Type Here to Get Search Results !

राष्ट्रकुल कबड्डीत भारताचा ‘चौकार’ महिला उपांत्य फेरीत, पुरुषांचीही नायजेरियावर मात! महिला संघाचा ३८-१०, तर पुरुष संघाचा ५०-२३ असा दणदणीत विजय दोन्ही संघांची सलग चौथी सरशी


राष्ट्रकुल कबड्डीत भारताचा ‘चौकार’

महिला उपांत्य फेरीत, पुरुषांचीही नायजेरियावर मात!

महिला संघाचा ३८-१०, तर पुरुष संघाचा ५०-२३ असा दणदणीत विजय

दोन्ही संघांची सलग चौथी सरशी

 

अहमदाबाद : चढायांचा धडाका, बचावातील भक्कम पकडी आणि विजयासाठी मैदानावर उतरलेली भारतीय खेळाडूंची जिद्द! उद्घाटनाच्या राष्ट्रकुल कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी नायजेरियाला नमवत विजयाचा चौकार लगावला. अहमदाबादच्या वीर सावरकर क्रीडा संकुलात सोमवारी झालेल्या सामन्यांत महिला संघाने ३८-१०, तर पुरुष संघाने ५०-२३ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला. महिलांनी या विजयासह उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले, तर पुरुष संघानेही स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.

 

महिलांचा एकतर्फी विजय; मध्यंतरालाच २४-६ अशी आघाडी

भारतीय महिला संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच नायजेरियावर वर्चस्व गाजवले. अचूक चढाया आणि प्रभावी बचावाच्या जोरावर भारताने मध्यंतराला २४-६ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात आणखी १४ गुणांची भर घालत भारताने सामना ३८-१० असा जिंकला. या विजयामुळे भारतीय महिला संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.

 

अनूची ११ गुणांची कमाई; साक्षी आणि कर्णधार निधीचाही हातभार

भारताच्या विजयात अनू सामन्याची तारांकित खेळाडू ठरली. तिने १७ चढायांमध्ये तब्बल ११ गुण मिळवले. साक्षीने चार चढाई गुण, तर कर्णधार निधी शर्माने दोन गुणांची भर घातली. बचावात सभाई गढवीने तीन पकड गुण मिळवत आपली छाप पाडली. प्रिया आणि ऋतू यांनी प्रत्येकी दोन पकड गुण मिळवत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

 

नायजेरियाच्या चढाया निष्प्रभ; रॉबर्ट मोझेसची झुंज

नायजेरियाकडून रॉबर्ट मोझेस याने सहा चढाई गुण मिळवले, तर बॅसी एडेटने दोन गुणांची नोंद केली. बचावात डेनिस उदेमे याला एकमेव पकड गुण मिळवता आला. भारतीय चढाईपटूंच्या वेगवान आणि अचूक खेळासमोर नायजेरियाच्या बचावाला फारसा प्रतिकार करता आला नाही.

 

पुरुषांचाही ५० गुणांचा धडाका; मध्यंतराला २५-७ अशी आघाडी

महिला संघाच्या विजयानंतर भारतीय पुरुष संघानेही नायजेरियाला ५०-२३ असे पराभूत करत विजयाचा चौकार पूर्ण केला. भारताने मध्यंतराला २५-७ अशी आघाडी घेतली होती. सामन्यात भारताने चढाईत ३१-२१ आणि पकडीत ७-२ अशी सरशी साधली. उत्तरार्धात नायजेरियाने १६ गुण मिळवत पुनरागमनाचा प्रयत्न केला; मात्र भारताची मोठी आघाडी धोक्यात आली नाही.

 

सचिन आणि आदित्य शिंदेची आक्रमकता; सुरजित नरवालचा बचाव भक्कम

भारताकडून सचिनने १२ चढाई गुण मिळवत आघाडी घेतली, तर आदित्य शिंदेने ११ गुणांसह त्याला जोरदार साथ दिली. पंकज मोहितेने आठ चढाई आणि दोन पकड गुण मिळवत अष्टपैलू योगदान दिले. बचावात सुरजित नरवालने चार पकड गुण मिळवत भारताची बाजू मजबूत केली.

 

नायजेरियाकडून एडेम विस्डम इटाने आठ चढाई गुण मिळवले. एकपे व्हिक्टरी इमॅन्युएलने पाच चढाई आणि एक पकड गुण, असे एकूण सहा गुण नोंदवले. इझू प्रिन्स उदाहने पाच चढाई गुण मिळवले; मात्र भारतीय संघाचा विजय रोखण्यात नायजेरियाला यश आले नाही.

 

महिलांसमोर ३० ऑक्टोबरला उपांत्य आव्हान; पुरुषांचा सामना टांझानियाशी

सलग चौथ्या विजयामुळे भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता शुक्रवार, ३० ऑक्टोबरला गट ‘ब’मध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाविरुद्ध भारताची उपांत्य फेरीची लढत होणार आहे. पुरुष संघाला मंगळवार, २७ ऑक्टोबरला टांझानियाशी सामना खेळायचा आहे. दोन्ही भारतीय संघांनी विजयाची लय कायम राखल्याने राष्ट्रकुल कबड्डी स्पर्धेतील भारताच्या पुढील वाटचालीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments