Type Here to Get Search Results !

बुद्धिबळाच्या पटावर मानांकितांचा धमाका! ३८७ युवा बुद्धिबळपटूंचा राज्य अजिंक्यपदासाठी संघर्ष पहिल्या दोन फेऱ्यांत अग्रमानांकितांची विजयी सलामी, बिगरमानांकितांनीही दाखवली चमक


बुद्धिबळाच्या पटावर मानांकितांचा धमाका!

३८७ युवा बुद्धिबळपटूंचा राज्य अजिंक्यपदासाठी संघर्ष

पहिल्या दोन फेऱ्यांत अग्रमानांकितांची विजयी सलामी, बिगरमानांकितांनीही दाखवली चमक

 

मुंबई, १३ नोव्हेंबर : बुद्धिबळाच्या पटावर पहिल्याच चालीपासून आक्रमक पवित्रा, प्रतिस्पर्ध्याला कोंडीत पकडण्याचे डावपेच आणि विजयासाठीची जिद्द दाखवत युवा मानांकित बुद्धिबळपटूंनी महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात दमदार सुरुवात केली. पहिल्या दोन फेऱ्यांत अनेक अग्रमानांकितांनी सलग विजयांची नोंद करत आपले इरादे स्पष्ट केले, तर बिगरमानांकित खेळाडूंनीही अनुभवी प्रतिस्पर्ध्यांसमोर कडवे आव्हान उभे केले. त्यामुळे सहाही गटांत मानांकित आणि बिगरमानांकितांमधील चुरस चांगलीच रंगू लागली असून, राष्ट्रीय संघातील स्थानासाठी बुद्धिबळाच्या पटावर जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे.

 

३८७ खेळाडूंचा सहभाग; सहा गटांत बुद्धिबळीय चुरस

इंडियन चेस स्कूलच्या वतीने दहिसर पश्चिम येथील रुस्तमजी केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू असलेल्या या तीन दिवसीय स्पर्धेत ९, १३ आणि १७ वर्षांखालील खुल्या व मुलींच्या अशा सहा फिडे मानांकित गटांत ३८७ खेळाडू सहभागी झाले आहेत. पहिल्या दोन फेऱ्यांनंतर आघाडीच्या शर्यतीत अनेक खेळाडूंनी आपले स्थान मजबूत केले असून, आगामी फेऱ्यांत मानांकनाचा दबदबा कायम राहणार की बिगरमानांकित खेळाडू धक्कादायक निकाल नोंदवणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

९ वर्षांखालील खुल्या गटात अध्वान, इवानची विजयी घोडदौड

९ वर्षांखालील खुल्या गटात अग्रमानांकित अध्वान ओसवाल (१७२४) याने अपेक्षेप्रमाणे आपली ताकद दाखवत सलग दोन विजय मिळवले. पहिल्या टप्प्यात ७ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावणाऱ्या इवान दुबे (१५४५) यानेही दोन विजयांसह आघाडीच्या शर्यतीत आपले स्थान भक्कम केले. त्यांच्यासह वीर शाह, अथर्व मुळीक, आरव देशमुख आणि निवेश पांचाळ यांनीही प्रत्येकी दोन गुणांची कमाई केली. दुसरीकडे, बिगरमानांकित धार्विक परब, शिवांश भाला, वीरेन बोरिचा आणि झियान फतनानी यांनीही प्रभावी खेळ करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

 

मुलींच्या लहान गटात लिया कृष्णनचा दबदबा

९ वर्षांखालील मुलींच्या गटात लिया कृष्णन (१५५८) हिने सलग दोन विजयांची नोंद करत स्पर्धेवर आपली पकड मजबूत केली. तिच्यासह मिराई सरदाना, खानक गडा आणि लावण्या सिंग यांनीही आघाडीच्या फळीत स्थान मिळवले. विशेष म्हणजे, बिगरमानांकित मानसी दानू हिनेही दोन फेऱ्यांतील कामगिरीने लक्ष वेधून घेतले. मानांकनाची चौकट मोडून पुढे येण्याची तिची कामगिरी या गटातील स्पर्धेची रंगत वाढवणारी ठरली.

