Type Here to Get Search Results !

बेंचप्रेसच्या ताकदीचा पनवेलमध्ये जल्लोष रौनक, तन्मय, दिनेश आणि अमृता ठरले ‘स्ट्राँगेस्ट’! स्व. दीपक अरुण पाटकर स्मृती बेंचप्रेस स्पर्धेत चार गटांत सर्वोत्तम लिफ्टरचा बहुमान स्पार्टन्स फिटनेस आणि आयएनडी क्लबची सांघिक विजेतेपदावर मोहोर


बेंचप्रेसच्या ताकदीचा पनवेलमध्ये जल्लोष

रौनक, तन्मय, दिनेश आणि अमृता ठरले ‘स्ट्राँगेस्ट’!

स्व. दीपक अरुण पाटकर स्मृती बेंचप्रेस स्पर्धेत चार गटांत सर्वोत्तम लिफ्टरचा बहुमान

स्पार्टन्स फिटनेस आणि आयएनडी क्लबची सांघिक विजेतेपदावर मोहोर

 

पनवेल : ताकदीचा कस, जिद्दीची परीक्षा आणि वजन उचलण्याच्या प्रत्येक प्रयत्नात विजयासाठीची धडपड... अशा भारदस्त वातावरणात पनवेलच्या व्ही. के. हायस्कूलमध्ये रंगलेल्या स्व. दीपक अरुण पाटकर स्मरणार्थ बेंचप्रेस स्पर्धेत युवा आणि अनुभवी खेळाडूंनी आपले सामर्थ्य दाखवून दिले. या स्पर्धेत रौनक रोशन जितेकर, तन्मय मोहन पाटील, दिनेश हरिचंद्र पवार आणि अमृता भगत यांनी आपापल्या गटांत सर्वोत्तम लिफ्टरचा किताब पटकावत स्पर्धेचे आकर्षण ठरले. क्लासिक आणि इक्विप्ड अशा दोन्ही प्रकारांत झालेल्या या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील विविध भागांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 

चार गटांत चार दमदार किताबविजेते!

स्पर्धेतील किताब विजेत्यांमध्ये सब-ज्युनियर क्लासिक स्ट्राँग बॉय गटात रौनक रोशन जितेकर (चेतन फिटनेस) याने बाजी मारली. क्लासिक सीनियर स्ट्राँगमॅन किताब तन्मय मोहन पाटील (वैयक्तिक, पेण) याने पटकावला. क्लासिक मास्टर्स स्ट्राँगमॅन गटात दिनेश हरिचंद्र पवार (स्पार्टन फिटनेस, खोपोली) याने सर्वोत्तम लिफ्टरचा मान मिळवला. महिलांच्या गटात ओव्हरऑल स्ट्राँग वुमन किताब अमृता भगत (पॉवर हाऊस टीम, खोपोली) हिने आपल्या नावावर केला. चारही खेळाडूंनी आपापल्या गटांत ताकदीचा ठसा उमटवत स्पर्धेत विशेष लक्ष वेधून घेतले.

 

क्लासिकमध्ये स्पार्टन्स फिटनेसचे वर्चस्व

क्लासिक प्रकारातील सांघिक स्पर्धेत स्पार्टन्स फिटनेस, खोपोली यांनी दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. हनुमान व्यायामशाळा, पेण यांनी उपविजेतेपद मिळवले. इक्विप्ड प्रकारातील ओव्हरऑल सांघिक विजेतेपद आयएनडी क्लब, कर्जत यांनी जिंकले, तर पॉवर हाऊस पॉवरलिफ्टिंग टीम, खोपोली यांनी उपविजेतेपदावर समाधान मानले. या विजेत्या संघांना कै. दीपक सुरेखा अरुण पाटकर स्मरणार्थ चषक देऊन गौरविण्यात आले.

 

संदीप पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; त्यांनीही केले प्रात्यक्षिक!

पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन, रायगड यांच्या वतीने आणि समस्त पाटकर कुटुंबीयांच्या सौजन्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष आणि क्रीडाप्रेमी संदीप पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. विशेष म्हणजे, केवळ उद्घाटनापुरते मर्यादित न राहता संदीप पाटील यांनी स्वतः बेंचप्रेसचे प्रात्यक्षिक करून खेळाडूंचा उत्साह वाढवला. असोसिएशनचे कार्याध्यक्ष यशवंत मोकल, स्पर्धाप्रमुख सुभाष टेंबे आणि संदीप कृष्णा पाटकर यांच्या हस्ते संदीप पाटील यांचा गौरव करण्यात आला.

 

माधव पंडित आणि राजेश अनगत यांचा विशेष सन्मान

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी गतिमंद मुलांचे प्रशिक्षक राजेश अनगत (हनुमान व्यायामशाळा, पेण) यांना कै. दीपक पाटकर यांच्या स्मरणार्थ गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाला पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सुनील झुंजारराव उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पहिल्या राष्ट्रीय डेडलिफ्ट मास्टर्स स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारे ज्येष्ठ खेळाडू माधव गोविंद पंडित यांना विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पॉवरलिफ्टिंग खेळाडू संजय रहाटे आणि मुंबई शहरचे माजी सचिव विनायक आचरेकर यांचीही उपस्थिती होती.

 

रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाड, पेण, अलिबाग, कर्जत आणि खोपोली येथील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेत आपले कौशल्य आणि ताकद पणाला लावली. विविध वयोगटांतील खेळाडूंना क्लासिक आणि इक्विप्ड प्रकारांत आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळाली. स्पर्धेचे पंच म्हणून गोपीनाथ पवार, सुरेश धुळप, जितेंद्र यादव, राकेश पाटील, विक्रमसिंग अधिकारी, विशाल मुळये, रामचंद्र गावडे आणि नितीन पगार यांनी जबाबदारी पार पाडली.

 

स्व. दीपक पाटकर यांच्या स्मृतीला अभिवादन करत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेने रायगडमधील पॉवरलिफ्टिंग खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. खेळाडूंची मेहनत, आयोजकांचे नियोजन आणि क्रीडाप्रेमींचा सहभाग यामुळे पनवेलमधील ही स्पर्धा ताकदीचा उत्सव ठरली.


Post a Comment

0 Comments