Type Here to Get Search Results !

एलआयसी-महापौर शालेय बुद्धिबळात अर्ह वाघमारेचा डबल धमाका! १३ व १४ वर्षांखालील गटांत दुहेरी मुकुट १० वर्षांखालील गटात अनन्या चव्हाणची निर्विवाद बाजी २१५ खेळाडूंचा सहभाग


एलआयसी-महापौर शालेय बुद्धिबळात अर्ह वाघमारेचा डबल धमाका!

१३ व १४ वर्षांखालील गटांत दुहेरी मुकुट

१० वर्षांखालील गटात अनन्या चव्हाणची निर्विवाद बाजी

२१५ खेळाडूंचा सहभाग

 

मुंबई : बुद्धिबळाच्या पटावर अचूक चाली, प्रतिस्पर्ध्यांच्या रणनीतीला प्रभावी प्रत्युत्तर आणि विजेतेपदासाठी शेवटपर्यंत झुंज! आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित अर्ह वाघमारेने एलआयसी-मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत १३ व १४ वर्षांखालील अशा दोन्ही गटांत विजेतेपद पटकावत ‘डबल धमाका’ केला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) सहपुरस्कृत या स्पर्धेत अर्हने दोन वयोगटांत आपली बुद्धिमत्ता आणि सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली.

 

१३ वर्षांखालील गटात निर्विवाद वर्चस्व

१३ वर्षांखालील गटात अर्ह वाघमारेने सर्व सामने जिंकत निर्विवाद वर्चस्व गाजवले. प्रतिस्पर्ध्यांना डावपेचांत गुंतवत त्याने प्रत्येक फेरीत प्रभावी कामगिरी केली आणि गटविजेतेपदावर मोहोर उमटवली. मात्र, १४ वर्षांखालील गटातील विजेतेपदाचा मार्ग त्याच्यासाठी अधिक आव्हानात्मक ठरला.

 

३२व्या चालीला निर्णायक विजय

१४ वर्षांखालील गटाच्या निर्णायक पाचव्या फेरीत फिडे गुणांकित प्रणव जैन आघाडीवर होता. त्याला नमविण्याचे आव्हान अर्हसमोर होते. अर्हने संयमाने आणि अचूक डावपेचांनी खेळ करीत ३२व्या चालीला प्रणवला पराभूत केले. या निर्णायक विजयामुळे अर्हने ४.५ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवत दुसरे विजेतेपदही आपल्या नावावर केले. दुहेरी विजेतेपद पटकावणाऱ्या अर्ह वाघमारेचा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

 

 

१० वर्षांखालील गटात अनन्या चव्हाणची पाचही सामने जिंकत बाजी

१० वर्षांखालील गटात अनन्या चव्हाणने फिडे गुणांकित अंश शर्मा आणि ग्रीवा जैन यांचे प्रमुख आव्हान परतवून लावत साखळीतील पाचही सामने जिंकले आणि गटविजेतेपदावर कब्जा केला. या गटात अंश शर्माने ४ गुणांसह द्वितीय, ग्रीवा जैनने ४ गुणांसह तृतीय, साधना खुमारने ३ गुणांसह चतुर्थ, तर माहीर वडांबेने ३ गुणांसह पाचवा क्रमांक पटकाविला.

 

६ वर्षांखालील गटात एरिक पिकार्डो प्रथम

६ वर्षांखालील गटात एरिक पिकार्डोने ५ गुणांसह विजेतेपद मिळविले. आरीन शुक्लाने ४ गुणांसह द्वितीय, विहान अहुजाने ४ गुणांसह तृतीय, झेउस वाडियाने ४ गुणांसह चतुर्थ, तर सोहम कांबळीने ४ गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.

 

१४ वर्षांखालील गटात अर्हची दुहेरी कामगिरी

१४ वर्षांखालील गटात अर्ह वाघमारेने ४.५ गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. प्रणव जैनने ४ गुणांसह द्वितीय, अर्हम गाडाने ४ गुणांसह तृतीय, आर्यन उपरकरने ३.५ गुणांसह चतुर्थ, तर मयुरेश पाटीलने ३.५ गुणांसह पाचवा क्रमांक पटकाविला.

 

२१५ खेळाडूंचा सहभाग; मनपा शाळांतील २८ खेळाडूंची चमक

मुंबई महापौर, सीबीईयूएम, आरएमएमएस आणि मुंबई शहर बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने झालेल्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील फिडे गुणांकित सब-ज्युनियर बुद्धिबळपटूंसह एकूण २१५ शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, महापालिका शाळांतील २८ खेळाडूंनी प्रथमच स्पर्धेत सहभागी होत चांगला खेळ केला. या सहभागामुळे शालेय स्तरावर बुद्धिबळाचा प्रसार आणि नवोदित खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले.

 

मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण

पारितोषिक वितरण समारंभाला माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, क्रीडापटू गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रेमी सुनील साळवी, विष्णू तांडेल, जनार्दन मोरे, शिवछत्रपती पुरस्कारविजेते लीलाधर चव्हाण तसेच सीबीईयूएमचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन करून सहभागी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.


Post a Comment

0 Comments