 

१३ वर्षांखालील खुल्या गटात कश्यप खाखरियाची विजयी सुरुवात

१३ वर्षांखालील खुल्या गटात एआयएम कश्यप खाखरिया (१७८९) याने विजयी सुरुवात करत आपले आव्हान कायम ठेवले. त्याचबरोबर अर्जुन प्रभू, रितिक बोप्पा, मयन झा आणि आराध्य वाघ यांनीही आघाडीच्या शर्यतीत आपली दावेदारी कायम ठेवली आहे. या गटातील खेळाडूंची संख्या आणि प्रतिस्पर्ध्यांमधील गुणांची चुरस पाहता आगामी फेऱ्यांत आघाडीच्या क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहे.

 

त्वेषा जैनची सलग दुसरी सरशी; मुलींच्या गटात चुरस

१३ वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित त्वेषा जैन (१६९७) हिने सलग दोन विजय मिळवत आपले वर्चस्व दाखवले. मात्र, तिच्या पाठोपाठ प्रणिता भावा, महुआ देशपांडे, अरिहा देवरुखकर, निश्का अग्रवाल आणि तिस्या पट यांनीही संयुक्त आघाडीच्या फळीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे या गटात अव्वल स्थानासाठी केवळ मानांकन नव्हे, तर प्रत्यक्ष पटावरील कामगिरीच निर्णायक ठरणार आहे.

 

१७ वर्षांखालील खुल्या गटात हृदय मनियारची दमदार कामगिरी

१७ वर्षांखालील खुल्या गटात अग्रमानांकित एआयएम हृदय मनियार (१९१०) याने दोन्ही डाव जिंकत प्रतिस्पर्ध्यांना सावध केले आहे. त्याच्याबरोबर युवराज प्रताप सिंग, सोहम सहमाते आणि रोनित मोटवानी यांनीही प्रत्येकी दोन गुण मिळवत आघाडीच्या शर्यतीत स्थान मिळवले. विशेष म्हणजे, बिगरमानांकित विहान सिंग यानेही सलग विजय मिळवत आपली छाप पाडली. या गटात मानांकित खेळाडूंची प्रतिष्ठा आणि नव्या खेळाडूंची महत्त्वाकांक्षा यांच्यातील संघर्ष अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

 

मुलींच्या १७ वर्षांखालील गटात दृश्या नाईक आघाडीवर

१७ वर्षांखालील मुलींच्या गटात अग्रमानांकित दृश्या नाईक (१७१३) हिने सलग दोन विजयांची नोंद करत स्पर्धेत आपली विजयी लय कायम राखली. तिच्यासह इक्षा सोनी, त्रिशा जगताप आणि सायना नागरकट्टे यांनीही विजय मिळवत आघाडीच्या शर्यतीत आपले स्थान टिकवले आहे. या गटातील पुढील फेऱ्यांत मानांकित खेळाडूंची कसोटी लागणार असून, राष्ट्रीय निवडीच्या दृष्टीने प्रत्येक डाव महत्त्वाचा ठरणार आहे.

 

अहमदाबादच्या राष्ट्रीय स्पर्धेचे लक्ष्य; प्रत्येक गुण निर्णायक

या स्पर्धेला राष्ट्रीय निवडीचे महत्त्व असल्याने आगामी फेऱ्यांतील प्रत्येक डाव खेळाडूंसाठी प्रतिष्ठेचा ठरणार आहे. अहमदाबाद येथे १६ ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे. सहाही गटांतील पहिले दोन क्रमांक मिळवणाऱ्या एकूण १२ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.

 

पहिल्या दोन फेऱ्यांत मानांकितांनी विजयाची पताका फडकावली असली, तरी बिगरमानांकित खेळाडूंच्या कामगिरीने स्पर्धेतील समीकरणे खुली ठेवली आहेत. आता पुढील फेऱ्यांत कोण आपली विजयी घोडदौड कायम राखतो आणि कोण मानांकितांना धक्का देत राष्ट्रीय निवडीच्या शर्यतीत आघाडी घेतो, याकडे बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments