्हणून विशाल माने, तर सहायक प्रशिक्षक म्हणून अजित शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झालेला संघ पालघर येथे जोरदार सराव करत आहे. खेळाडूंची तंदुरुस्ती, चढाई-बचावातील समन्वय आणि सामन्यातील रणनीती यांवर सरावादरम्यान भर दिला जात आहे. संघाच्या व्यवस्थापकपदी जगदीश तांडेल, तर फिजिओ म्हणून ऋषिकान्त पोळ यांची निवड करण्यात आली आहे.

 

२९ नोव्हेंबरला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून प्रस्थान

महाराष्ट्राचा संघ गुरुवार, २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्राचा कुमार संघ

१. अतुल जाधव - परभणी, २. ऋषिकेश जाधव - पुणे, ३. शिवम गोरडे - अहिल्यानगर, ४. प्रसाद दिघोळे - पुणे, ५. शैलेश एडगे - रत्नागिरी, ६. सारंग रोकडे - परभणी, ७. ओम् शिंदे - सांगली, ८. समीर हिरवे - रायगड, ९. सर्वेश नेहेरे - कोल्हापूर, १०. रमेश गायकवाड – परभणी, ११. मनीष घनवडे - ठाणे, १२. कृष्णा सिंग - मुंबई उपनगर, १३. लखन राठोड - जालना, १४. सवैद पाटील – पालघर राखीव खेळाडू : सिद्धेश भोसले - मुंबई शहर, ओमकार दरकुंडे – अहिल्यानगर, वीरेंद्र मांडलिक – पुणे संघ व्यवस्थापन : प्रशिक्षक : विशाल माने, सहायक प्रशिक्षक : अजित शेळके, व्यवस्थापक : जगदीश तांडेल, फिजिओ : ऋषिकान्त पोळ

 

राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेल्या खेळाडूंकडून आता दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. पालघरमधील सरावानंतर हा संघ राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावण्यासाठी मैदानात उतरेल.


Post a Comment

0 Comments